जागतिक रेबीज दिन, प्रतिबंधात्मक उपचारातून रेबीजपासून बचाव शक्य-डॉ.अविनाश गोरे


जागतिक रेबीज दिन
प्रतिबंधात्मक उपचारातून रेबीजपासून बचाव शक्य-डॉ.अविनाश गोरे

रेबीज हा विषाणूमुळे होणारा गंभीर व जीवघेणा आजार आहे. रेबीजची लक्षणे सुरू झाल्यानंतर हा आजार जवळजवळ नेहमीच प्राणघातक ठरतो. मात्र, प्राण्याच्या चाव्यानंतर वेळ न दवडता योग्य प्रतिबंधात्मक उपचार घेतल्यास रेबीजपासून बचाव शक्य आहे. त्यामुळे कुत्रा किंवा अन्य संशयित प्राण्याने चावा घेतल्यास घाबरून न जाता तातडीने वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.
             दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिन पाळला जातो. रेबीज प्रतिबंधाबाबत जनजागृती करणे, प्राण्यांचे लसीकरण वाढविणे आणि प्राण्याच्या चाव्यानंतर तातडीने प्रतिबंधात्मक उपचार घेण्याचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या दिनाचा प्रमुख उद्देश आहे. नाशिक जिल्ह्यात कुत्रे तसेच माकडांच्या चाव्यानंतर रेबीजच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक दक्षता घेणे गरजेचे आहे.
   जखम १५ मिनिटे साबण व वाहत्या पाण्याने धुवा
रेबीज प्रामुख्याने संक्रमित प्राण्याच्या लाळेद्वारे पसरतो. मानवांमधील बहुतांश रेबीजची प्रकरणे संक्रमित कुत्र्याच्या चाव्यामुळे होतात. त्यामुळे कुत्रा किंवा संशयित प्राण्याने चावा घेतल्यानंतर सर्वप्रथम जखम किमान १५ मिनिटे साबण आणि वाहत्या पाण्याने व्यवस्थित धुवावी. त्यानंतर तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात, शासकीय रुग्णालयात किंवा रेबीज प्रतिबंधक उपचार केंद्रात वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. जखमेवर मिरची, चुना, हळद, माती, तेल किंवा अन्य कोणतेही घरगुती पदार्थ लावू नयेत. जखम जाळणे अथवा स्वतःहून घट्ट बांधणे टाळावे. अशा उपायांमुळे जखमेची स्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
चाव्याच्या स्वरूपानुसार प्रतिबंधात्मक उपचार
रेबीजच्या संसर्गाचा धोका साधारणपणे तीन प्रकारांत विचारात घेतला जातो. त्वचेला कोणतीही इजा नसताना प्राण्याला स्पर्श करणे, खाऊ घालणे किंवा अखंड त्वचेवर लाळ लागणे हा प्रकार एक मानला जातो. अशा परिस्थितीत सामान्यतः रेबीज प्रतिबंधक उपचारांची आवश्यकता नसते.
रक्त न येणारे छोटे ओरखडे, त्वचेवरील किरकोळ खरचटणे किंवा त्वचेवर प्राण्याने दात लावणे हा प्रकार दोनमध्ये येतो. अशा वेळी जखम धुणे आणि रेबीज प्रतिबंधक लस घेणे आवश्यक असते. त्वचा भेदणारा चावा, रक्त येणारा ओरखडा, खोल अथवा अनेक जखमा तसेच तुटलेल्या त्वचेवर किंवा श्लेष्मल त्वचेवर संक्रमित लाळ लागणे हा प्रकार तीनमध्ये येतो. अशा परिस्थितीत जखम धुण्यासोबत रेबीज प्रतिबंधक लस आणि आवश्यकतेनुसार रेबीज प्रतिपिंड द्रावण देण्यात येते. संसर्गाचा धोका आणि उपचारपद्धतीचा अंतिम निर्णय प्रशिक्षित डॉक्टर वैद्यकीय तपासणीनंतर घेतात.
      
          रेबीज प्रतिबंधक लसीकरणाचा पूर्ण उपचारक्रम आवश्यक
रेबीज प्रतिबंधक लस शरीरात रेबीज विषाणूविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करते. लसीकरणाची पद्धत रुग्णाची परिस्थिती आणि उपलब्ध मार्गदर्शक तत्त्वांनुसार ठरविली जाते. त्यामुळे रुग्णांनी स्वतःहून लसीचे डोस किंवा वेळापत्रक ठरवू नये. डॉक्टरांनी सांगितलेला संपूर्ण लसीकरणाचा उपचारक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रकार तीनच्या संसर्गाच्या परिस्थितीत रेबीज प्रतिपिंड द्रावण आवश्यक असल्यास ते शक्य तितक्या लवकर, प्राधान्याने पहिल्या उपचाराच्या वेळी, जखमेत व जखमेभोवती योग्य पद्धतीने देण्यात येते. योग्य प्रकरणात ते लसीच्या पहिल्या मात्रेनंतर सातव्या दिवसापर्यंत दिले जाऊ शकते. त्याचे प्रमाण रुग्णाचे वजन आणि वापरल्या जाणाऱ्या औषधाच्या प्रकारानुसार ठरते. त्यामुळे हा उपचार प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांकडूनच करून घ्यावा. पूर्वी रेबीज प्रतिबंधक लसीकरण किंवा प्रतिबंधात्मक उपचार पूर्ण केले असल्यास उपचारपद्धती वेगळी असू शकते. त्यामुळे पूर्वीचे लसीकरण झाले असल्यास त्याची माहिती डॉक्टरांना देणे आवश्यक आहे.
     गर्भवती महिला, लहान मुले व वृद्धांनीही उपचार टाळू नयेत
गर्भवती महिला, लहान मुले किंवा वृद्ध व्यक्तींना रेबीजचा धोका निर्माण झाल्यास केवळ वय किंवा गर्भावस्थेमुळे प्रतिबंधात्मक उपचार टाळू नयेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक उपचार तातडीने सुरू करणे महत्त्वाचे आहे. जखमेचे स्वरूप पाहून, जखम व्यवस्थित धुतल्यानंतर आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपचारांचा विचार करून टाके देण्याबाबत डॉक्टर निर्णय घेतात. तसेच धनुर्वात प्रतिबंधक लसीकरणाची स्थिती तपासणे आणि जखमेत जिवाणू संसर्गाचा धोका असल्यास आवश्यक उपचार करणेही महत्त्वाचे आहे.
      ‘कुत्र्याला लस दिली आहे’ म्हणून उपचार टाळू नका
पाळीव कुत्र्याचे लसीकरण झालेले असणे महत्त्वाचे आहे. मात्र, केवळ या कारणावरून चावलेल्या व्यक्तीने वैद्यकीय तपासणी किंवा प्रतिबंधात्मक उपचार टाळू नयेत. संशयित कुत्र्याचे पशुवैद्यकीय यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली १० दिवस निरीक्षण केले जाऊ शकते. मात्र, या निरीक्षणामुळे जखमी व्यक्तीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यास विलंब करू नये.
     मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांनी दक्ष राहावे
लहान मुले कुत्र्यांसोबत खेळताना किंवा त्यांना कुरवाळताना चावली अथवा ओरखडली जाऊ शकतात. त्यामुळे मुलांना अनोळखी कुत्र्याजवळ न जाणे, कुत्रा खात असताना किंवा झोपलेला असताना त्याला त्रास न देणे, पिल्लांना त्रास न देणे आणि कुत्र्याची शेपटी न ओढणे याबाबत मार्गदर्शन करावे. लहान मुलांना कोणत्याही कुत्र्यासोबत प्रौढांच्या देखरेखीशिवाय एकटे सोडू नये. कुत्रा चावल्यास किंवा ओरखडा काढल्यास घटना लपवू नये, तर तातडीने पालकांना सांगावे.
       रेबीज नियंत्रणासाठी ‘एकात्मिक आरोग्य दृष्टिकोन’ आवश्यक
रेबीज नियंत्रणासाठी मानवांवरील उपचारांसोबतच प्राण्यांचे लसीकरण, जबाबदार पाळीव प्राणी पालन, भटक्या कुत्र्यांच्या संख्येचे शास्त्रीय व्यवस्थापन, जनजागृती आणि रोगनिगराणी आवश्यक आहे. यासाठी आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्था, पशुवैद्यकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे.रेबीज हा गंभीर आजार असला तरी वेळीच प्रतिबंधात्मक उपचार घेतल्यास त्यापासून बचाव शक्य आहे. त्यामुळे प्राण्याच्या चाव्यानंतर घाबरून न जाता जखम तातडीने धुणे, वैद्यकीय सल्ला घेणे, आवश्यक रेबीज प्रतिबंधक लस व रेबीज प्रतिपिंड द्रावण घेणे आणि डॉक्टरांनी सांगितलेला उपचारक्रम पूर्ण करणे, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

डॉ. अविनाश गोरे
बालरोगतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, नाशिक
शब्दांकन : जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रक्तदानाचे दीड शतक पूर्ण करणारा सेवाव्रती पत्रकार. विश्वविक्रमी रक्तदाते पत्रकार डॉ.दिलीप केदारनाथ कोठावदे यांचा प्रेरणादायी, भावस्पर्शी रक्तदान प्रवास

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा बहिस्थ परिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

कवी प्रशांत धिवंदे यांची विठ्ठल वारी रचना !