अनुभव घेऊनच मराठी शाळांची सदिच्छादूत झाले –अभिनेत्री चिन्मयी सुमीत

अनुभव घेऊनच मराठी शाळांची सदिच्छादूत झाले –अभिनेत्री चिन्मयी सुमीत

मुंबई (प्रतिनिधी)::-‘मी माझ्या मुलांना मराठी शाळेत घातलं. मराठी शाळा सहज आनंददायी शिक्षण देतात याची खात्री झाल्यावरच मी मराठी शाळांची सदिच्छादूत झाले म्हणजे अनुभव घेतला मगच मी मराठी शाळांची जाहिरात करते’, असे अभिनेत्री चिन्मची सुमीत म्हणाल्या. शनिवार दि. १७ रोजी डॉ. बाळ भालेराव सभागृह, मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव येथे मुंबई मराठी साहित्य संघ आणि मराठी अभ्यास केंद्र यांच्या एकत्रित प्रयत्नांनी आयोजित केलेल्या मराठीप्रेमी पालक मेळाव्यात बोलत होत्या. 

       मराठी संस्कृती टिकवायची असेल तर मराठी भाषा टिकली पाहिजे आणि मराठी भाषा टिकवण्यासाठी मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, असे मुंबई मराठी साहित्य संघाचे कार्यवाह अशोक बेंडखळे यांनी म्हटले. मराठी पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत घातले पाहिजे. त्यासाठी पालकांनी एकत्र येऊन ठिकठिकाणी असे मेळावे आयोजित केले पाहिजेत, असे मराठी अभ्यास केंद्राचे कार्यवाह आनंद भंडारे यांनी म्हटले. 
चिकित्सक समूह शिरोडकर हायस्कूलच्या मुख्याध्यापक विजयालक्ष्मी शिंदे आणि चिकित्सक समूह तेलंग बालोद्यानच्या आरती पेवेकर यांनी आपल्या शाळेत होणाऱ्या प्रयोगशील उपक्रमांची माहिती दिली. 
        मराठी माध्यमात शिकल्यामुळे आत्मविश्वास निर्माण झाला, कारण गोष्टी समजल्या की प्रश्न निर्माण होतात आणि त्यातून आणखी समज वाढते, असे मराठी शाळेत शिकलेल्या बालरोग व्यवसायविषयक समुपदेशक डॉ. मानसी कदम यांनी म्हटले. त्या पुढे म्हणाल्या की, मातृभाषेत शिक्षण घेतल्या मुळे शाळेत आणि उच्च शिक्षण घेताना प्रश्न विचारायचा कधी संकोच वाटला नाही. मनातील भीती नाहीशी झाली. मातृभाषेतल्या शिक्षणाने मला के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये शिकत असताना खूप उपयोग झाला. मराठी भाषेतील शिक्षणामुळे वाचनाची आवड निर्माण झाली. वडिलांच्या सामाजिक कामामुळे शिबीर, अभ्यासवर्ग, आंदोलनात जात राहिले. त्यामुळे सामाजिक समज ही आपोआप मिळत गेली. भाऊ परदेशात नोकरी करतो. तो ही मराठी माध्यमातून शिकला तो आता मराठी सोबत इंग्रजी आणि जर्मनी बोलतो. मराठीमुळे आमचे बिलकुल नुकसान झाले नाही, असे डॉ. मानसी कदम यांनी सांगितले.
मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी मराठी माणूस आणि मराठी भाषा, मराठी शाळा यांच्यात आंतरिक नाते असल्याचे सांगीतले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई मराठी साहित्य संघाच्या अध्यक्ष अचला जोशी यांनी भूषविले असून संस्कारक्षम वयात ज्ञान मिळवण्यासाठी मातृभाषा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते, असे उद्गार त्यांनी काढले. सूत्रसंचालन मराठी अभ्यास केंद्राच्या प्रतीक्षा रणदिवे यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्रमुख कार्यवाह डॉ. अश्विनी भालेराव यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जिल्हा परिषदेतील ५१ परिचर यांना कनिष्ठ सहाय्यक पदी पदोन्नती !

प्रेरणादायी गोष्टींमधून विशेष बालकांनी अनुभवले छत्रपती शिवाजी महाराज !

बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी पहिले १००० दिवस महत्वाचे !