साप्ताहिक न्यूज मसाला ची वाटचाल एक सकारात्मक पत्रकारितेची !


साप्ताहिक न्यूज मसाला ची वाटचाल एक  सकारात्मक पत्रकारितेची !
   
          सन २०१२ मध्ये न्यूज मसाला या साप्ताहिकाला प्रारंभ झाला. काही उद्दिष्टे व पथ्ये ठरवून व ती नेटाने पाळून वाटचाल करण्यात आली. सकारात्मक पत्रकारितेला यंदा बारा वर्षे म्हणजे एक तप पूर्ण करतांना राजकीय उलथापालथ, सामाजिक स्थित्यंतरांचा अनुभव आपण घेतला. तीन वर्षांपूर्वी जागतिक महामारी कोरोना सारख्या संकटाला तोंड देत आपली सर्वांची वाटचाल कधी सुखाचे क्षण तर कधी दु:खाचे चटके सोसत झाली. आयुष्यातील जगण्याचे निकष बदलत गेले. अनेकांनी आपले आप्तस्वकीय, स्नेही गमावले. काहींनी संकटाला संधी मानून लुबाडणूक केली. मानवी स्वभावाचे नमुने समजले. एका सूक्ष्म विषाणूच्या संसर्गामुळे बऱ्यावाईट अनुभवांनी खूप काही शिकवले. हे नमूद करताना मनाच्या संमिश्र भावनांचा सर्वसामान्यांसोबत परामर्श घेत आहोत.  न्यूज मसाला साप्ताहिक कायमच न डगमगता वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवीत आहे.
         एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस हा त्याच्या आयुष्यातील आनंदाचा ठेवा असतो.  सिंहावलोकन करण्याचा क्षण असतो. त्याचबरोबरीने जीवनात काय कमावले ? काय गमावले याचा ताळमेळ जमवण्याचाही प्रयत्न केला जातो. पुढील संकल्प देखील केले जातात. त्याचवेळी आयुष्यातील एक वर्ष संपल्याची हुरहूर देखील असते. याहीवर्षी आपला वर्धापनदिन साजरा करतांना वाचकांशी हितगूज करतांना विशेष समाधान आहे ते सर्वांच्या आशीर्वादाचे, सहकार्याचे आणि आपुलकीच्या स्नेहसुगंध दरवळत रहाण्याचे ! एक नमूद करावेसे वाटते. जाहिरात हा कोणत्याही वृत्तपत्र, साप्ताहिकाचा प्राणवायू असतो. तो नसेल तर जसे श्वास घेणे, जगणे मुश्कील असते तसेच जाहिराती शिवाय वृत्तपत्र, साप्ताहिक चालवणे कठीण कर्म होऊन बसते. अलीकडच्या काळात जाहिरातींचा ओघ मंदावला असून त्याचा फटका मोठमोठ्या वृत्तसमूहांना बसला आहे. अश्यावेळी वृत्तपत्र, साप्ताहिक टिकवणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. याचे भान आपण सर्वांनी बाळगायला हवे. वेळोवेळी आपली जाहिरात देऊन न्यूज मसालाचे बळ‌ वाढवले पाहिजे. ते तुमच्या हातात आहे.
        संस्था असो वा वृत्तपत्र ! वर्धापनदिनी  विकासाचा, प्रगतीचा धांडोळा घेतलाच पाहिजे. अकरा वर्षात असंख्य माणसे जोडून न्यूज मसाला श्रीमंत झाला तो लोकसंग्रहामुळे हे नमूद करतांना अभिमान वाटतो. मागील तीन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे नव्हे तर आजतागायत कोणत्याही औपचारिक सोहळ्याला पूर्णपणे फाटा देण्यात आला. मात्र वाचक, हितचिंतक यांच्याशी अग्रलेखाद्वारे व‌ विविध लेखांद्वारा संवाद साधतांना कायमच आनंद व  समाधान मिळाले. आम्ही दरवर्षी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवतो. शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना विनामूल्य भोजन दिले जाते. त्याबरोबरच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते, आरोग्य दूतांना टी-शर्ट वाटप, याशिवाय वाचनालयांंना पुस्तके, ग्रंथ देणगी स्वरूपात दिले जातात. दिवाळीत आदिवासी पाड्यांवर फराळ वाटप, तसेच कपड्यांचे वितरण करून त्यांच्याशी नाते जोडले जाते. कोरोनाच्या काळात मास्क, सॅनिटायझर, तसेच गरजूंना आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले ते सामाजिक बांधिलकीच्या भावनेने. पत्रकारिता हे समाज प्रबोधनाचे प्रमुख व महत्वाचे माध्यम आहे. लोकशाही समाज व्यवस्थेतील चार स्तंभापैकी पत्रकारिता हा महत्वाचा स्तंभ आहे. सध्याच्या परिस्थितीत परस्परांबरोबरच समाजमाध्यमांशी स्पर्धा वाढली आहे. त्यात टिकून राहाणे हे आव्हानच झाले आहे. आम्ही शासकीय अधिकारी, वार्षिक वर्गणीदार, हितचिंतक यांच्या बळावर येथवर टप्पा गाठला आहे. आज त्यांचे ॠण व्यक्त करणे क्रमप्राप्त ठरते.
       विकास व सामाजिक पत्रकारिता हेच आमच्या प्रत्येक अंकाचे व "लोकराजा"  दीपावली विशेषांकाचे वैशिष्ट्य ठरले आहे. सामाजिक, सांस्कृतिक विषयांना प्राधान्य दिले जात असल्याने वाचक कायमच पाठबळ देतात. सध्या महाराष्ट्रात शेकडो नियमित मराठी साप्ताहिके प्रकाशित होतात. बहुतेक साप्ताहिकांंचे कालांतराने दैनिकात रूपांतर होते. पण बदलत्या परिस्थितीत मराठीतल्या बऱ्याचशा साप्ताहिकांंचा परिघ आक्रसलेला दिसतो. अश्यावेळी टिकून राहणे महत्वाचे ठरते. दरम्यान बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत वाचकांना न्यूज मसाला साप्ताहिक ऑनलाईन ( www.newsmasala.in ) वरही उपलब्ध करून देण्यात आले आहे. या वेब पोर्टलचा देखिल सातवा वर्धापनदिन साजरा करतांना विशेष आनंद होतो. यापुढेही सर्वांचे असेच किंबहुना वाढते सहकार्य लाभेल हा विश्वास आहे. आपण दिलेल्या शुभेच्छांचा सतत आदर व स्विकार करतांना आनंद होतो ! चांगली सकारात्मक दृष्टिकोन देणारी मराठी वृत्तपत्रे, साप्ताहिके सध्याच्या संकटावर मात करीत आहेत. हा संक्रमणकाळ आव्हानात्मक आहेच, त्याचबरोबर अस्तित्वाची, चिकाटीची परीक्षा पहाणाराही आहे. अश्यावेळी आम्हाला हवी आहे ती सर्वांची सक्रिय साथ ! आपण जाहिरात रूपाने व सहकार्याचा हात पुढे देऊन ती पूर्ण  कराल ही खात्री आहे. आमच्या कार्याला सार्थ ठरवाल हा विश्वास देखील तुम्हीच वेळोवेळी दिला आहे.
                                                                  संजय देवधर
    सहसंपादक, न्यूज मसाला
***********************
अनेक लेखक जोडून वाचकांशी जपली बांधिलकी !
सप्ताहिक न्यूज मसालाने गेल्या बारा वर्षात अनेक दर्जेदार लेखकांना जोडले आहे.त्यांचे कसदार लेखन वाचकांना नेहमीच प्रेरणा देते. नवनवे विषय हाताळून वाचकांना
सकस, वाचनीय साहित्य उपलब्ध करून दिले जाते. नाशिकमधील साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील  घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. हे करीत असतांना गुन्हेगारी घटना, घातपात, किळसवाणे राजकारण यांना स्थान कधीच दिले नाही. दिले जाणारही नाही. म्हणूनच आम्ही वाचकांशी बांधिलकी जपली आहे. यंदाच्या "लोकराजा" दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर अयोध्येतील राममंदिराचे संकल्पचित्र प्रकाशित केले. वाचकांनी त्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. त्यासोबत दिलेल्या राम मंदिराचे संकल्पचित्र छायाचित्र अनेकांनी फ्रेम करून घराघरात लावली. असेच प्रेम, सहकार्य, पाठिंबा यापुढील वाटचालीत मिळत राहील हा विश्वास आहे.
***********************
मदतीचा अखंड स्रोत... !
   नाशिक जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांच्या आवाहनानुसार कोरोना काळात ५२ हजार रुपयांची पुस्तके न्यूज मसाला परिवारातर्फे नासिक जिल्हा परिषदेस भेट दिली. तसेच सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल व जिल्हा रुग्णालयातील दाखल रुग्णांच्या नातेवाइकांना दरवर्षी अन्नदान, ११ व्या वर्धापनदिन २०२३ निमित्ताने  जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेस २६४ विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप व सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे यावर्षी सांजेगाव येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेस दोनशे पन्नास विद्यार्थ्यांना पुरेल असे वॉटर पुरिफायर व पिण्याच्या पाण्याची टाकी देण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !