नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद, देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग
42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care' चा संदेश
नाशिक : किडनीचा आजार म्हणजे केवळ किडनीपुरता मर्यादित असलेला आजार नाही. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, वाढते वजन आणि जीवनशैलीशी संबंधित अनेक समस्या किडनीच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. विशेष म्हणजे किडनीच्या आजाराची सुरुवात अनेकदा कोणतीही ठळक लक्षणे न दाखवता होते. त्यामुळे आजार गंभीर होण्यापूर्वी त्याची कारणे, सुरुवातीचे संकेत आणि आवश्यक तपासण्या याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर '360° Kidney Care'चा संदेश घेऊन नाशिकमध्ये देशभरातील नामांकित किडनी विकार तज्ज्ञांची प्रतिष्ठित परिषद आयोजित करण्यात आली आहे.
इंडियन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी (ISN) - वेस्ट झोन आणि नेफ्रॉलॉजी फोरम ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४२ वी किडनी विकार तज्ज्ञांची (42nd ISN West Zone Conference 2026) ही परिषद ११ ते १३ सप्टेंबर २०२६ दरम्यान नाशिक येथे होणार आहे. मुंबई नाका परिसरातील हॉटेल फोर पॉइंट्स बाय शेराटन आणि हॉटेल ट्रीट येथे ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान या परिषदेतील वैज्ञानिक सत्रे, संशोधन सादरीकरणे आणि कार्यशाळा पार पडतील. किडनीच्या आजारांचे प्रतिबंध, वेळेवर निदान, आधुनिक उपचार, डायलिसिस, प्रत्यारोपण, संशोधन आणि जनजागृती या सर्व बाबींवर परिषदेत विशेष भर दिला जाणार आहे.
पत्रकार परिषदेत आयोजकांकडून परिषदेची संकल्पना, वैज्ञानिक कार्यक्रम तसेच आयोजित करण्यात आलेल्या विविध जनजागृती उपक्रमांची माहिती देण्यात आली. देशभरातील नामांकित नेफ्रॉलॉजिस्ट आणि विविध वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ या परिषदेत सहभागी होणार असून, अत्याधुनिक वैज्ञानिक सत्रे, लाइव्ह केस डिस्कशन, CME कार्यक्रम, संशोधन सादरीकरणे, ई-पोस्टर व पेपर प्रेझेंटेशन, क्विझ तसेच युवा डॉक्टरांसाठी विशेष शैक्षणिक सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय परिषद नाशिकमध्ये; जागतिक स्तरावरील तज्ज्ञांची उपस्थिती
राष्ट्रीय स्तरावरील ही प्रतिष्ठित परिषद नाशिकमध्ये होत असल्याने शहराच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी ही मोठी संधी मानली जात आहे. देशभरातील तज्ज्ञ, संशोधक, डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या सहभागातून किडनी विकारांच्या उपचारपद्धती, संशोधन आणि आधुनिक वैद्यकीय ज्ञानाची देवाणघेवाण होणार आहे.
याआधी २०१५ मध्ये नाशिकला ही परिषद आयोजित करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर तब्बल ११ वर्षांनी पुन्हा नाशिकला या प्रतिष्ठित परिषदेचे यजमानपद मिळाले आहे.
यावेळी महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमधील ३५० हून अधिक मूत्रपिंड विकार तज्ज्ञ परिषदेत सहभागी होणार असून, २०० हून अधिक जागतिक स्तरावरील वक्ते विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये एकाच ठिकाणी किडनी विकार क्षेत्रातील देश-विदेशातील तज्ज्ञांचे ज्ञान आणि अनुभव उपलब्ध होणे ही नागरिकांसाठीही विशेष महत्त्वाची बाब ठरणार आहे.
'360° Kidney Care'मधून निरोगी किडनीचा संदेश
'360° Kidney Care' या संकल्पनेतून किडनीच्या आरोग्याकडे केवळ आजार आणि उपचार या मर्यादित दृष्टिकोनातून न पाहता, प्रतिबंध, लवकर निदान, योग्य उपचार, डायलिसिस, प्रत्यारोपण, संशोधन आणि जनजागृती या सर्व अंगांनी पाहण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. '360° Kidney Care'च्या माध्यमातून 'निरोगी किडनी - निरोगी जीवन' हा संदेश समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
याअंतर्गत आयोजित 'किडनी संवाद' उपक्रमात नागरिकांनी किडनी विकार तज्ज्ञांशी थेट संवाद साधून तपासणी, मधुमेह-रक्तदाबाचा परिणाम, आहार आणि किडनी प्रत्यारोपणाबाबतच्या आपल्या विविध शंकांचे निरसन करून घेतले.
दरम्यान यावेळी आयोजन समितीचे पॅट्रॉन डॉ. विजय घाटगे, आयोजक अध्यक्ष डॉ. देवदत्त चाफेकर, आयोजक सचिव डॉ. नागेश अघोर, खजिनदार डॉ. मोहन पटेल, सायन्स कमिटी अध्यक्ष डॉ. कैलास शेवाळे, समितीतील पदाधिकारी डॉ. देवीकुमार केळकर, डॉ. प्रकाश उगले, डॉ. अनिरुद्ध डोकरे, डॉ. विपुल गट्टाणी, डॉ. अभिजित मोरे, डॉ. अजय नकसाणे, डॉ. इरावती वाघमारे, डॉ. पार्थ देवगावकर, डॉ. जयेश वाघुळदे, डॉ. शाम पगार, डॉ. पवन देवरे, डॉ. स्वप्निल जाधव, डॉ. पल्लवी पाटील, डॉ. रोहन रघुवंशी, डॉ. नयनेश चव्हाण, विक्रम चासकर, अमोल डुगजे उपस्थित होते.
ISNWZ 2026: हरित उपक्रम
पेपरलेस कॉन्फरन्स : कोणतेही छापील कार्यक्रम, माहितीपत्रक किंवा पुस्तिका दिली जाणार नाही. सर्व माहिती आणि वेळापत्रक QR कोडद्वारे उपलब्ध असेल.
प्लास्टिकमुक्त परिषद : एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांवर बंदी असेल. त्याऐवजी पुन्हा वापरता येणाऱ्या बाटल्या आणि पाणी भरण्यासाठी वॉटर रिफिल स्टेशन्स असतील.
पर्यावरणपूरक स्वागत : फुलांच्या गुच्छांऐवजी (बुके) रोपटी, सीड बॉल्स किंवा पर्यावरणपूरक भेटवस्तू देऊन पाहुण्यांचे स्वागत केले जाईल.
डिजिटल नोंदणी : QR कोडद्वारे चेक-इन, डिजिटल बॅज, ई-प्रमाणपत्रे आणि डिजिटल अभिप्रायाची सोय असेल.
शाश्वत आहार : स्थानिक आणि हंगामी महाराष्ट्रीयन पदार्थांचा मेनू असेल. अन्नाचा नासाडी टाळण्यासाठी योग्य प्रमाणात अन्न वाढले जाईल.
ऊर्जा बचत : LED दिवे, AC चे योग्य तापमान नियंत्रण आणि गरज नसताना विजेची उपकरणे बंद ठेवण्यावर भर दिला जाईल.
हरित नाशिक उपक्रम : ISNWZ परिषदेच्या निमित्ताने नाशिकमध्ये वृक्षारोपण मोहीम राबवली जाईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा