सर्व धर्मोस्तू मंगलम् जयघोषात महामस्तकाभिषेक ! जैन तीर्थंकरांच्या शिकवणीनुसार सर्व धर्म समभावाचे दर्शन !!

सर्व धर्मोस्तू मंगलम्  
जयघोषात महामस्तकाभिषेक ! 
ऋषभदेवपुरम- मांगीतुंगी(प्रतिनिधी)::- काल मंगळवारी ( दि.२८) मांगीतुंगी सिद्धक्षेत्र येथे जैन तीर्थंकरांच्या शिकवणीनुसार सर्व धर्म समभावाचे दर्शन घडले.  सर्व धर्म मंगलम् अश्या  जयघोषात विश्व कल्याणाची प्रार्थना करण्यात आली. उपस्थित भाविकांनी ऋषभदेव व सर्व तीर्थंकरांच्या नावांनी जयघोष केला. उपस्थित सर्व श्रावक- श्राविकांनी अतिशय श्रद्धापूर्वक अभिषेक, पूजनाचा व रत्नवृष्टीचा सात्विक आनंदही मिळवला.

                सोमवारी रात्री परराज्यातील भाविक बसेस व खासगी वाहनांनी ऋषभदेवपुरम येथे दाखल झाले. त्यामुळे काल विविध प्रांतातील दिगंबर जैन समाजाचा मोठा मेळा जमला होता. उत्तरप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात येथून अनेकजण आले.

काल मंगळवारी ( दि. २७) पहाटेपासून भाविकांची सहकुटुंब, सहपरिवार ऋषभदेवपुरम येथून ऋषभगीरीवर जाण्यासाठी रीघ लागली होती. सकाळपासून  पवित्र वातावरणात व उत्साहात भगवान ऋषभदेवांच्या १०८ फुटी उंच अखंड पाषाण मूर्तीवर पंचामृत महामस्तकाभिषेक झाला.

प्रथम कलशाचा मान जैन समाजातील सर्व संत परंपरेचे पाईक असलेले श्रीपाल गंगवाल यांना आदरपूर्वक देण्यात आला. त्यांच्यासमवेत पुत्र सुशील व सून शर्मिली उपस्थित होते.  त्यांनी धन्य मनोभावे पूजन करून झाल्याची भावना व्यक्त केली. पंचामृत कलशही त्यांनीच सहपरिवार अर्पण केला.

महामस्तकाभिषेकाच्या प्रारंभी संकल्प, प्रार्थना यांचे पौरोहित्य हस्तिनापूरचे प्रधान आचार्य विजय जैन, व सत्येंद्र जैन यांनी केले. पवित्र जलाभिषेक, दुग्धाभिषेक, पंचामृताभिषेक करून भाविकांनी पुण्यप्राप्ती केली. महाशांतीधारा कलश राजस्थानातील भिलवाडा येथून आलेले कमलजीत तसेच अतिषा, अमन, भावना, नमन, पूजा, पुनीत या कोठारी  परिवाराने समर्पित केला. तर दुसरा शांतीकलश अर्पण करण्याचा मान पुण्याच्या उज्ज्वला व सुजाता शहा याना मिळाला.  कानपूर येथून आलेले प्रदिप जैन व चंदा, हिमांशू, रिया यांच्या तसेच कोल्हापूरचे सुदर्शन हुल्ले व सौ.त्रिशला आणि अमोल व सारिका, सर्वज्ञ पाटील हस्ते रत्नकलशातून अनमोल रत्नवृष्टी समर्पित करण्यात आली. 

                  सर्वांना पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामींजींनी आशिर्वाद प्रदान केले. त्यांच्या व  हस्ते सर्वांचा सन्मान करण्यात आला. काल महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या चौदाव्या दिवशी मंगळवारी गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजी व प्रज्ञाश्रमणी आर्यिका श्री चंदनामती माताजी यांचे स्मरण करून श्रीफल अर्पण करण्यात आले. स्वामीजी रवींद्रकीर्ती महाराजांनी प्रास्ताविकात शुभाशीर्वाद दिले. अधिष्ठाता सी. आर. पाटील, खजिनदार प्रमोद कासलीवाल अशोक दोशी.... आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मंगलाचरणाने प्रारंभ होऊन स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. जीवनप्रकाश जैन यांनी केले. हस्तिनापूर येथून ऑनलाईन सहभागी झालेल्या परमपूज्य आर्यिकारत्न डॉ. चंदनामती माताजी व गणिनिप्रमुख श्री ज्ञानमती माताजी ऑनलाईन संवाद साधताना म्हणाल्या, "मांगीतुंगी सिद्धक्षेत्र या अतिशय पवित्र भूमीत विकासाच्या अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी दानशूर व्यक्तींनी, परिवारांनी सढळ हाताने दान द्यावे. येथे सलग होणारे पूजापाठ व महामस्तकाभिषेक याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. अजूनही येत्या ३० तारखेपर्यंत भाविकांनी सहकुटुंब येऊन, दर्शन, अभिषेक, पूजन यांचा लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी बोलताना त्यांनी केले." 

                 सजवलेल्या पंचामृत कलशांमध्ये शेकडो लिटर नारळपाणी, ऊसाचा रस, तूप, दूध, दही, सर्वौषधि तसेच हरिद्रा, लालचंदन, श्वेत चंदन, चतुष्कोण कलश, केशर, सुगंधी फुले, यांचा समावेश करण्यात आला. जयपूर येथून आलेले गायक संतोष यांनी सुमधुर भजनांनी वातावरणात पावित्र्य निर्माण केले. दिवसभर लांबलांबून भाविकांची वर्दळ सुरू होती. दुपारच्या सत्रात भगवान पार्श्वनाथ महामंडल विधान - पूजनाने वातावरण दुमदुमून गेले. संध्याकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. त्यात गायन, वादन, नृत्य तसेच धार्मिक विषयावरील नाटीकांचा समावेश होता. उत्तरोत्तर भाविकांची गर्दी वाढत असून त्याचे सुयोग्य नियोजन  महामंत्री संजय पापडीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. निवास, भोजन व वाहतूक व्यवस्था प्रमुख विशेष परिश्रम घेत आहेत. आता महामस्तकाभिषेकाचे शेवटचे काही दिवस राहिल्याने कालही सायंकाळी परगावाहून येणाऱ्या भाविकांची रीघ लागली होती.
**********************************
प्रेमाने भोजन वाढणारे हात !
  ऋषभदेवपुरम येथे येणाऱ्या सर्व भाविकांसाठी विनामूल्य निवास व भोजनाची सुरेख व्यवस्था करण्यात आली आहे.  राज्यासह परप्रांतातून येणाऱ्या सर्व भाविकांना जे सुग्रास भोजन दिले जाते. तेच पीठाधीश रवींद्रकीर्ती महाराजांना असते. कोणताही कनिष्ठ - वरिष्ठ असा भेदभाव केला जात नाही. मध्यप्रदेशातील रतलाम येथून आलेले मेवाड केटरर्सचे १२५ कर्मचारी शुद्ध, सात्विक भोजनाची व्यवस्था पहातात. पं. बालकिशन यांच्या नेतृत्वाखाली जयेश, गुड्डू, गौतम, दिलीप, धनराज, मनीष, प्रताप, पंकज, आशिष, नाथुराम हे अतिशय प्रेमाने भोजन वाढतात. ४० जणांचा चमू सकाळचा नाश्ता, चहा, दुपारचे व संध्याकाळचे जेवण करण्यात व्यस्त असतो. दररोज वेगवेगळा मेनू सर्वांची रसना तृप्त करतो. सर्वांनी पोटभर जेवावे पण अन्न वाया जाऊ नये याकडेही त्यांचा कटाक्ष असतो.
*************************************
विशेष रजतकलशातून अभिषेकाची संधी !
   काल विशेष रजतकलशातून पवित्र महामस्तकाभिषेक करण्याची संधी काही भाग्यवान परिवारांना मिळाली. 
निर्मलकुमार जैन तसेच अभिषेक, राहुल, छाया, अनुभा, तनस्वी परिवाराने आणि झारखंड येथून आलेले सुरेश, मीना, दीक्षा तनू , टिया बाकलीवाल परीवाराने अभिषेकाचे सात्विक समाधान मिळवले. ज्ञानमती माताजींचे  बंधू सुभाषचंद जैन व सौ. सुषमादेवी जैन यांनी पूजाअर्चा करून भगवान ऋषभदेव यांना उत्तम पर्जन्यवृष्टी होऊन सर्वत्र समाधान पसरावे अशी प्रार्थना केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !