पर्यटनाची मार्गदर्शक 'कार' कीर्द ! माझा कार प्रवास !!पर्यटनाची मार्गदर्शक 'कार' कीर्द !

                (पुस्तक परीक्षण)
   पर्यटनाचे महत्त्व समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात देखील सांगितले आहे. सांस्कृतिक देवाणघेवाण करण्यासाठी पर्यटनाचा चांगला उपयोग होतो. देशाच्या विविध भागातील संस्कृती, इतिहास, निसर्ग सौंदर्य, तेथील जीवनशैली, खाद्यविशेष यांची पर्यटनामुळेच ओळख होते. पर्यटन केवळ मौजमजा, विरंगुळा, मनोरंजन इतक्यापुरतेच मर्यादित नाही. आपल्या भारतात विविधतेतली एकता बघायला मिळते. गड-कोट, मंदिरे, लेणी, समुद्रकिनारे, थंड हवेची ठिकाणे अशा अनेक ठिकाणी पर्यटकांची कायम गर्दी असते. साहसी पर्यटन देखील केले जाते. आपल्या आनंदासाठी कारने प्रवास करणाऱ्या पर्यटकांना ' माझा कार प्रवास ' हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.

    अमरावतीचे विजय पाटणे पर्यटनप्रेमी आहेत. त्यांनी कारमधून प्रवास करून महाराष्ट्रासह बव्हंशी सारा देश पिंजून काढला. शेजारच्या नेपाळलाही ते कारने प्रवास करूनच भेट देऊन आले. 'माझा कार प्रवास' या पुस्तकामधले या सर्व भटकंतीचे वर्णन वाचताना वाचकांना नक्कीच प्रवासाची अनुभूती मिळेल. 'बीएसएनएल'मध्ये उपविभागीय अभियंता पदावरून निवृत्त झालेल्या विजय पाटणे यांना पर्यटनाचा छंद आहे. त्यांनी कारमधून केलेल्या पर्यटनाचे वर्णन लॉकडाऊनच्या काळात फक्त २९ दिवसांत लिहून काढले. गेल्या वर्षी २७ एप्रिल ते २४ मे दरम्यान त्यांनी १० वर्षांमध्ये केलेल्या प्रवासांची वर्णने लिहिली. डिझायर व सॅन्ट्रो कारने १ लाख ८ हजार कि.मी. पेक्षा जास्त प्रवास स्वतः ड्रायव्हिंग करून केला.  काही वेळा मात्र लांबच्या, खडतर प्रवासासाठी ड्रायव्हर बरोबर घेतला. ते म्हणतात की, कार प्रवासाने आत्मविश्वास वाढतो, प्रत्येक वेळी नवे अनुभव, नवीन मजा, प्रसन्नता मिळवता येते. त्यांच्या अशा रंजक अनुभवांना अमरावतीच्या शब्दजा प्रकाशनाने पुस्तकरूप दिले आहे. 
 पाटणे यांनी कुटुंबियांसमवेत केलेल्या विविध भागांतील प्रवासाची, धार्मिक, सांस्कृतिक, तसेच राजस्थान, गुजरात व नेपाळमध्ये केलेल्या पर्यटनाची माहिती या पुस्तकात अत्यंत सोप्या आणि रसाळ भाषेत दिली आहे. यातील तपशील अनेक हौशी पर्यटकांना उपयुक्त ठरतील. अगदी थोड्या वेळात त्यांनी ११ प्रकरणे ओघवत्या भाषेत लिहिली आहेत. प्रत्येक सहलीचा किलोमीटरसह रोड मॅप दिला आहे. केलेल्या एकूण २८१४९ किलोमीटर  प्रवासाचे वर्णन यात आढळते. एकंदर १५२ स्थळांचे दर्शन वाचकांना घडते. 
    एकेकाळी पाटणे एका दिवसात ६०० कि.मी.पेक्षा जास्त ड्रायव्हिंग स्वतः करायचे. निवृत्तीनंतर वयपरत्वे त्यांनी ते प्रमाण निम्म्यावर आणले आहे. त्यांचे विविध सल्ले, सूचना इतरांना मार्गदर्शक ठरतील. पुस्तकात पहिलेच प्रकरण राजस्थानातील जैसलमेर व परिसरातील प्रवासवर्णनाचे आहे. प्रारंभापासून ज्या मार्गाने पाटणे गेले तो सर्व मार्ग त्यांनी बारकाव्यांसह दिला आहे. वाटेतील बडोदा, अहमदाबाद, माउंट अबू, जोधपूर यांचेही वर्णन केले आहे. प्रत्येक महत्त्वाच्या दोन टप्प्यांमधील अंतर व प्रवासाला लागलेला एकूण कालावधी दिला आहे. प्रत्येक ठिकाणी संध्याकाळी पोहोचून मुक्काम करण्याची व पुन्हा सकाळी लवकर पुढील प्रवासाला निघण्याची त्यांची सवय सर्व पर्यटकांसाठी अनुकरणीय ठरावी अशीच आहे. 
जैसलमेरचे किल्ले, पॅलेस, हवेली, मंदिरे  त्यावरील नक्षीकाम, वाळवंट सफारी, राजस्थानी दालबाटीचे जेवण यांची वर्णने वाचकांना आवडतील. दुसऱ्या नेपाळ प्रवासाच्या प्रकरणात ड्रायव्हर घेऊन केलेल्या ३३६३ कि.मी. प्रवासाचे वर्णन आहे. यात त्यांनी प्रवासापूर्वी कोणकोणती पूर्वतयारी करावी हे सविस्तरपणे सांगितले आहे. १० प्रकारचे किट्स कसे तयार करून घ्यावेत, हे देखील तपशीलवार दिले आहे, ते उपयुक्त ठरेल. तिसरे प्रकरण द्वारका बेटाचे आहे. ३१५० कि.मी.च्या या प्रवासात तेथील द्वारकाधीश मंदिर तसेच वाटेतील नागेश्वर हे ज्योतिर्लिंग, पुढे पोरबंदर, वेरावळ, सासनगीर अभयारण्य, सोरटी सोमनाथ मंदिर व परतताना दीव हा केंद्रशासित प्रदेश यांचेही वर्णन आढळते. चौथ्या प्रकरणात जयपूर, आग्रा, मथुरा या ३१५० किलोमीटर प्रवासाचे वर्णन आहे. ते वाचनीय झाले आहे.
   पाचवे प्रकरण जगन्नाथपुरी, कोणार्कचे आहे. २५३८ किलोमीटर प्रवासाची त्यात थोडक्यात माहिती मिळते. तिरुपती बालाजी या सहाव्या प्रकरणात सोलापूर, हैदराबाद, श्रीशैल्यम, मंत्रालय यांचेही वर्णन आहे. ३ हजार कि.मी.पेक्षा जास्त प्रवासात कोणती खबरदारी घ्यावी याविषयी पाटणे यांनी योग्य सूचना दिल्या आहेत. श्रीबालाजी समोर मिनिटभर देखील थांबून दर्शन घेता येत नाही, ही त्यांनी व्यक्त केलेली रुखरुख सर्वांचीच असते. सातव्या चित्रकूट, वाराणसी या प्रकरणात ऑटो रिक्षाने एक दिवसात चित्रकूटच्या १० स्थळांना भेट दिल्याचे लिहिले आहे. वाटेत अलाहाबादला धावती भेट देऊन वाराणसीमध्ये मुक्काम करून काशी विश्वेश्वराच्या दर्शनाने कृतकृत्य झाल्याचे लिहिले आहे. २०५० कि.मी.चा हा प्रवास त्यांनी ११ दिवसांत पूर्ण केला. आठवे प्रकरण मुर्डेश्वर, गोकर्ण महाबळेश्वर या १४०० कि.मी. तीन दिवसांत पार केलेल्या कर्नाटकातील प्रवास वर्णनाचे आहे. नवव्या प्रकरणात पाटणे यांनी त्यांच्या सासूबाईंना पंढरपूर, गाणगापूर, तुळजापूर, अक्कलकोट यात्रा घडवून आणली त्याचे वर्णन आहे. दहाव्या प्रकरणात मित्रांबरोबर गणपतीपुळे, राधानगरी, कोल्हापूर तसेच ज्योतिबा, पन्हाळगड, नरसोबावाडी येथे केलेल्या ट्रिपचे वर्णन आढळते. शेवटच्या ११ व्या प्रकरणात समर्थ रामदास स्वामींनी स्थापित केलेल्या ११ मारुतींची माहिती वाचकांना मिळते. सातारा जिल्ह्यातील चाफळ परिसरातील व कोल्हापूर, सांगली भागातील या मारुतींचे दर्शन ५५० किलोमीटर प्रवासातून घेता येते. एकूणच पुस्तक वाचताना हातातून खाली ठेवावेसे वाटत नाही. मात्र पुस्तकातील लिखाणाचे व्यवस्थित मुद्रितशोधन होणे गरजेचे असते व काटेकोरपणे संपादन व्हावे लागते. तरच पुस्तक निर्दोष व परिपूर्ण होते. काही रंगीत छायाचित्रे पुस्तकात असूूून ती अधिक सुस्पष्ट असायला पाहिजेत. या त्रुटींकडे लेखक, प्रकाशक यांनी लक्ष देणे आवश्यक होते, असे वाटते. पुढील आवृत्तीत दक्षता घ्यावी. 
  'माझा कार प्रवास'
लेखक: विजय पाटणे
शब्दजा प्रकाशन 
वितरक: बुकर्स,अमरावती
मूल्य - ₹ २१०

                                           -संजय देवधर
 ( वरिष्ठ पत्रकार आणि कलासमीक्षक, नाशिक )


             

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

एकदा सर्वांनी कवयित्री फरझाना इकबाल यांची पंढरीच्या "विठ्ठलाच्या भेटीसाठी मन विठाई विठाई" रचना ऐकायला हवी !

महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड चे प्रमाणपत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते प्रदान ! "बातमी अशी कुठे असते का" ची घेण्यात आलेली दखल !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!