आम्ही भारतीय कुणाच्या वाट्याला जात नाही पण आमच्या वाट्याला कुणी गेलं तर त्याला सोडत नाही- खा.शरद पवार ! शेतकरी विरोधी सरकारला हद्दपार करण्यासाठी भुजबळांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन खा.शरद पवार यांनी केले !! देशाच्या सीमेवर सैन्य लढत आहे अन् मोदी राजकारण करीत आहेत-आम. छगन भुजबळ !!! कार्यकर्ता संवाद मेळाव्याची सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!
शेतकरी विरोधी सरकारला हद्दपार करण्यासाठी भुजबळांच्या पाठीशी  खंबीरपणे उभे रहा - खा.शरदचंद्र पवार
नाशिक,दि.४ मार्च:- छगन भुजबळ यांनी नाशिकचा चेहरा मोहरा बदलला आहे. त्यांच्याकडे नाशिकची संपुर्ण जबाबदारी आहे. त्यामुळे या विकास पुरुषाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून देशातील अर्थव्यवस्था मोडकळीस आणलेल्या शेतकरी विरोधी भाजप सरकारला हद्दपार करा असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्र पवार यांनी केले. चोपडा लॉन्स, गंगापूर रोड, नाशिक येथे नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रशांत हिरे, समीर भुजबळ, देविदास पिंगळे, आ. हेमंत टकले, पंकज भुजबळ, नरहरी झिरवाळ, जयवंतराव जाधव, डॉ.अपूर्व हिरे, रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, रंजन ठाकरे, श्रीराम शेटे, नानासाहेब महाले, ऍड.संदीप गुळवे, बापू भुजबळ, गजानन शेलार, अमृता पवार, अर्जुन टिळे, निवृत्ती अरिंगळे, हिरामण खोसकर, शिवाजी सहाणे, पुरुषोत्तम कडलग, अंबादास खैरे, बाळासाहेब वाघ, राजाराम धनवटे, बाळासाहेब गाढवे, बहिरू मुळाने, अनिता भामरे, कविता कर्डक, शोभा मगर, सुषमा पगारे,सुरेखा निमसे,  सचिन पिंगळे, संजय खैरणार, नंदन भास्करे, गौरव गोवर्धने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खा.शरदचंद्र पवार म्हणाले की, नुकताच देशातील सैनिकांवर काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी चळवळीत सहभागी झालेल्या युवकांनी हा हल्ला केला. त्यानंतर लष्कराला कारवाई करण्याचा अधिकार दिला असे सरकारने सांगितले. यामध्ये हवाई दलाने कारवाई करून ती आतंकवाद्यांचे स्थळे उध्वस्त केली. यामधून आम्ही भारतीय कुणाच्या वाटेला जात नाही जर आमच्या वाट्याला कोणी गेले तर आम्ही त्यांना सोडणार नाही. हा संदेश दिला गेला. देशाच्या ऐक्क्याचा ज्यावेळेस प्रश्न येतो तेव्हा पक्षभेद राजकारण बाजूला सोडून एकत्र येण्याची गरज असते. त्यादृष्टीने एकत्र येऊन सैनिकांना त्यांचा निर्णय घेण्याची मोकळीक देऊन त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे जवानांनी शौर्य दाखविले हा चर्चेचा विषय नसून आपण सैन्याच्या मागे उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र कष्ट सैनिकांनी केले आणि छाती कोण बडविते आहे अशी टीका करून राजकीय फायदा घेण्यासाठी भाजपचा डाव असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, मनमोहन सिंग सरकारच्या काळात राफेल ५६० कोटी रुपयांना खरेदी करण्याचा निर्णय झाला होता आणि त्याच्या दुरुस्तीचे काम एचएलला देण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र भाजपने राफेल विमान साडे पंधराशे कोटी रुपयांना खरेदी केली जात आहे आणि त्याच्या दुरुस्तीचे काम एचएएला न देता अंबानीच्या कंपनीला दिले जात आहे. एकीकडे पंतप्रधान "न खाऊंगा न खाणे दुंगा" अशी भाषा करतात मात्र या खरेदीत "दाल मे कुछ काला है" अशी टीका त्यांनी केली. संरक्षण खात्याचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी माजी पंतप्रधानांवर टीका केली जात आहे. असा संकुचित विचार करणारे सरकार आज सत्तेत आहे. पुन्हा एकदा जर यांचे सरकार आले तर लोकशाही व्यवस्था मोडकळीस येऊन हुकूमशाही व्यवस्था येईल असे त्यांनी सांगितले.
राजकीय गरज भागविण्यासाठी भाजपने देशात जी आपत्ती आणली आहे ती घालविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर माझी शंका आहे त्यामुळे बूथ प्रमुखांनी सतर्क राहून काम करावे आणि सकाळी ती यंत्रे तपासून घेण्याची गरज आहे. कारण ज्यांचा हातात सत्ता आहे त्यांच सरकार हातातून जात असल्याने "रडीचा डाव खेळणं" हा भाजपचं प्रयत्न आहे. ज्या ठिकाणी भाजपची सत्ता होती ती राज्य भाजपच्या हातातून गेली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा परिवर्तन होणारच असे यावेळी सांगितले.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जगातील प्रराक्रमी सैन्य आपल्या देशाला लाभले आहे. स्वातंत्र्य काळापासूनच सैनिकांनी आपले शौर्य दाखविले. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी संरक्षण खात्याला अधिक बळकटी दिली. या अगोदर अनेक लढायला झाल्या मात्र यामध्ये कुठलाही पक्षीय राजकारणात कधीही वापर केला गेला नाही. मात्र सद्या मोदी, सैन्याचे राजकीयकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. ज्यावेळेस देशावर पुलवामा सारखा हल्ला झाला अशा वेळेस सुद्धा मोदी मात्र भाजपचे गुणगान गाण्यात रम्य होते. अशा वेळेस काँग्रेसने मात्र आपले सर्व कार्यक्रम रद्द करून सैनिकांच्या मागे उभे राहिले. "भाईओ और बहिनो देश मैरे हात मै सुरक्षित है" असे पंतप्रधान सांगतात. देश सुरक्षित ठेवण्यासाठी सैन्य सीमेवर लढत आहे मोदी मात्र त्यात राजकारण करत आहते, असे सांगून देशातील सैनिकांवर हल्ला झाला त्यावेळेस सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन सैनिकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत असे त्यांनी आवर्जून सांगितले.
देशात प्रगती करणाऱ्या शहरामध्ये नाशिक सोळाव्या स्थानी होते आणि आता मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतले असतांना नुकताच आलेल्या अहवालातून नाशिक गायब झाले त्याची जागा नागपूरने घेतली, मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेले नाशिक गायब झाले कसे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खासदार समीर भुजबळ यांनी नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा केला त्यासाठी राज्यसरकारने आपला वाटा जाहीर केला आणि त्यानंतर केंद्रीय बजेट मध्ये मंजुरी मिळाली मात्र अद्याप काम सुरू झाले नाही. मात्र आता  पुन्हा एकदा सर्वेक्षणाचा घाट घालून जनतेला मूर्ख बनविण्याचे काम केले जात आहे. नाशिकमध्ये बोट क्लब कालाग्राम सारखे अनेक प्रकल्प पूर्ण केले तसेच अनेक प्रकल्पांचे काम सुरू करून दिले ते दत्तक पित्यानी पूर्ण करून प्रकल्प का सुरू केले नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी "नेमके काय दिले तुम्ही नाशिकला" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  "पहारेकरी चौर हैं" असे म्हणणारे उद्धव ठाकरे पुन्हा त्यांच्यासोबत जाऊन बसले आहते. सरकारने जनतेला फसवलं असं खुद्द उद्धव ठाकरे यांनी स्वतः कबूल केले आहे. सरकारचे निर्णय जनतेच्या विरोधात गेले असतील तर त्याला शिवसेना देखील तितकीच जबाबदार असे सांगून त्यांनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला.
जेव्हा सेना बीजेपीच सरकार आलं तेव्हासुद्धा या छगन भुजबळने  विरोधी पक्षाचं समर्थपणे नेतृत्व केल  विविध मुद्द्यावर सरकारला धारेवर धरून सरकारला उत्तरदायी केलं, गोपीनाथ मुंडेनी हे जाहीरपणे सांगितलं होतं कि भुजबळांमुळे युतीची सत्ता गेली यामुळेच युती सरकार कायम छगन भुजबळांनां लक्ष्य करते. ज्यावेळी उपमुख्यमंत्री या नात्याने माझ्याकडे गृहखातं होते आणि गृहखाते असतांना मी मुंबईमध्ये जे  दाऊद टोळीचे गुंड होते ते खलास करण्याचं काम केलं त्यानंतर मला धमक्या यायच्या मात्र त्या वेळेपासून माझ्या घरातलं सगळ्यात सॉफ्ट टार्गेट कोण असेल तर तो समीर होता,त्यावेळी इंटीलिजन्सच्या रिपोर्टप्रमाणे समीर हा सॉफ्ट टार्गेट आहे असं मला सांगण्यात आल होतं.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेच्या सभेपासून ते नोंदणी पर्यंत पक्षासाठी समीरने भरीव कार्य केलंय , जेव्हा नारायण राणेंनी आणि शिवसेनेने पुन्हा एकदा सरकार पाडण्याचा प्रयत्न १९९९ साली केला तेव्हासुद्धा आघाडीच्या आमदारांच्या संरक्षणाची जबाबदारी समीरने निभावली आणी आघाडीची सत्ता बचावली आणि हे विलासराव देशमुखांनासुद्धा माहिती होतं, कृपाशंकरांना माहिती आहे आणि आमच्या सगळ्यांना माहिती आहे, ज्या पद्धतीने समीरने त्यावेळी व्युहरचना केली आणि काही आमदारांना इंदोरला पाठविले, बँगलोरला पाठविले अगदी सुरवातीपासून तो माझ्यासोबत आणि आघाडी सोबत समर्थपणे काम करतो म्हणूनच समीर कायमच माझ्या विरोधकांच पाहिलं टार्गेट राहीला आहे. जेव्हा माझ्यावर कुठलेही आरोप होतात तेव्हा पहिले आरोप समीरवर करायचे अस षड्यंत्र विरोधकांनी कायम रचलं आहे, माझ्यासोबत त्यांनी समीरला अटक करून मला संपवण्याचा कट केला आणि हे करून ते  इथेच थांबले नाही तर आज त्याचीच री ते ओढत आहेत भुजबळाना कमजोर करायचं असेल तर समीरला कमजोर करा हे षड्यंत्र आहे. या षडयंत्रामध्ये आम्हाला गुंतवलं आणि म्हणून माझ्यामुळे समीरला या षडयंत्राला समोर जाव लागत आहे.  मी आज तुमच्यासमोर खंबीरपणे उभा आहे कारण तुरुंगातून मी जिवंत बाहेर येऊ शकलो ते समीरमुळे आणि नाशिककरांच्या प्रेमामुळे. तुरुंगात या सरकारने मला स्वतंत्र कोठडी दिली होती मी आजारी होतो तेव्हा समीर सगळी देखभाल करायचा तो सोबत होता म्हणून मला वेळेवर उपचार मिळाले अन्यथा या सरकारने कारस्थान केलेच होते भुजबळानां संपवायचे  असे त्यांनी सांगितले.
समीरला लक्ष्य करणं म्हणजे भुजबळांना लक्ष्य करण पण मी किवा समीर असल्या कारस्थानांना पुरून उरू. जोपर्यंत कार्यकर्ते आणी नाशिकच्या जनतेचं प्रेम सोबत आहे तो पर्यंत लढत राहू. आज देश कठीण प्रसंगात आहे, शेतकरी आत्महत्या करतोय, शेतमालाला भाव नाही , बेरोजगारी वाढलीय ,सामाजिक तणाव वाढलाय ,संविधानाची पायमल्ली सरकार स्वत:च करतेय, अशा वेळी विरोधी पक्षाचे नेते म्हणून मी सरकारला प्रश्न विचारायचे नाहीत का ? मुख्यमंत्री ठरवणार का कोणी काय बोलायचे ? हुकुमशाही आहे का? नाशिकचे आणि राज्याचे प्रश्न आम्ही मांडणारच मग भले तुम्ही हजार वेळा तुरुंगात टाकायच्या धमक्या द्या आम्ही मागे हटणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेनुसार एनसिपी कनेक्ट ऍपच्या माध्यमातून गावपातळीवर बूथ कमिट्या तयार करून प्रत्येक मतदार जोडण्याचे काम केले आहे. छगन भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात अनेक विकास कामे करून नाशिकचा कायापालट केला. हा विकास विकासवारी च्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम केले आहे. नाशिक शहर व जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे निर्माण केले, नाशिक लोकसभा मतदारसंघात सीआरएक मतदार संघात विकासाची कामे केली. नाशिकमध्ये विमानतळ निर्माण केले, मात्र अद्यापही या ठिकाणी नियमित विमानसेवा सुरू झाली नाही, निवडणुकीच्या तोंडावर विमानसेवा सुरू करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. गेल्या पाच वर्षात नाशिकमध्ये आयटी उद्योग तसेच इतर औद्योगिक गुंतवणूक येण्याची गरज होती. मात्र गेल्या पाच वर्षात पाठपुरावा झाला नाही. शेतमालाच्या दृष्टीने कार्गो हब सुरू होण्याची गरज होती. मात्र पाच वर्षात नाशिकचा विकास खुंटला गेला अशी टीका त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने नाशिकमध्ये खा.शरद पवार यांच्या माध्यमातून फूड पार्क मंजूर करून घेतला मात्र तेथे कुठलेही काम झाले नसून उलट तो रद्द करण्याचा प्रयत्न केला जात असून हा आमच्या शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणाचे माहेरघर म्हणून नाशिक ओळखले जाते याठिकाणी पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र निर्माण करण्यासाठी शिवणई येथे जागा मंजूर करून घेतली. मात्र गेल्या पाच वर्षात एक विटही रचली गेली नाही. गेले पाच वर्षे काहीच न करू शकलेल्या नाशिकच्या खासदारांनी निवडणुकीच्या तोंडावर इलेक्ट्रॉनिक टेस्टिंग लॅबचे भूमिपूजन केले. आघाडी सरकारच्या काळात नाशिकमध्ये बोट क्लब, कालाग्राम, साहसी क्रीडा संकुल, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मंजूर करून घेतले काही पूर्ण देखील केले. मात्र राजकारण करून प्रकल्प बंद पाडले तसेच येथील बोटी देखील पाठविल्या गेल्या अशी टीका त्यांनी केली. आघाडी सरकारच्या काळात एकलहरे प्रकल्पाचे आधुनिकीकरण करण्यासाठी मंजुरी मिळवून दिली. मात्र एकलहरे येथील वीज प्रकल्प बंद करण्याचा घाट घातला जात आहे. एकूणच जिल्ह्यातील जनतेवर युती सरकारकडून अन्याय केला गेला. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत नाशिक आणि दिंडोरी या दोनही लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू असे त्यांनी यावेळी सांगितले.
          डॉ.अपूर्व हिरे म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असतांना दत्तक घेतलेल्या नाशिकच्या पदरात काहीच पडले नाही. नाशिककरांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले. नाशिक महापालिकेत आयुक्त मुंढे सारखे अधिकारी देऊन सिडकोतील तीन लाख नागरिकांना बेघर करण्याचा डाव या भाजपच्या नेत्यांचा होता. देशातील कुठलाच घटक आज सुखी नसल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात छगन भुजबळ यांनी केलल्या विकासकामानंतर गेल्या पाच वर्षात एकही नवा रुपयांचा विकास दिसला नाही जिल्ह्यातील जनता या सरकारला कंटाळली असून या सरकारला सत्तेतून पायउतार केल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी देविदास पिंगळे, कोंडाजीमामा आव्हाड, रंजन ठाकरे,  गजानन शेलार, अनिता भामरे, सुषमा पगारे, हिरामण खोसकर, विष्णुपंत म्हैसधूने, समिना मेमन, यांनी मनोगत व्यक्त करून आगामी लोकसभा निवडणुकीत विजयी होण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. या मेळाव्याचे सूत्रसंचालन जयवंतराव जाधव यांनी केले.तर नानासाहेब महाले यांनी आभार प्रदर्शन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

जागतिक फार्मासिस्ट दिवस विशेष एसएमबीटी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची ‘अशीही’ सामाजिक बांधिलकी !

विजयादशमीला शिवप्रताप गरूडझेप ! ‘पहिले ते हरिकथा निरुपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी’ !!