शेकोटी संमेलनातून होणार लोककलेचा जागर- डॉ. शंकर बोऱ्हाडे


शेकोटी संमेलनातून होणार लोककलेचा जागर- डॉ. शंकर बोऱ्हाडे

             नाशिक (प्रतिनिधी) साहित्य आणि संस्कृतीचा नाशिकला जसा वारसा आहे तसाच तो लोककलेचाही आहे.नाशिकने जसे साहित्याला साहित्यिक दिले तसेच शाहीर आणि लोककलावंतही दिलेत. बदलत्या काळात मात्र लोककला हळूहळू लोप पावतील की काय अशी भीती वाटत असते पण गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी यासाठी अनोखे पाऊल उचलले आहे. आपल्या नियोजनबद्ध आयोजनासाठी प्रसिद्ध असलेल्या गिरणा गौरव प्रतिष्ठानने नाशिकमध्ये आगळ्या वेगळ्या शेकोटी संमेलनाचे आयोजन केले असून या संमेलनातून लोककलांचा जागर होणार आहे. या पहिल्या वहिल्या साहित्यसंमेलनाचा मी अध्यक्ष असल्याचा मला नक्कीच अभिमान वाटतो असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी केले. ते भावबंधन मंगल कार्यालयात शेकोटी संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाल्याच्या प्रित्यर्थ आयोजित सत्कार सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना बोलत होते. मंचावर शेकोटी साहित्य संमेलनाचे निमंत्रक आर्कि. बाळासाहेब मगर, सावाना चे पदाधिकारी जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर व गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार उपस्थित होते. 
    डॉ. बोऱ्हाडे पुढे म्हणाले की, साहित्य हे कायम समाजाला दिशा देण्याचे काम करते.शेकोटी संमेलनही एक नवी दिशा देईल याची मला खात्री आहे. जातेगावकर यांनी या संमेलनात स्वतः लक्ष घालून संमेलनाचे यशस्वी आयोजनात सक्रिय सहभाग राहील असे सांगून त्यासाठी सावाना आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे सांगितले. संजय करंजकर यांनी आखीलभारतीय साहित्यसंमेलनाप्रमाणे शेकोटी संमेलन यशस्वी करू व त्यासाठी आपण सर्वजण प्रामाणिक प्रयत्न करू असे आवाहन केले. बाळासाहेब मगर यांनी भावबंधन कार्यालय या शेकोटी संमेलनासाठी सज्ज असून कोणतीही कमतरता राहणार नाही असे उपस्थितांना आश्वासन दिले.सुरेश पवार यांनी दोन दिवसीय संमेलनात काय काय असेल याची रूपरेषा मांडली. आदिवासी लोकसंस्कृती, लोकपरंपरा, निमंत्रितांचे कविसंमेलन, खुले कविसंमेलन, गझल मुशायरा, परिसंवाद, कथाकथन , थाळगाणं, ढाकाभक्ती, शाहिरी, पोवाडे असे भरगच्च कार्यक्रम असल्याचे सांगितले. या संमेलनात स्मिता पाटील शब्दपेरा पुरस्कार, निळूभाऊ फुले साहित्य पुरस्कार, नाशिकजिल्ह्यामधील साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन व प्रदर्शनही असणार आहे. गिरणागौरव प्रतिष्ठानला या शेकोटी संमेलनासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व साहित्यिक संस्था सक्रिय सहकार्य करणार असल्याने या सर्व संस्थांचे प्रमुख आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी कवी राजेंद्र सोमवंशी, प्रशांत केंदळे, संतोष वाटपाडे, राजेंद्र उगले, माणिक गोडसे, गोरख पालवे, अरुण घोडेराव, तु. सी. ढिकले, अलका येवले, अलका कुलकर्णी, अलका दराडे, बाळकृष्ण देवरे, रफीक शेख, अंजना भंडारी, सोमनाथ मुठाळ, प्रशांत कापसे, रामचंद्र शिंदे, नरेंद्र पाटील, पुंजाजी मालुजंकर, माणीकराव गोडसे, डॉ. यशवंत पाटील, विशाल टर्ले, विलास पंचभाई यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सोनार यांनी केले तर राजेंद्र उगले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !