वारली कलेने आदिवासी महिलांना व्यक्त होण्याची संधी दिली - श्रीमती लीना बनसोड, ( मुकाअ जिल्हा परिषद )


  न्यूज मसाला वृत्तसेवा,
नासिक,.  7387333801

         वारली कलेने आदिवासी महिलांना 
व्यक्त होण्याची संधी दिली - बनसोड
         नाशिक ( प्रतिनिधी ) :- महाराष्ट्राची वारली कला जगभरात पोहोचली आहे. या कलेने आदिवासी महिलांना व्यक्त होण्याची संधी दिली. त्यांनीही ११०० वर्षांची परंपरा जतन केली. वारली चित्रे दिसतात तेव्हढी सोपी नसतात. प्रत्यक्ष करतांना ते समजते. अनेक कलाकारांनी सुंदर वारली चित्रे रेखाटून प्रदर्शनात मांडली आहेत. पत्रकार व वारली चित्रकलेचे अभ्यासक संजय देवधर यांनी या उपक्रमाद्वारे त्यांना प्रकाशात आणले असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांनी केले.

   वारली आर्ट फाउंडेशन आणि पीएनजी आर्ट इनीशीटिव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने समूह वारली चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. नाशिकरोडच्या पु.ना. गाडगीळ अँड सन्सच्या कलादालनात या प्रदर्शनाचे उद्घाटन काल महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने करण्यात आले. उद्घाटक लीना बनसोड व प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, रंगकर्मी सतीश मोहोळे तसेच व्यवस्थापिका प्रविणा दुसाने आदी मान्यवर उपस्थित होते. संयोजक संजय देवधर यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. ते म्हणाले,  वारली कला ही महाराष्ट्राने जगाला दिलेली कलात्मक देणगी आहे. दोन भागात हे चित्रप्रदर्शन होणार असून दुसरे वारली चित्रप्रदर्शन दि.१० ते १७ मे दरम्यान होईल. दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. लीना बनसोड कलाकारांचे कौतुक करून पुढे म्हणाल्या, ओरिसातील साओरा, बिहारमधील मधुबनी तसेच परदेशातील विविध कला व वारली कलेत अनेक साम्यस्थळे आहेत. मी माझ्या घरात वारली चित्रे रंगवून घेतली आहेत. बोहाड्याचे मुखवटे मांडले आहेत. आपल्या कलांविषयी आस्था बाळगून त्यांचे जतन करणे हे प्रत्येक कलाकाराचे कर्तव्य आहे असे त्यांनी नमूद केले. 

   सतीश मोहोळे म्हणाले, वारली कलेचा सुंदर आविष्कार मन प्रसन्न करतो, सकारात्मक ऊर्जा देतो. वारली कलेत संपूर्ण निसर्ग, पर्यावरण सामावलेले आहे. संजय देवधर एक मिशन म्हणून वारली कलेचे संवर्धन करीत आहेत. कोणत्याही कला जिवंत ठेवण्यासाठी कलांवर श्रद्धा, प्रेम असावे लागते असे त्यांनी नमूद केले. प्रविणा दुसाने यांनी आतापर्यंत ३० चित्रप्रदर्शने झाल्याचे सांगून सहभागी कलाकारांच्या कलाकृतींविषयी समाधान व्यक्त केले. अपूर्वा भंडारे, सोमेश्वर मुळाणे, हर्षदा माळी, पद्मजा ओतूरकर या कलाकारांनी मनोगत व्यक्त केले. सुप्रिया देवधर हिने सूत्रसंचालन केले. डॉ. मंगला वाघमारे यांनी आभार मानले. हे प्रदर्शन दि. ८ मे पर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील. नाशिककर कलारसिकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
                           चौकट
 या कलाकारांचा आहे सहभाग !
    पेशाने वकील असणाऱ्या अपूर्वा भंडारे, इंटिरिअर डिझाइनर स्नेहल बंकापुरे, शुभश्री चित्राव, आदिवासी वारली चित्रकार विलास देवळे, शिक्षिका सुप्रिया देवधर, डांग परिसरातील गौरवी घोडके, इंजिनिअर हर्षदा माळी,  वयोवृध्द आबा मोरे, सुप्रसिद्ध रांगोळी कलावंत सोमेश्वर मुळाणे, कलाप्रेमी पद्मजा ओतूरकर, वारली कलेत आगळेवेगळे प्रयोग करणारे  रविंद्र वैष्णव, डॉ. मंगला वाघमारे यांनी विविध विषयांवर वारली चित्रे रंगवली आहेत. या प्रदर्शनाच्या निमित्ताने दि.५ ते ८ मे दरम्यान दररोज एक दिवसांच्या वारली चित्रसृष्टी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. सकाळी ११ ते दुपारी ५ पर्यंत होणाऱ्या या सशुल्क कार्यशाळेत १० ते ७० या वयोगटातील कलाप्रेमींना सहभागी होता येईल. नावनोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ९४२२२७२७५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

शिक्षक रत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन !