माथी मुकुट, हाती कलश !मुखातून शत शत नमन !!महामस्तकाभिषेक सोहळा १० जुलै पर्यंत वाढवला...!


माथी मुकुट, हाती कलश !
मुखातून शत शत नमन !!
महामस्तकाभिषेक सोहळा १० जुलै पर्यंत वाढवला...!
ऋषभदेवपुरम- मांगीतुंगी(प्रतिनिधी) गुरुवारी (दि.३०) प्रत्येक अभिषेककर्त्याच्या माथ्यावर मुकुट, हाती कलश आणि मुखामध्ये शत शत नमनचा जयघोष असे प्रसन्नता वाढवणारे चित्र दिसत होते. सलग १६ दिवस सुरू असलेल्या महामस्तकाभिषेक  महोत्सवात गुरुवारी (दि.३०) आनंदमय वातावरणात भाविकांनी ऋषभदेव व सर्व तीर्थंकरांच्या नावांनी जयघोष केला. उपस्थित सर्व श्रावक- श्राविकांनी अतिशय श्रद्धापूर्वक अभिषेक, पूजनाचा व रत्नवृष्टीचा सात्विक आनंदही मिळवला.

यावेळी पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामींनी असंख्य भाविकांच्या मागणीनुसार दि. १० जुलैपर्यंत सोहळा सुरू राहील अशी भाविकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात घोषणा केली.

         गुरुवारी (दि.३०) पहाटेपासून भाविकांची सहकुटुंब, सहपरिवार ऋषभदेवपुरम येथून ऋषभगीरीवर जाण्यासाठी रीघ लागली होती. सकाळपासून पवित्र वातावरणात व उत्साहात भगवान ऋषभदेवांच्या १०८ फुटी उंच अखंड पाषाण मूर्तीवर पंचामृत महामस्तकाभिषेक झाला. प्रथम कलशाचा मान मुंबईचे सुनील गंगवाल, मेरठ येथून आलेले सुनील सराफ व जयपूरचे मनोज जैन यांना सहपरिवार देण्यात आला.  त्यांनी  मनोभावे पूजन करून धन्य झाल्याची भावना व्यक्त केली. पंचामृत कलश श्रीमती हस्तिनापूरच्या मंगला जैन -साहू परिवाराने अर्पण केला. महामस्तकाभिषेकाच्या प्रारंभी संकल्प, प्रार्थना यांचे पौरोहित्य हस्तिनापूरचे प्रधान आचार्य विजय जैन,  व सत्येंद्र जैन यांनी केले. पवित्र जलाभिषेक, दुग्धाभिषेक, पंचामृताभिषेक करून भाविकांनी पुण्यप्राप्ती केली. महाशांतीधारा कलश  औरंगाबाद येथील मनोरमा महेंद्र कुमार जैन यांनी प्रत्यक्ष तर मध्यप्रदेशातील सागर येथून सुगंधीबाई जैन यांनी ऑनलाईन अर्पण केले. लखनौचे सुमन जैन व परिवार, औरंगाबादच्या चित्रा कवडे परिवार व मुंबईचे अशोक दोशी यांच्या हस्ते रत्नकलशातून अनमोल रत्नवृष्टी समर्पित करण्यात आली. 

    सर्वांना पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामींजींनी आशिर्वाद प्रदान केले. त्यांच्या व महामंत्री संजय पापडीवाल, प्रमोद कासलीवाल, हसमुख जैन, चंद्रशेखर कासलीवाल, मंगला साहू यांच्या हस्ते सर्वांचा सन्मान करण्यात आला. काल महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या सोळाव्या दिवशी गुरुवारी गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजी व प्रज्ञाश्रमणी आर्यिका श्री चंदनामती माताजी यांचे स्मरण करून श्रीफल अर्पण करण्यात आले. स्वामीजी रवींद्रकीर्ती महाराजांनी प्रास्ताविकात शुभाशीर्वाद दिले. महामंत्री संजय पापडीवाल, अधिष्ठाता सी. आर. पाटील, खजिनदार प्रमोद कासलीवाल, राजेंद्र कासलीवाल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मंगलाचरणाने प्रारंभ होऊन स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. जीवनप्रकाश जैन यांनी केले. हस्तिनापूर येथून ऑनलाईन सहभागी झालेल्या परमपूज्य आर्यिकारत्न डॉ. चंदनामती माताजी व गणिनिप्रमुख श्री ज्ञानमती माताजी ऑनलाईन संवाद साधताना म्हणाल्या, "मांगीतुंगी सिद्धक्षेत्र येथे सोळा दिवसांपासून सुरू आहे. देशभरातील १ लाखापेक्षा जास्त भाविक सहभागी झाले. त्यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे. महामस्तकाभिषेक सोहळ्याची आज पूर्णाहुती असली तरी १० जुलै पर्यंत पुण्यवान भाविकांना संधी मिळणार आहे. त्याचा लाभ घेऊन भाविकांनी सहकुटुंब येऊन, दर्शन, अभिषेक, पूजनाचा लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी बोलताना त्यांनी केले." 

          सजवलेल्या पंचामृत कलशांमध्ये शेकडो लिटर नारळपाणी, ऊसाचा रस, तूप, दूध, दही, सर्वौषधि तसेच हरिद्रा, लालचंदन, श्वेत चंदन, चतुष्कोण कलश, केशर, सुगंधी फुले, यांचा समावेश करण्यात आला. राजस्थानातील भरतपूर  येथून आलेले गायक संतोष यांनी सुमधुर भजनांनी वातावरणात पावित्र्य निर्माण केले. दिवसभर लांबलांबून भाविकांची वर्दळ सुरू होती. दुपारच्या सत्रात भगवान पार्श्वनाथ महामंडल विधान - पूजनाने वातावरण दुमदुमून गेले. संध्याकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. त्यात गायन, वादन, नृत्य तसेच धार्मिक विषयावरील नाटीकांचा समावेश होता. उत्तरोत्तर भाविकांची गर्दी वाढत असून त्याचे सुयोग्य नियोजन पीठाधीश रवीन्द्र किर्ति स्वामीजी, महामंत्री संजय पापडीवाल व  ट्रस्ट मंडल यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. निवास, भोजन व वाहतूक व्यवस्था प्रमुख विशेष परिश्रम घेत आहेत. आता यापुढे
महामस्तकाभिषेकाचे शेवटचे १० दिवस राहिल्याने कालही सायंकाळी परगावाहून येणाऱ्या भाविकांची गर्दी होती.

***********************************
नवग्रहांच्या जयघोषात झाला शिलान्यास !
  ऋषभदेवपुरम येथे मध्यवर्ती भागात १३५ फूट उंचीच्या नवग्रहशांती जिनमंदिराची उभारणी करण्यात येत आहे. त्याचा शिलान्यास समारंभ काल सकाळी  देणगीदारांच्या हस्ते करण्यात आला. सुभाषचंद साहू यांच्या धर्मपत्नी मंगला साहू या जम्बूद्विप, हस्तिनापूर येथून सहपरिवार उपस्थित होत्या. पीठाधीश रवींद्रकीर्ती महाराज, अधिष्ठाता अभियंता सी. आर. पाटील,महामंत्री संजय पापडीवाल, भुषण कासलीवाल व महोत्सव समितीचे कार्यकारिणी सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजापाठ करण्यात आला. प्रतिष्ठाचार्य विजयकुमार जैन यांनी पौरोहित्य केले. अष्टदिशा पूजन, क्षेत्रपाल व कलश स्थापना करून सोन्याचांदीच्या प्रतिकात्मक विटा व विनायक यंत्र, रक्षा यंत्र, अक्षीणवृद्धी यंत्र व महालक्ष्मी यंत्र मान्यवरांच्या हस्ते स्थापित करण्यात आले. या मंदिराच्या गर्भगृहासाठी सुरतचे विद्याप्रकाश, संजयकुमार व अजय जैन बंधूंनी देणगी दिली आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे लोखंडाचा वापर न करता पूर्णपणे दगडी बांधकाम होणार आहे इंजिनिअर मयूर जैन यावेळी उपस्थित होते. त्यांनी एक वर्षाच्या आधीच बांधकाम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प केला आहे.

**********************************
विशेष योगदात्यांचा सन्मान !
      यंदा सहा वर्षांनी सलग २५ दिवस सुरू राहिलेल्या भगवान ऋषभदेव महामस्तकाभिषेक सोहळ्यात अनेकांचे तन, मन धनाने अखंड योगदान आहे. त्यातील विशेष सेवाकार्य करणाऱ्या तिघांचा काल पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामींच्या हस्ते अभिनंदनपत्र देऊन प्रतिनिधीक स्वरुपात सन्मान करण्यात आला. मुंबईचे अशोक दोशी, इंदोरचे हसमुख गांधी व उर्मिला गांधी, पुण्याच्या सुजाता शहा व सहकारी यांना गौरविण्यात आले. त्यांनी मनोगतात आपल्याला सेवेची संधी मिळाल्याने जीवनात समाधान असल्याचे सांगितले तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून जल्लोष केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !