शिर्डी येथील सरपंच परिषदेसाठी ४० ते ५० हजार सरपंच उपस्थित राहतील !! नासिक जिल्ह्यातील २८१९ प्रतिनिधी उपस्थित राहणार असून त्यासाठीचे नियोजन पूर्ण-शितल सांगळे !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाशिक – राज्य शासनाचा ग्रामविकास विभाग व अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्या वतीने बुधवारी (दि.३१) शिर्डी (जि. अहमदनगर) येथे सरपंच, उपसरपंच यांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी राज्यातील ४० ते ५० हजार सरपंच, उपसरपंच उपस्थित राहणार आहेत. नाशिक जिल्हयातील २८१९ प्रतिनिधी उपस्थित राहणार असून यासाठीचे नियोजन पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
          सरपंच परिषदेबाबत आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी पत्रकार परिषद घेवून कार्यक्रमाविषयी माहिती दिली. सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष दत्ता काकडे, राज्यसंघटक अविनाश आव्हाड,जिल्हाध्यक्ष तानाजी गायकर यांनीही यावेळी सरपंच परिषदेविषयी तसेच शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांबाबत माहिती दिली.
सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून काम सुरू आहे. सरंपच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना मानधन द्यावे, सरपंचांमधून एक आमदार प्रतिनिधी निवडावा, कामानिमित्त जिल्ह्याच्या ठिकाणी येणार्‍या सरपंचांसाठी स्वतंत्र कक्ष असावा, आदी जवळपास 25 मागण्यांसाठी सरपंच परिषद काम करत आहे. यातील सरपंच व उपसरपंच यांना मानधन देण्याचे शासनाने मान्य केले आहे. यासंदर्भात शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत शासनाने ऑनलाईन पोर्टल तयार करुन त्याव्दारे ३१ जुलै २०१९ रोजी एका क्लिकने सरपंच यांचे वाढीव मानधन त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
या परिषदेस सरपंच, उपसरपंच यांच्यासह ३५१ पंचायत समितींचे सभापती व राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व जिल्हा परिषदेच्या सभापतींनाही निमंत्रित करण्यात आले आहे. तसे पत्र ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना दिले आहे. या पत्रात सरपंच परिषदेसाठी उपस्थित राहण्यासाठी सरपंच व उपसरपंच यांना प्रवास भत्ताही मंजूर करण्यात आला आहे. परिषदेचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप करण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये सरपंच, उपसरपंच यांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. यामध्ये आदर्श गावांच्या यशोगाथा दाखविण्यात येणार असून सरपंच, उपसरपंच यांच्या प्रश्‍नांसंदर्भात तसेच काम करत असताना ग्रामपंचायतीमध्ये येणार्‍या अडचणींबाबत चर्चा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विविध योजनांचे सादरीकरण करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष दत्ता काकडे, राज्यसंघटक अविनाश आव्हाड,जिल्हाध्यक्ष तानाजी गायकर, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, नाशिक पंचायत समितीचे सभापती रत्नाकर चुंबळे आदि उपस्थित होते.
ग्रामपंचायत निधीतून प्रवासखर्च
या परिषदेसाठी येण्यासाठी सरपंच, उपसरपंच यांना ग्रामपंचायत स्वनिधीतून खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसे परिपत्रक २४ जुलै रोजी ग्रामाविकास विभागाने काढले आहे. त्यानुसार नाशिक जिल्हयातून २८१९ सरपंच, उपसरपंच या परिषदेसाठी उपस्थित राहणार असून, यासाठी ५६ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रतयेक तालुकयातीसाठी संपर्क अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस.यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

समग्र वारली चित्रसृष्टी प्रकल्पालासर्वतोपरी सहकार्य -ना. डॉ. गावित