ध्रुव शाखा हा सर्वांना जोडणारा अतूट धागा - डॉ. गोविलकर

न्यूज मसाला वृत्तसेवा,

 ध्रुव शाखा हा सर्वांना 
जोडणारा अतूट धागा
आनंदमेळाव्यात डॉ. गोविलकर यांचे प्रतिपादन
            
           नाशिक ( प्रतिनिधी ):- शताब्दीकडे झेपावणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शहर संघचालकपदाचे दायित्व निभावणे ही मोठी जबाबदारी आहे. डॉ.विजय मालपाठक यांची निवड ते सार्थ ठरवतील व कौशल्याने नेतृत्व करतील. कारण ध्रुव शाखेचे पाठबळ त्यांना असून तो सर्वांना जोडणारा अतूट धागा आहे असे प्रतिपादन श्रीगुरुजी  रुग्णालयाचे अध्यक्ष व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी केले. ते ध्रुव शाखेच्या आनंदमेळाव्यात बोलत होते.

     राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ध्रुव शाखेने दोन वर्षांपूर्वी ५० वर्षे पूर्ण केली. मात्र कोरोनाच्या  लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष शाखा व गाठीभेटी झाल्या नाहीत. रामनवमीच्या निमित्ताने रविवारी नानाराव ढोबळे सभागृहात आनंदमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी नूतन शहरसंचालक डॉ. विजय मालपाठक यांचा सत्कार प्रांत संघचालक नाना जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. विनायक गोविलकर उपस्थित होते. ते म्हणाले, डॉ. मालपाठक यांच्यारूपाने योग्य व्यक्तीची महत्वाच्या पदावर निवड झाली आहे. या पदाला जोडून येणाऱ्या जबाबदाऱ्यांंची त्यांना जाणीव असल्याने ते योग्यप्रकारे अपेक्षा पूर्ण करतील. आताच्या काळात प्रत्येकजण संघाच्या जवळ येऊ पहातो कारण राजकीय परिस्थिती बदलली आहे. असे सांगून त्यांनी श्रीगुरुजी रुग्णालयाच्या सेवा संकल्प समितीच्या कार्याची माहिती दिली. प्रत्येकाने आपल्या सामाजिक वर्तुळाचा उपयोग संघकार्यासाठी करावा तसेच संघप्रेरणेने अनेक प्रकल्प राबवले जातात त्यांच्याशी स्वतःला जोडून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.
     शहर संघचालक डॉ. विजय मालपाठक यांनी डॉ. गोविलकर यांच्याच प्रेरणेने श्रीगुरुजी रुग्णालयात शल्यचिकित्सक म्हणून सेवा देत आहे असे सांगून नवीन दायित्व सर्वांच्या सहकार्याने निभावेन असे नमूद केले. विक्रम थोरात यांनी दि. ८ ते २९ मे दरम्यान नाशिकला भोसलाच्या प्रांगणात होणाऱ्या संघ शिक्षा वर्गाची माहिती दिली. हा वर्ग पर्यावरणपूरक होईल. त्यात स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित प्रदर्शन मांडण्यात येईल असे त्यांनी सांगितले. सुरेश गायधनी यांनी शताब्दी विस्तार अभियानात एक वर्ष विस्तारक म्हणून काम करण्याचे आवाहन सर्वांना केले. प्रांत संघचालक नाना जाधव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून देशभर पसरलेल्या सेवाकार्याच्या जाळ्याची माहिती दिली. समाजाच्या संघाकडून अपेक्षा वाढल्या असून ध्येयपूर्तीकडे वाटचाल करतांना परिवर्तन घडवून आणायचे आहे. त्यासाठी स्वयंसेवकांनी सक्रियता वाढवली पाहिजे व संघविचारांचा विस्तार करायला हवा असे नमूद केले. रवींद्र बेडेकर यांनी वैयक्तिक पद सादर केले. आनंद पाठक यांनी स्वागत, प्रस्ताविक व सूत्रसंचालन केले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

शिक्षक रत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन !