अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ! बोध नाहीच, चिन्ह कशाचे ? संमेलनापूर्वीच वादविवादांची नांदी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!


बोध नाहीच ; चिन्ह कशाचे ?

   साहित्य संमेलन आणि वादविवाद हे अलीकडच्या काळात समीकरणच झाले आहे. नाशिकमध्ये मार्च महिन्यात ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. त्याची अध्यक्ष निवडप्रक्रिया कोणत्याही
वादाविना सुरळीत पार पडली. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि ख्यातकीर्त विज्ञानलेखक
डॉ.जयंत नारळीकर यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याचे बव्हंशी सर्व स्तरांतून स्वागतच झाले. मात्र वादाची पहिली ठिणगी पडली ती बोधचिन्ह निवडीने. बोधचिन्ह व घोषवाक्यातील अशुद्ध लेखनाने साहित्य महामंडळाच्या कारभारावर टीकेची सरबत्ती सुरु झाली. बोधचिन्हाची स्पर्धा घाईघाईने उरकण्यात आली. त्याला फारशी प्रसिद्धी देण्यात आली नाही त्यामुळे प्रतिसादही मिळाला नाही. मोजक्या ५३ प्रवेशिकांंमधून निवडलेल्या बोधचिन्हातून 'बोध' तर होतच नाही ; मग हे 'चिन्ह' कशाचे म्हणावे असा प्रश्न उपस्थित होतो!
   तसे बघता चित्रे, छायाचित्रे बोलकी असतात. त्यात हजार शब्दांची ताकद सामावलेली असते. तोच वारसा सांगणारे बोधचिन्ह हे सुस्पष्ट, सुसंगत व नेमका बोध घडविणारे असले पाहिजे,नव्हे तीच बोधचिन्हाची प्राथमिक अट असते. प्रभावी बोधचिन्हातून  एका व्यापक  अर्थाने 'संवादी' असले पाहिजे. ते अर्थसुलभ, आकर्षक व दीर्घकाळ स्मरणात राहील असेच असणे अपेक्षित आहे. माणसाचे व्यक्तिमत्त्व जसे त्याच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित होते, तसा उपक्रमाचा हेतू बोधचिन्हातून प्रकट व्हायला हवा. बोधचिन्ह म्हणजे संकल्पनात्मक रचना. विशिष्ट उद्दिष्ट किंवा हेतूचा बोध करून देणारे ते सुस्पष्ट चिन्ह असते. साध्यासोप्या आकारातून ही दृश्यप्रतिमा निर्माण केली जाते.बोधचिन्हाच्या मांडणीत अक्षरशैली, चित्रात्मक प्रतीके, रंगसंगती यांचा कौशल्यपूर्वक वापर होतो. बोधचिन्ह निर्मिती ही सर्जनशीलतेला सर्वांगाने आवाहन करणारी असते. ती डिझाइनची प्रक्रिया असून तिला स्वतंत्र मूल्य आहे. उत्तम बोधचिन्हात दृश्यरचनेची एकात्मता व चिन्हात्मक आशय यांचा सक्षम आविष्कार प्रकट होतो. किंबहुना तसा तो झाला पाहिजे.बोधचिन्ह हा दृकसंवाद कलेचा आविष्कार असतो. त्यामुळे तो तयार करणाऱ्या कलाकाराला पूर्वकालीन-समकालीन अशा बहुपेडी सामाजिक, सांस्कृतिक  व्यवहाराचे  ज्ञान असणे गरजेचे आहे. सर्वसामान्य माणसाला सहजपणे कळेल असे दृश्याकार कल्पकतेने मांडलेले बोधचिन्ह समर्पक ठरते.
    ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी बोधचिन्ह व बोधवाक्य स्पर्धा घेण्यात आली. या राज्यस्तरीय स्पर्धेत केवळ ५३ जण सहभागी झाले; तेथेच संयोजकांचे अपयश अधोरेखित झाले. कोल्हापूर येथील अनंत गोपाळ खासबारदार यांच्या बोधचिन्हाची निवड त्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञांच्या निवड समितीने केली. या निवड समितीत वास्तुविशारद संजय पाटील, चित्रकार राजेश सावंत आणि आनंद ढाकिफळे,
लेखक- नाटयकर्मी दत्ता पाटील आणि प्राजक्त देशमुख या मान्यवरांचा समावेश होता. त्यांनी एकमताने निवड केलेल्या बोधचिन्हाचे गेल्या शनिवारी अनावरण करण्यात आले. आकर्षक व समर्पक असण्याऐवजी ते नेमका बोध घडविण्यात असमर्थ ठरले आहे, हे सखेद नमूद करणे भाग पडते आहे. त्यात प्रथमदर्शनी नाशिकची ओळख सांगणारे काहीच संदर्भ नाहीत. मंत्रभूमीकडून यंत्रभूमीकडे प्रवास करताना महानगरी नाशिकची काळाराम मंदिर, गोदाघाट, नारोशंकर घंटा, द्राक्षे ही  सर्वपरिचित प्रतीके आहेत. निवड समितीने बोधचिन्हाविषयी ओढूनताणून संबंध जुळविणाऱ्या ज्या ओळी खर्च केल्या, त्या समजण्या पलीकडच्या आहेत. या बोधचिन्हात तारीख आणि वर्ष यांचा पत्ताच नाही. खरंतर बोधचिन्ह व घोषवाक्य स्पर्धा स्वतंत्र घेणेच उचित ठरले असते. कारण या दोन्ही पूर्णपणे वेगवेगळ्या सर्जक प्रक्रिया आहेत. पण ते लक्षात न घेता एकत्रच स्पर्धा उरकण्यात आली. त्यामुळे ना आकर्षक बोधचिन्ह मिळाले, ना समर्पक घोषवाक्य हाती आले.
    " साहित्याचा प्रवास हा आनंदाकडून अनंताकडे प्रवाहित होतो. पुस्तकाच्या पानातून पुढे जाणाऱ्या रेषांचे गोदावरीच्या चैतन्यदायी प्रवाहात रूपांतर होते. लोकसंस्कृती व सामाजिक जाणिवा लाटांमधून समृद्ध होतात." असे बोधचिन्हाचे केलेले विवेचन रेषा-आकार यांतून कोठेही सामोरे येत नाही, पटत नाही. बोधचिन्हातील सामाजिक क्रांती आणि नव्या सूर्योदयाच्या क्षितिजाचे वर्णन अस्थानी आहे. सतत प्रवाही असणाऱ्या साहित्याचे प्रतिबिंब तर शोधूनही सापडत नाही. अशावेळी समर्थनार्थ मांडलेले शब्द केवळ पोकळ वारा व निरर्थक शाब्दिक बुडबुडे ठरतात. शुद्धलेखनाच्या चुका आहेत त्या वेगळ्याच. फलकावरही  चुकीचे लिहिले गेले. याला कारण म्हणजे संबंधितांचे अक्षम्य दुर्लक्ष आणि जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून देण्याची प्रवृत्ती. दरम्यान निवड समितीतील तज्ज्ञ खासगीत "माझा तसा याला विरोधच होता", असे सांगत असल्याचे समजते. मग ही सामूहिक जबाबदारी कोणाची, हा प्रश्न उरतोच. त्याचा खुलासाही निवड समितीने करायला हवा. महाराष्ट्रात बोधचिन्ह क्षेत्रात र. कृ. जोशी, यशवंत चौधरी, शांताराम राऊत, उमेश राव, अच्युत पालव तसेच नाशिकमध्ये सुनील धोपावकर, नंदू गवांंदे, अजय हातेकर व इतर अनेक उपयोजित कलाकारांनी मोठे योगदान दिले आहे, हे या निमित्ताने नमूद केले पाहिजे.
---समिक्षक संजय देवधर.
____________________
           संमेलनापूर्वी वादांची नांदी ...
       ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. संमेलन नगरीला ज्ञानपीठ सन्मानित कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांचे नाव देण्यात येणार आहे. तसा निर्णय नुकताच घेण्यात आला. भगूरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाने नाशिक ही स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची जन्मभूमी व कर्मभूमी असल्याने साहित्यनगरीला त्यांचे नाव देण्याची आग्रही मागणी केली होती. तसे निवेदन साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांना देण्यात आले होते. मात्र ते जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप करीत भगूरमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला. सावरकरांप्रमाणेच नाशिकचे सारस्वत वसंतराव कानेटकर, कवी गोविंद, लक्ष्मीबाई टिळक यांचा यथोचित स्मृतिगौरव केला जावा. त्यासाठी मुख्य व्यासपीठ,विविध प्रवेशद्वारे, वेगवेगळी दालने, परिसंवाद, कविसंमेलन, ग्रंथजत्रा यांना त्यांची नावे देता येतील. सर्वांना न्याय मिळेल व नव्याने वाद होणे त्यामुळे टाळता येईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

समग्र वारली चित्रसृष्टी प्रकल्पालासर्वतोपरी सहकार्य -ना. डॉ. गावित