ग्रामपंचायतीला एक कोटींचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त !

ग्रामपंचायतीला एक कोटींचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त !

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत नाशिक जिल्ह्याची विभागस्तरावर दिमाखदार कामगिरी

ग्रामपंचायत दुगांवला १ कोटींचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार
नाशिक : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२५-२६ अंतर्गत नाशिक जिल्ह्याने विभागस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत यशाचा नवा टप्पा गाठला आहे. नाशिक विभागस्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धेत नाशिक तालुक्यातील दुगांव ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावत १ कोटी रुपयांचा मानाचा पुरस्कार मिळविला आहे.
            ग्रामविकास व पंचायत राज विभाग आणि जिल्हा परिषद, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० अंतर्गत विभागीय पुरस्कार वितरण सोहळा २०२५-२६ व 'सरपंच परिसंवाद – दुष्काळावर मात, समृद्ध गावाचा संकल्प' ही विभागीय कार्यशाळा अहिल्यानगर येथील नगर कल्याण रोडवरील द्वारका लॉन येथे आयोजित करण्यात आली होती.
        या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार मोनिका राजळे, आमदार विक्रमसिंह पाचपुते, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
     या सोहळ्यात नाशिक विभागस्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारांतर्गत दुगांव ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचा १ कोटी रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या यशामुळे नाशिक जिल्ह्याच्या ग्रामविकासाभिमुख कार्याला विभागस्तरावर विशेष गौरव प्राप्त झाला आहे.
           ग्रामपंचायतीने लोकसहभागातून राबविलेली विकासकामे, प्रशासकीय कार्यक्षमता, विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले नियोजनबद्ध प्रयत्न हे या यशाचे महत्त्वाचे आधार ठरले आहेत.
     या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दुगांव ग्रामपंचायतीचे सरपंच  ज्ञानेश्वर गवे, उपसरपंच हरिभाऊ धोंडगे, शशिकांत वाघ, सदस्य कमल घोडे, सौ. पुष्पा जाधव, सदस्य, सागर गवे सदस्य, सुनिल थेटे, विष्णु वाघ, ग्रामपंचायत अधिकारी  बाळासाहेब बोराडे व कर्मचारी आणि ग्रामस्थांचे अभिनंदन केले असून, यापुढेही लोकसहभागातून गावांच्या सर्वांगीण विकासाची चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेतकऱ्यांना मर्यादित अनुदानावर ट्रॅक्टर, रोटॅव्हेटर, कडबाकुट्टी यंत्र व विद्युत पंपसंच या साहित्याचा लाभ देण्यासाठी योजना.

मधुकर वाडू संशोधक कलावंत; अभ्यासू साहित्यिक. यशोगाथेचा परीपाठ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात- पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश. ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन करा