पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी वारली चित्रशैली ! आदिवासी औद्योगिक क्लस्टर व्हावे लवकरच कार्यान्वित... !!

पर्यावरण संवर्धनाचा संदेश 
देणारी वारली चित्रशैली !

          आज ५ जून, जागतिक पर्यावरण दिन आहे. आदिवासी वारली चित्रशैली पर्यावरणाशी समतोल साधते. निसर्गाच्या लयतत्त्वाशी इमान  राखते. आकारांच्या सुलभीकरणामुळे ती जगभरात लोकप्रिय ठरली आहे. या वारली चित्रसृष्टीने सह्याद्रीचा पायथा समृद्ध केला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात एकरूप झालेल्या आदिवासींच्या जीवनशैलीत पर्यावरण जतन, रक्षण आणि संवर्धन समाविष्ट आहेच. सभोवतालच्या निसर्ग - जीवसृष्टीसोबत परस्परांना पूरक असे एकात्मिक जीवन ते जगतात. त्याचा कोणताही गाजावाजा न करता ते पर्यावरण दिन दररोजच आपल्या कृतीतून साजरा करीत असतात. वारली कलाकार पर्यावरण रक्षण, संवर्धनाचा कलेद्वारे संदेश देतात.

        बारा कोटी लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्रात एक कोटींपेक्षा अधिक आदिवासी बांधव आहेत. त्यांच्या चालीरीती, संस्कृतीला राज्याच्या सांस्कृतिक नकाशावर महत्त्वाचे स्थान आहे. आधुनिक काळात निसर्गाचा तोल सांभाळून आदिवासी समाज कलाक्षेत्रात लक्षणीय योगदान देतो आहे. आदिवासी वारली चित्र रेखाटनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात आजूबाजूला असणारा निसर्ग, पर्यावरण नितळपणे उमटते. अनुभूती आणि निरीक्षण या दोहोंची ती प्रामाणिक अभिव्यक्ती आहे. चित्र काढताना वारली कलाकार सुरुवातीला चित्र किती मोठे काढावयाचे ते प्रथम निश्चित करतो. त्या अनुरोधाने बाहेरील नक्षीकाम व मध्यवर्ती चित्राभोवतालच्या आकृत्या तसंच नक्षी क्रमाक्रमाने काढत जातो. मनुष्य अगर प्राणी काढण्यासाठी सुरवातीस त्रिकोण काढून त्याला शरीर मानून हातपाय, डोके, शेपूट हे अवयव जोडले जातात. ही कलाकृती प्रथम रेषाकृतीने तयार केली जाते. वारली चित्रकार भौमितिक आकाराची चित्रे काढत असतात. हे आकारही त्यांनी सभोवतालच्या निरीक्षणातून मिळवलेले आहेत. चंद्राच्या गरगरीत वाटोळ्या आकारातून त्याने गोल घेतला. पानांच्या आकारातून त्याने गोल, त्रिकोण, अंडाकृती आकार घेतले. पाकळया आणि फांद्यांच्या आकारातून बाक आणि वळणे घेतली. चंद्रकला व इंद्रधनुष्य यांत त्याने कमानी आणि अर्धवर्तुळ पाहिले. पक्ष्यांच्या भराऱ्या व माशांच्या पोहण्याच्या निरीक्षणातून समांतर व उभे आडवे रेषांचे आकार तो शिकला. आकाशात जवळजवळ असलेले पाच तारे पाहताना, ते एखाद्या रेषेने जोडले गेल्याचा आभास निर्माण झालेला बघून त्याला पंचकोन मिळाला. या आकारांवर वारली चित्रशैली आधारलेली आहे.

            आदिवासींचे वास्तव्य जंगल, पर्वत अशा दुर्गम भागात असते. त्यांची जीवनशैली साधी, सरळ सोपी व निसर्गावर आधारित आहे. ते समाधानी व आत्मनिर्भर असतात. त्यांचे निसर्गज्ञान, सूक्ष्म निरीक्षण कौतुकास्पद म्हटले पाहिजे. अनेक आश्चर्यकारक आकार व रेषांची प्रेरणा त्यांना साध्या साध्या रेषा आणि वळणे यांच्या अवलोकनातून मिळाली. निसर्ग आणि सृष्टीला समजून घेण्याची व ती चित्राकृती प्रकट करण्याची त्यांची ही सांकेतिकता कौतुकास्पद आहे. जीवनातल्या घडामोडींचे त्यांच्या कलेत पडणारे प्रतिबिंब, रूढ अर्थाने शिक्षित- कलासाक्षर नसूनही भिंतीचित्रणाच्या रेखाटनांमधल्या रेषेतला जोमदारपणा दिसतो. रेखाकृती फारशी सुबक नसली तरीही ; तिच्यातून प्रकट होणारे ठाशीव वेगळेपण पाहून या कलावंतांच्या कलेच्या उंचीचा आपले मन वेध घेऊ लागते. वारली चित्रकलेतील रेखाटनांमध्ये प्रमाणबध्दता जरी नसली तरी त्या रेखाटनांमध्ये असलेला प्रवाहीपणा, मुक्तपणा आणि जोरकसपणा क्षणाक्षणाला जाणवतो. विज्ञान - तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात अवघे जग 'युनिव्हर्सल व्हिलेज' झाले आहे. आदिवासी पाड्यांवर राहणारा युवक शहरी संस्कृतीकडे झेपावतोय. मात्र या स्थलांतरामुळे तो आपल्या दैनंदिन जगण्याशी घट्ट नाते असणारी मूळ चित्रसंस्कृती विसरतोय ! शहरी कलाकार, संस्कृती आणि आदिवासींच्या कलाशैली यांचा संवाद दिवसेंदिवस वाढतोय. आदिवासींनी भौतिकदृष्ट्या प्रगत जरूर व्हावे; पण आपल्या परंपरागत कलेचा बाज अवश्य टिकवून ठेवावा हीच पर्यावरण दिनानिमित्त अपेक्षा !

                                              -संजय देवधर
(वरिष्ठ पत्रकार व वारली चित्रशैलीतज्ज्ञ, नाशिक)
************************************
आदिवासी औद्योगिक क्लस्टर
 व्हावे लवकरच कार्यान्वित...
   आदिवासी बांधवांच्या कलागुणांना व कौशल्याला वाव देण्यासाठी पहिले आदिवासी औद्योगिक केंद्र (क्लस्टर) नाशिक जिल्ह्यातील जांबुटके येथे साकारण्यात येणार आहे. यापूर्वी याविषयी मी माझ्या लेखांमधून पाठपुरावा केला होता. त्याबाबत अनेकदा घोषणा झाल्या व हवेत विरूनही गेल्या. नाशिकमध्ये २७ ते ३१ मे दरम्यान 'आदि महोत्सवा' चे आयोजन करण्यात आले. पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने या महोत्सवाचे आयोजन केले. त्याच्या उद्घाटन समारंभात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी क्लस्टर संदर्भातील घोषणा केली. या माध्यमातून आदिवासींना मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. आदिवासींमध्ये कला, कौशल्य उपजत असते. ते उत्तम कलानिर्मिती करतात मात्र त्यांची मोठ्या प्रमाणावर फारशी विक्री होत नाही. क्लस्टरच्या माध्यमातून उद्योगासाठी लागणारे भांडवल, जागा, वीज व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. नाशिकसह इतर आदिवासी बहुल जिल्ह्यांमधील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यांना आत्मविश्वास मिळावा, मनातील न्यूनगंड बाजूला सारून व्यवसायाभिमुख व्हावे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. यापूर्वीचा अनुभव पहाता प्रत्यक्षात हे केंद्र लवकर आकाराला येईल अशी आशा करणे इतकेच तूर्त आपल्या हातात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !