३५ वर्षांनंतर १५० पोलिस अधिकारी जेव्हा एकमेकांना भेटतात ! खालील लिंकवर क्लिक करून कुठे भेटलेत ? वाचा सविस्तर


महाराष्ट्र पोलिस अकॅडमीत 
भेटले ३५ वर्षांपूर्वीचे सहकारी
नाशिक ( प्रतिनिधी ) - १९८७ बॅचचे पोलिस अधिकारी ३५ वर्षांनंतर एकमेकांना भेटले. यावेळी आठवणी जागवतानाच सोनेरी क्षणांना उजाळा देण्यात आला. त्यासाठी निवृत्त अधिकारी विनोद सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय चांगले नियोजन केले. त्यामुळे १५० जणांना महाराष्ट्र पोलिस अकॅडमी येथे आयोजित स्नेहसंमेलनात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यात सुमारे १० महिला पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश होता. सारेजण या सोहळ्यात हरखून गेले. सेवानिवृत्त झालेल्या किंवा त्या उंबरठ्यावर असणाऱ्या सर्वांनाच आपण अजूनही तरुण असल्याचा आनंद मिळाला.

  १५ जून १९८७ ते ३१ मे १९८८ या वर्षभरात नाशिकच्या तत्कालीन पीटीसीमध्ये महाराष्ट्रातील ३०० व गोव्यातील २८ युवकांनी कठोर प्रशिक्षण घेतले. त्यात ३० युवतींचीही त्यावर्षी प्रथमच एमपीएससीद्वारा निवड झाली होती. त्या साऱ्यांना एकत्र आणून नाशिकला दोन दिवसांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. विनोद सावंत यांच्या मूळ संकल्पनेला अनेकांनी साथ दिली. दरम्यानच्या काळात बहुतेकजण सेवानिवृत्त झाले. ४६ जण दिवंगत झाले. मात्र महिला अधिकाऱ्यांसह १५० जणांनी सहभाग नोंदवला.

आपल्या मातृसंस्थेत ३५ वर्षांनी दाखल झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. महाराष्ट्र पोलिस अकॅडमीचे कार्यकारी संचालक शिवाजी पवार कार्यक्रमात बोलताना म्हणाले, या स्नेहसंमेलनाने आपण सर्व एक आहोत ही भावना बळकट केली आहे. मी समोर उपस्थित अनेक अधिकाऱ्यांसमवेत काम देखील केले आहे.असे त्यांनी नमूद करतांना संचालक राजेश कुमार यांचे हे सगळे श्रेय असल्याचे सांगितले. त्यांच्याहस्ते सर्वांना सुंदर स्मरणचिन्ह देण्यात आले.
  कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक संयोजक विनोद सावंत यांनी केले. ते म्हणाले, आमच्या १९८७ सालच्या बॅचच्या अनेकांनी वरिष्ठ दर्जाचे पोलिस अधिकारी म्हणून सेवा बजावली. अनेकजण सन्मान पदक विजेते असून दोन महिलांनी शिवछत्रपती पुरस्कार मिळवले आहेत. आमचे सहकारी शशांक शिंदे मुंबई बॉम्बस्फोटात शहीद झाले. आज ३५ वर्षांनी  पीटीसीत येताना सर्वांचाच ऊर अभिमानाने भरून आला. येथेच मातीच्या गोळ्यातून सुंदर मूर्ती घडविण्याचे व आम्हाला सुसंस्कारित करण्याचे काम तत्कालीन शिक्षकांनी केले. त्या साऱ्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण होत आहे. १९०९ साली स्थापन झालेल्या पीटीसीचे १९९१ साली अकॅडमीत रूपांतर झाले.

आता नव्या रूपाने विशाल वटवृक्ष झाला आहे हे पाहून समाधान वाटते असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी गोव्याहून आलेले महेश गावकर व महिला अधिकाऱ्यांतर्फे गोपिका जहागिरदार यांनी मनोगतात सर्वांच्याच भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे खुसखुशीत सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले. स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी निशिकांत पाटील, शिवाजी शिंदे, शेखर तावडे , जगन पिंपळे व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. दिवसभराच्या कार्यक्रमात सर्वांनी आपल्या वसतिगृहातील तेव्हाच्या खोल्या, वाचनालय, नवीन झालेला जलतरण तलाव, आधुनिक फायरिंग रेंज, सिंथेटिक ग्राऊंड व विविध विभागांना भेट दिली. पुन्हा परस्परांना भेटण्याचे अभिवचन देत कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !