गौतमी गोदावरी धरणातील बेटावर त्र्यंबकराजांची प्रतिकृती उभारणार

सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७
गौतमी गोदावरी धरणातील बेटावर त्र्यंबकराजांची प्रतिकृती उभारणार
पर्यटन विकासासाठी १७ कोटी ३४ लाख ९० हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी

नाशिक::- नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्य सिंहस्थ महाकुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी गौतमी गोदावरी धरण परिसरातील बेटावर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकराजांची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. या कामासह मूर्ती परिसराचा विकास व विद्युत सुविधांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून एकूण १७ कोटी ३४ लाख ९० हजार रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
         कार्यकारी अभियंता, नाशिक पाटबंधारे विभाग यांच्या प्रस्तावानुसार श्री त्र्यंबकराजांच्या प्रतिकृतीच्या उभारणीसाठी ९ कोटी ९८ लाख रुपये, प्रतिकृर्ती सभोवतालच्या परिसर विकासासाठी ५ कोटी ४१ लाख रुपये, तर प्रतिकृतीसाठीचा परिसरात विद्युत कामांसाठी १ कोटी ९४ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याबाबतची निविदाही प्रसिद्ध झाली असून लवकरच या कामास सुरुवात होणार आहेत. 
                 सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर येथे देशाच्या विविध भागांतून तसेच परदेशातून मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक येण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरातील पर्यटन विकासासाठी आवश्यक मूलभूत सोयी-सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. श्री त्र्यंबकराजांची प्रतिकृती उभारल्यामुळे या परिसराच्या धार्मिक व पर्यटन महत्त्वात आणखी भर पडणार आहे
या विकासकामांसाठी राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव आयुष प्रसाद आणि जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली.
              सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७ च्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर परिसरातील धार्मिक व पर्यटन विकासाला अधिक चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध विकासकामांचे नियोजन करण्यात येत आहे. गौतमी गोदावरी धरण परिसरातील बेटावर श्री त्र्यंबकराजांची प्रतिकृती उभारण्यात येणार असल्याने या परिसरातील पर्यटन सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण वाढ होणार आहे. भाविक व पर्यटकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा, परिसर विकास व विद्युत व्यवस्था उपलब्ध झाल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढण्यास तसेच स्थानिक पर्यटन व्यवसायांना चालना मिळण्यास मदत होणार आहे. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन हॉटेल, वाहतूक, स्थानिक बाजारपेठ आणि इतर पूरक व्यवसायांना चालना मिळण्यास हातभार लागणार आहे. सिंहस्थ महाकुंभमेळ्यानंतरही या सुविधांचा दीर्घकालीन उपयोग होऊन त्र्यंबकेश्वर परिसरातील धार्मिक, सांस्कृतिक व पर्यटन विकासाला सातत्याने चालना मिळेल.
                   याबरोबरच सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७ च्या अनुषंगाने भाविक, पर्यटक आणि नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध विकासकामांचे नियोजन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुंबई-धुळे मार्गिका खुली, वाहतुकीला दिलासा !

सिडकोतील महिलांनी हेमंत गोडसे यांचे औक्षण करून दिल्या विजयीभव च्या शुभेच्छा !! तरुणांनी काढलेली मोटारसायकल रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची विद्यार्थी परिषद निवडणूक संपन्न