चौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाचे उद्घाटन ! ..... आणि मी तरून गेलो, मायबाप सरकारच्या कृपेने मला दोन-अडिच वर्षे तुरूंगात जावे लागले. तुरूंगातील तो रूक्षकाळ निभावून नेण्यासाठी त्यावेळी पुस्तकांनी मित्रांसारखी मदत केली. तुरूंगात वेळच वेळ असल्याने इंग्रजी आणि मराठी भाषेतील अनेक पुस्तके वाचनाचा योग आला.-- छगन भुजबळ

चौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाचे उद्घाटन !
पुस्तकांच्या रूपाने विचारवंत आणि तज्ज्ञ सदैव वाचकांच्या समवेत- छगन भुजबळ, माजी पालकमंत्री
    नाशिक::- जागतिक स्तरापासून ते स्थानिक पातळीपर्यंत अनेक विचारवंत आणि तज्ज्ञांनी त्यांचे विचार आणि जीवनदृष्टी पुस्तकांच्या माध्यमातून शब्दबद्ध करून ठेवली आहे. वेळोवेळी प्रकाशकांनी ती पुस्तके प्रकाशित केल्याने ते विचारवंत आणि तज्ज्ञ शरीररूपाने आपल्यात नसले, तरी पुस्तकांच्या माध्यमातून आपल्यात आहेत, अशी भावना नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. 
         अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ पुणे, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाची नाशिक शाखा आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित दोन दिवसीय चौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. 


        यावेळी व्यासपीठावर या संमेलनाचे अध्यक्ष मॅजेस्टिक प्रकाशनाचे संचालक अशोक कोठावळे, विश्वास बँक लि., नाशिकचे संस्थापक विश्वास ठाकूर,  ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणेचे अध्यक्ष राजीव बर्वे,  शिरीष चिटणीस, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, नाशिक शाखेचे अध्यक्ष विलास पोतदार, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणेचे उपाध्यक्ष दत्तात्रय पाष्टे, नाशिक शाखेचे कार्यवाह सुभाष सबनीस, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिकचे कार्यवाह मकरंद हिंगणे, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, नाशिक शाखेचे उपाध्यक्ष वसंत खैरनार, नाशिक शाखेचे खजिनदार जी. पी. खैरनार, मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष तथा न्यूज मसाला चे संपादक नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अमृत महोत्सवानिमित्त ज्येष्ठ कवी  अशोक नायगावकर यांचा सत्कार छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला.  यावेळी शिरीष चिटणीस संपादित गरूडझेप या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच लेखिका सुनीता पवार यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले .


          यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, लेखक त्याच्या लेखनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना जगण्याचा दृष्टिकोन देत असली तरी ती पुस्तके प्रकाशकांकडून प्रकाशित होत असल्याने लेखक आणि वाचक यांच्यातील दुवा आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. नाशिक ही भूमी प्रभू रामचंद्रांसाठी ओळखली जाते, तशीच ती कुसुमाग्रजांसाठी देखील प्रसिद्ध आहे. नाशिक शहाराला अनेक विव्दान लेखक आणि विचारवंतांची परंपरा लाभली असून त्यांनी अजरामर साहित्य निर्मिती केलेली आहे. 
************************************
........ आणि मी तरून गेलो
      मायबाप सरकारच्या कृपेने मला दोन-अडिच वर्षे तुरूंगात जावे लागले. तुरूंगातील तो रूक्षकाळ निभावून नेण्यासाठी त्यावेळी पुस्तकांनी मित्रांसारखी मदत केली. तुरूंगात वेळच वेळ असल्याने इंग्रजी आणि मराठी भाषेतील अनेक पुस्तके वाचनाचा योग आला.
              -- छगन भुजबळ
*************************************
         यावेळी बोलताना या संमेलनाचे अध्यक्ष  मॅजेस्टिक प्रकाशनाचे संचालक अशोक कोठावळे म्हणाले की, गेली चाळीस वर्षे एक ग्रंथ विक्रेता, प्रकाशक आणि ललित मासिकाचा आणि 'दीपावली' वार्षिकाचा संपादक म्हणून हा ग्रंथव्यवहार मला जवळून पाहता आला. त्यामुळे लेखकाबरोबर प्रकाशक आणि प्रकाशकाबरोबर लेखकही समृद्ध होत असतो, हे मी प्रत्यक्ष अनुभवाने सांगू शकतो. प्रकाशकाचे लेखकावर, साहित्यावर आणि पुस्तकांवर प्रेम असले पाहिजे. पुस्तकाची चांगली आणि निर्दोष निर्मिती करणे हे त्याचे महत्त्वाचे काम आहे. त्याची योग्य प्रकारे जाहिरात करून ते अधिकाधिक वाचकांपर्यंत कसं पोहोचेल ते बघणे. प्रकाशकांनी नवनवीन विषयांचा आणि लेखकांचा शोध घेतला पाहिजे आणि आताचे बरेच प्रकाशक तो घेताना दिसत आहेत. पुस्तकाच्या निर्मितीत चित्रकारांचा, मुद्रितशोधक, मुद्रक,  अशा अनेक व्यक्तींचा देखील महत्त्वाचा वाटा असतो. हे घटन लेखकाच्या आशयाला अधिक अर्थपूर्ण करीत असतात. आज मुद्रितशोधकांची संख्या कमी कमी होऊ लागली आहे, ही चिंतेची बाब आहे.  ग्रंथव्यवहाराचा पाया खरं म्हणजे प्रकाशक आहे. लेखकांची पुस्तके प्रकाशित केल्यानंतर या साहित्यिकांपैकी एका साहित्यिकाची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी केली जाते. या संमेलनाच्या कार्यवाहीसाठी जी समिती नेमतात, त्यामध्ये प्रकाशकांचा प्रतिनिधी असतो का ? दुर्दैवाने त्याचे उत्तर नाही असे आहे. प्रकाशकांचा प्रतिनिधी असेल तर पुस्तकांचे स्टॉल मांडण्याची जागा वगैरे गोष्टींवरून अलीकडे जी वादावादी होते, ती टाळता येईल. संमेलनातील पुस्तक-विक्री ही प्रकाशकांसाठी संधी असते, अशा वेळी संमेलनस्थळापासून दूर कुठेतरी स्टॉलची व्यवस्था केली तर वाचक या ग्रंथदालनाकडे कसे वळणार? आणि विक्री कशी होणार? प्रकाशकांचा  प्रतिनिधी असेल तर तो आपल्या अशा काही अडचणी समितीपुढे मांडू शकेल, याकडेही अशोक कोठावळे यांनी यावेळी सर्वांचे लक्ष वेधले. 
        यावेळी बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, लेखकाइतकेच प्रकाशकाचे काम महत्त्वाचे आणि मोलाचे असते. आज आपण जे विविध साहित्य प्रकार अनुभवतो ते सर्व साहित्य प्रकार प्रकाशकांनी आधी स्वीकारले म्हणून ते साहित्य प्रकार उदयास आले. प्रकाशकांनी लेखकांची पाठराखण केली पाहिजे. विद्यार्थी ग्रंथालयांकडे कसे वळतील हे पाहणे आवश्यक आहे. 
        यावेळी बोलताना स्वागताध्यक्ष विश्वास ठाकूर म्हणाले की, प्रकाशन विश्वावर मंदीचे सावट असले तरी वाचकांची खरेदी क्षमता आणि प्रकाशकांचे व्यावसायिक गणित यांचा ताळमेळ साधत नवीन पुस्तके प्रकाशित झाली पाहिजे.
         यावेळी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणेचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी संमेलन आयोजनामागील भूमिका विशद केली. या संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र वाळूंजकर यांनी केले, तर सुभाष सबनीस यांनी आभार मानले.



छायाचित्र ओळीः- अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ पुणे,  अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाची नाशिक शाखा आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित दोन दिवसीय चौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. यावेळी शिरीष चिटणीस संपादित गरूडझेप या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी (डावीकडून) विश्वास ठाकूर, रवींद्र गुर्जर, अशोक कोठावळे,  छगन भुजबळ, अशोक नायगावकर, प्रा. मिलिंद जोशी आणि शिरीष चिटणीस.


छायाचित्र ओळीः- अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ पुणे,  अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाची नाशिक शाखा आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित दोन दिवसीय चौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. यावेळी अमृत महोत्सवानिमित्त ज्येष्ठ कवी  अशोक नायगावकर यांचा सत्कार छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी (डावीकडून) अशोक कोठावळे,  छगन भुजबळ, अशोक नायगावकर, प्रा. मिलिंद जोशी आणि राजीव बर्वे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

प्रशासन की ताकद !! बिगर मंत्री मंडल की सहायता के भी प्रदेश का शासन सफलतापूर्वक चलाया जा सकता है । प्रशासन को भी उन्होंने यह स्पष्ट संदेश दिया है कि मंत्रियों के बीच विभागों के बंटवारे के न हो पाने के बावजूद मुख्यमंत्री पूरे प्रदेश को ‘‘नौकरशाही‘‘ के माध्यम से आवश्यक कार्य निष्पादित (एग्जीक्यूट) कर संदेश देने में सक्षम हैं।