शाश्वत विकासाचा संकल्प,. गरिबीचे उच्चाटन, पृथ्वीच्या रक्षणाची शपथ !

ग्रामपंचायतींकडून शाश्वत विकासाचा संकल्प

पंचायत राज दिनी ग्रामसभेत होणार ठराव : गरिबीचे उच्चाटन, पृथ्वीच्या रक्षणाची शपथ


नाशिक : गरिबीचे उच्चाटन करणे, पृथ्वीच्या रक्षण करणे आणि २०३० पर्यंत सर्व नागरिकांना शांतता व समृध्दी प्राप्त करून देणे, यासाठी पंचायत राज संस्था कटिबध्द असून येत्या  २४ एप्रिल २०२२ रोजी प्रत्येक ग्रामपंचायत शाश्वत विकासाचा संकल्प सोडणार आहे, तसेच केंद्र सरकारच्या व्हायब्रंट ग्रामसभा पोर्टल डॅशबोर्ड वर याबाबतची माहिती प्रसिध्द केली जाणार आहे.

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत केंद्र शासनाने नव्याने सुधारणा केली आहे त्यानुसार सन २०२२-२३ पासून शाश्वत विकासाच्या ध्येयाची पंचायत राज यंत्रणेमार्फत प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. शाश्वत विकासाच्या दृष्टीने जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्र संघाने जी ध्येये निश्चित केली आहेत, ती साध्य करण्यासाठी पंचायत राज संस्थांचे योगदान महत्वाचे ठरणार आहे. जागतिक स्तरावर निश्चित करण्यात आलेल्या १७ पैकी ९ संकल्पना / विषय (Themes) केंद्र शासनाने निश्चित केल्या आहेत.
*******************************

        या संकल्पना खालील प्रमाणे : 
१) गरिबी मुक्त आणि उपजीविका (रोजगार) वृध्दीस पोषक गाव,
गरीबीमुक्त ग्रामपंचायत, म्हणजे अशी ग्रामपंचायत जी सर्वांना समाजिक संरक्षण उपलब्ध करून देईल आणि गरीबी रेषेच्या वर आलेली कुटुंबे पुन्हा गरीबी रेषेखाली जाणार नाहीत याची खात्री करेल. सर्वांसाठी विकास आणि समृध्दी व शाश्वत उपजिवीका उपलब्ध असेल असे गांव निर्माण करणे.
२) आरोग्यदायी गाव
  सर्व वयाच्या अबाल वृद्ध नागरीकांना उत्तम आरोग्य आणि क्षेमकुशलता मिळवून देणारे गांव
३) बालस्नेही गाव
सर्व बालकांना त्यांना पूर्ण क्षमतेने जगण्याचा विकासाचा सहभागाचा आणि संरक्षणाचा अधिकार प्राप्त करून देणारे गांव निर्माण करणे.
४) जल समृध्द गाव
सर्व नागरीकांना वापरातील वैयक्तीक घरगुती नळ जोडणी: स्वच्छ व पुरेसे पिण्यायोग्य पाणी; उत्तम दर्जाचे पाणी व्यवस्थापन, गावातील शेती व सर्व गरजांसाठी मुबलक पाण्याची उपलब्धता तसेच पाणी परिसंस्थेचे / शिवारातील भूजल साठ्यांचे जतन व संवर्धनासाठी एकत्रितपणे काम केले जाईल असे गांव
५) स्वच्छ आणि हरित गाव
जेथे बालकांना उज्वल भवितव्य असेल, जे स्वच्छ असेल, हिरवेगार आणि निसर्गसंपन्न असेल, जेथे अपारंपारीक उर्जेचा वापर केला जाईल, जेथे पर्यावरणाचे संरक्षण केले जाईल, जे पर्यावरणपूरक असेल असे गांव निर्माण करणे.
६) पायाभूत सुविधा युक्त स्वयंपूर्ण गाव
स्वयंपूर्ण पायाभूत सुविधांनी युक्त गाव, सर्वांना पुरेशी, सुरक्षित आणि परवडणारी घरे आणि मूलभूत सेवा उपलब्ध करून दिल्या जातील असे गांव
७) सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव
सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत सर्व पात्रताधारक लाभार्थ्यांना सामावून घेणे, गावातील प्रत्येक नागरिकाची गावात काळजी घेतली जात असल्याची भावना निर्माण करणे
८) सुशासन युक्त गाव
गावातील सर्व लोकांना विविध विकास योजनांचा लाभ देता येईल अशी जबाबदार सेवा हमी देणारे, ग्राम सुशासनाची हमी असणारे गाव.
९) लिंग समभाव पोषक गाव
गावात लैंगिक समानता, सर्वांना समान संधी प्रदान करणे, महिला सक्षमीकरण आणि मुलींसाठी सुरक्षित वातावरण यासारखी विकास मूल्ये साध्य करणे.  
*********************************
२४ एप्रिल हा दिवस देशपातळीवर पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी ग्रामसभेचे आयोजन करून ९ पैकी किमान १ व जास्तीत जास्त ३ संकल्पनाची निवडाव्यात. त्या दृष्टीने काम करण्याचा शपथपूर्वक संकल्प करावा आणि निवडलेल्या संकल्पनांची माहिती "व्हायब्रंट ग्रामसभा पोर्टल डॅशबोर्ड" येथे ऑनलाईन पध्दतीने सादर करावी असे निर्देश जिल्हा परिषदेच्या प्रशासक लीना बनसोड यांनी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांना दिले होते यावर कार्यवाही करत जिल्ह्यातील १३८४ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांची कार्यक्रम पत्रिका ही व्हायब्रंट ग्रामसभा पोर्टल डॅशबोर्ड येथे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात आली असून ग्रामसभा झाल्यानंतर त्याचा अहवाल देखील या पोर्टलवर टाकला जाणार आहे.
दरम्यान देशभरातील विविध ग्रामपंचायतींमधून झालेल्या चांगल्या कामांची माहिती देशभरातील सर्व ग्रामपंचायतींना व्हावी, या हेतूने ११ ते १७ एप्रिल २०२२ या कालावधीत नवी दिल्ली येथे आयकॉनिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत, शिरसाटे या ग्रामपंचायतींने स्वच्छ आणि हरित गाव या संकल्पनेवर सादरीकरण राष्ट्रीय स्तरावर केले आहे.
*********************************
“ग्रामसभांच्या परिणामकारक संचालनासाठी ग्रामपंचायतींनी ग्रामसभेतील उपक्रमांची माहिती "व्हायब्रंट ग्रामसभा पोर्टल डॅशबोर्ड" येथे ऑनलाईन पध्दतीने अद्ययावत करावी व शाश्वत विकासाच्या संकल्प ठरावाबरोबरच आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी देखील ग्रामसभेत सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे”. 
लीना बनसोड, 
प्रशासक, जिल्हा परिषद नाशिक.

**************************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

शिक्षक रत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन !