एवरेस्ट बेस कॅम्प सफर ! जयश्री काकड यांच्या शब्दांत थरारक, हिंमतीचा, प्रेरणादायी स्वानुभव ! सफरीतील अडथळ्यांवरील मात करत केलेला अतुलनीय प्रवास !!

एवरेस्ट बेस कॅम्प सफर !
जयश्री काकड यांच्या शब्दांत थरारक, हिंमतीचा, प्रेरणादायी स्वानुभव !
सफरीतील अडथळ्यांवरील मात करत केलेला अतुलनीय प्रवास !!
 
             कधी कधी आयुष्यात असे काही चमत्कारिक घडते की स्वतःलाच विश्वास बसत नाही, असाच चमत्कारिक योग माझ्या नशीबात आला. एकदा माऊंट एव्हरेस्ट उघड डोळ्यांनी प्रत्यक्षात  बघावा अशी अगदी लहानपणापासूनची इच्छा होती. तसे करण्यासाठी EBC Everest BACE CAMP नावाची ट्रेक असते ह्याबद्दल माहिती मिळवली. (उंचाईया नावाचा चित्रपटाने त्यात मोलाची कामगिरी बजावली) माऊंट एव्हरेस्ट जर मला बघायचा आहे तर तसे करण्यासाठी EBC - Everest BACE CAMP नावाची ट्रेक असते ह्याबद्दल मला माहिती मिळाली. (अर्थात उंचाईया नावाच्या चित्रपटाने त्यात मोलाची भर पाडली.) आणि बस्स स्वतःहूनच ठरवून टाकले. जायचे म्हणजे जायचेच Google वर सर्च केल्यावर थ्रिलोफिलिया नावाची ट्रॅव्हल कंपनी अशी टूर अरेंज करते असे समजले. वेबसाईट वर दिलेल्या संपर्क क्रमांका वर सपंर्क साधला तेव्हा त्यांच्या ऑपरेशन टीम मध्ये असलेल्या किंजल हिने त्या ट्रेक बद्दल आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चा बद्दल अगदी व्यवस्थित माहिती दिली. त्यामध्ये हा ट्रेक कधी करू शकतो, ह्यासाठी योग्य कालावधी कोणता, त्यासाठी कशाप्रकारची तयारी आवश्यक आहे, पेमेंट हप्ते कसे असणार ह्या सर्व गोष्टी सांगितल्या.

          किंजलने ट्रेकबद्दल इथंभूत माहिती दिली, तेव्हाच समजले ही टूर वाटते तितकी सोपी नाही, पण मुळातच नेहमी नवनवीन आव्हाने स्वीकारण्याची अंगभूत सवय असणारी मी मागे कुठे हटणार, साधारण ६ महिने आधी म्हणजे नवंबर २०२२ मध्ये मी टूरचे बुकिंग करून टाकले. हाताशी ६ महिण्याचा कालावधी आहे, करू स्वतःला ह्या ट्रेक साठी ट्रेन असा विचार करून, करून टाकले बुकिंग, ही गोष्ट वेगळी कि अनेक वेगवेगळ्या कारणामुळे स्वतःच्या फिटनेससाठी फक्त ३ महिन्यांचा कालावधी देऊ शकले. त्यामध्ये योग्य आहार (आवडीच्या पदार्थांचा त्याग), योगा, श्वसन अभ्यास- अनुलोम - विलोम, कपालभाती, प्राणायाम,  दिवसा आड ३० किमी. सायकलिंग, ज्यादिवशी सायकलिंग बंद त्यादिवशी ५ किमी. चालण्याचा व्यायाम, कार्डियो एक्सरसाइझ, व इतर असे व्यायामाचे वेगवेगळे प्रकार करून स्वतःला फिट ह्या परिभाषेत बसवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला.


            १ एप्रिल ते १४ एप्रिल असा ट्रेकिंग स्लॉट मला मिळाला. आणि माझी व माझ्यासाठी घरच्यांची प्रवासासाठी तयारी सुरु झाली. प्रत्येक दिवसाचे कपडे स्पोर्ट्स टी- शर्ट, ट्रेकिंग पँट्स, २ थर्मल जोडी, २ सन कॅप, २ मंकी कॅप, कॅमल बॅग (पाणी पिण्याची एक प्रकारची पिशवी अशी २ लिटरची पिशवी जी आपण पाठीवरच्या बॅगमध्ये ठेऊ शकतो आणि त्याचा पाईप खांद्याजवळ आलेला असतो जेणे करून आपण सारखे पाणी पित स्वतःला डीहायड्रेशन होण्यापासून वाचवू शकतो), बॅक पॅक, पोर्टर बॅग, डाउन जॅकेट, २ थर्मास, ४ वूलन सॉक्स, ट्रेकिंग शूज, वेगवेगळी मेडिसिन्स, -२० dc स्लीपिंग बॅग, पोल स्टिक्स, सासूबाईंनी खास करून माझ्यासाठी बनवलेले खारीक - खोबऱ्याचे लाडू, मुलीने स्वतःचा अभ्यास बाजूला ठेवून बनवलेल्या दशम्या, चटण्या, नेपाळ मध्ये भारतीय चलन १०० आणि ५० च्या नोटा काठमांडूमध्ये स्वीकारले जाते पण ५०० आणि २००० च्या नोटा तेथे अस्वीकार्य आहे असे समजल्यावर माझे सासरे श्री. वासुदेव काकड यांनी मोठ्या प्रयत्नांनी त्या नोटा मिळवून दिल्या. आणि अजून बरेच काही......  असे सर्व सामान २ बॅग मध्ये ते पण सॉफ्ट केस आणि व्हील लेस बॅग मध्ये भरून १ एप्रिलला माझा नेपाळ साठीचा प्रवास सुरु झाला.


           ३१ मार्च च्या रात्री ३ ला उठून टूर्स ट्रँव्हलच्या गाडीने मला मुंबई एअरपोर्टला आणून सोडले. माझा विमानाचा पहिला प्रवास,  मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने मी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय एयरपोर्टच्या प्रवेशद्वाराशी गेले, पण वोटर आयडी नसल्याने आतमध्ये सोडण्यास मनाई केली. नेपाळ मधील टूर गाईडच्या सांगण्यानुसार आधारकार्ड/ ड्रायविंग लायसन्स / पॅन कार्ड अशाप्रकारचे कुठलेही सरकारमान्य डॉक्युमेंट्स च्या आधारावर तुम्ही आरामात आमच्या देशात येऊ शकता, पण कुणीही वोटर आयडी बद्दल मला काहीही सांगितले नाही पासपोर्ट रेनिव्हल नसल्याने तो बरोबर घेण्याचा संबंधच नव्हता. झाले, माझी आयुष्यातली पहिले फ्लाईट माझ्या डोळ्यासमोर उडून गेली, ते उडण्या आधीच माझे पती आणि दीर नाशिक हून साधारण अडीच तासात माझे वोटर आयडी घेऊन एअरपोर्टला येऊन पोहचेल होते पण इम्मीग्रेशन साधारण १ तास आधीच करावे लागते त्यामुळे मला ती फ्लाईट सोडूनच दयावी लागली. आता ही फ्लाईट काही मला घेता नाही येणार हा अंदाज आल्याने त्यांनी माझ्यासाठी दुसऱ्या दिवसाची सकाळी ७. ३० ची दुसरी फ्लाईट बुक करून टाकली. असा पहिल्या दिवशी माझ्या प्रवासात व्यत्य आला.


             आता काय करावे ह्या विचारात असतांना माझ्या नणंदबाई पल्लवी पाटील यांना सर्व प्रकार समजला, त्यांच्या घरी इंटेरियर डेकोरेशनचे काम चालू होते तरी मोठया प्रेमाने पल्लवी आणि त्यांचे पती श्री. विरेंद्र पाटील यांनी अंधेरी येथील घरी थांबण्यासाठी आमंत्रित केले. त्यांच्या घरी पोहचे पर्यंत मी टूर गाईडला एक दिवस लेट असल्याचे कळवून ठाकले, माझ्याप्रमाणे एक बेंगलोर येथील एका ग्रुप सदस्यांची देखील वोटर आयडी नसलेल्याची फ्लाईट मिस झाली, आणि त्याचे दुर्दैव त्याला दुसऱ्या दिवशी पण फ्लाईट मिळाले नाही, आणि तो येऊ देखील शकला नाही.
              एक दिवस उशीर असा माझा २ तारखेला सकाळी ७. ३० ला विस्तारा एयरलाईन्स कंपनीच्या विमानाने विमान प्रवास सुरु झाला. माझ्या  पोटात असंख्य फुलपाखरं उडू लागले होते, कारण विमान प्रवासाबद्दल मी ऐकून होते की टेक - ऑफ होतांना पोटात गोळा येतो, खूप भीती वाटते, घाबरायला होते, पण  छे तसे मुळीच काही नव्हते उलट मला खूप मजा  वाटली, वर आकाशात उडालेल्या विमानाच्या खिडकीतून बाहेर बघितल्यावर, एवढी  अवाढव्य मुंबई काही क्षणात हातात समवेल अशी इतकीशी होऊन गेली हे खूप चमत्कारिक दृश्य होते. २ तास ३० मिनिटात, मी सकाळच्या १०. ३० ला काठमांडूला जाऊन पोहचली, टूर गाईड ने मला रिसिव्ह करण्यासाठी गाडी आणि एक गुरु नावाचा ड्राइव्हर पाठवला होता. ज्याने अर्ध्या तासात अक्ख्या काठमांडूची देता येईल तितकी माहिती देऊन टाकली. अशा प्रकारे  हॉटेल वर पोहचे पर्यंत त्याच्याशी चांगलीच ओळख झाली.


              माझ्या EBC ट्रेकमध्ये सोबतीला अजून २० जण होते जे चेन्नई, रायपूर- छत्तीसगढ, दिल्ली, कोलकत्ता, अमेरिका, लंडन, गुजरात, दुबई, बंगलोर ह्या ठिकाणावरून आले होते, आणि मी एकटी महाराष्ट्रातून होती, आणि ते पण एक दिवस लेट झाली होती. आमचा सर्वांचा एक व्हाट्सअप ग्रुप होता त्यामुळे मला हि जे माझ्यापुढे जाऊन पोहचले त्यांचे लोकेशन आणि त्यांचे काय चालले याची सर्व माहिती मिळत होती. कारण ही  सर्व मंडळी काठमांडू वरून रामेछापला एक दिवस आधी म्हणजे १ मार्चला जाऊन पोहचले होते.
               मी एकटी मागे असल्यामुळे टूर गाईड निमा ह्यांनी मला हॉटेल मॅनेजरशी बोलून गाडी अरेंज करायला सांगितली. पण मला हॉटेलच्या लोकांन कडून सहकार्य नाही मिळाले. काही करून रात्री १. ३० वाजता हॉटेल पासून २० मिनिट दूर असणाऱ्या, रामेछापला जाणाऱ्या बस स्टँड पर्यंत पोचायचे होते, काही दुसरा पर्याय पण नव्हता कारण सोबतही कुणी नव्हते, काय करावे अशा विचारात असतानाच मला सकाळी घ्याला आलेल्या गुरु ड्रॉयव्हरची आठवण झाली.
             त्याला फोन केला आणि रात्री १ वाजता मला बस स्टँड वर सोडून देण्यासाठी प्रार्थना केली. तो लगेच तयार झाला. आणि ठरलेल्या वेळेत येऊन त्याने मला तिथे आणून सोडले, आणि रात्री माझा २:०० ला बस प्रवास सुरु झाला. सकाळी ५. ४५ ला बस रामेछाप एअरपोर्टला येऊन पोहचली. आणि जो ग्रुप मला नामचे - बाजार ह्या गावी २ दिवसांनी भेटणार होते. ते मला समोर दिसले, खराब वातावरणामुळे आदल्या दिवसाचे सर्व फ्लाईट कॅन्सल झाली होती, त्यामुळे त्यांचे खराब नशीब आणि माझे चांगले नशीब आम्ही लवकरच एकत्र आलो, पण त्यात हि एक विघ्न आले, माझे फ्लाईट तिकीट आदल्या दिवशी संध्याकाळी मिळवले होते, म्हणून ते मला बाजूला सारून ज्यांची फ्लाईट कॅन्सल झाली त्यांना आधी पाठवत होते, पण मी पण मूळची धीट ज्या ठिकाणी बोर्डिंग पास बनवून मिळत होता त्याठिकाणी जाऊन काउंटरवर दीड तास उभी राहिली. माझा ग्रुप पुन्हा पुढे गेला. आता पुन्हा मी मागे राहून गेली. खूप वेळ होऊन ही काउंटरवर असलेले दोन्ही - तिन्ही लोकं आपापली काम करण्यात व्यस्त होती, अधून मधून मी त्यांना माझ्या बोर्डिंग पासचा विसर पडू नये म्हणून आठवण करून देत होती, आणि ते पण ऐकून न ऐकल्या सारखे करत होते. शेवटी दीड दोन तासाने त्यातील एकाला माझी दया आली (कदाचित संपवा हिची एकदाची कटकट ह्या विचाराने..... ) आणि एका 'समिट फ्लाईट' मध्ये त्याने एक सीट मला ऍडजेस्ट करून दिले. आणि माझा जीव भांड्यात पडला. कशी बशी मी ती २० किलोची मोठी बॅग उचलून आतमध्ये चेकिंगला आत मध्ये गेली. आत मध्ये गेल्यावर परत माझा अर्धा ग्रुप मला दिसला आणि मग त्या ग्रुपच्या फ्लाईट नंतर लगेच माझी समिट - फ्लाईट निघाली. रामेचाप ते लुकला अशी फक्त ४० मिनिटाची ही  फ्लाईट एक विलक्षण अनुभव देणारी होती. रामेछाप वरुन लुकला तेनझिंग-हिलरी एअरपोर्टच्या दिशेने माझे फ्लाईट निघाले. लुकला विमानतळ हे जगातील सर्वात धोकादायक विमानतळांपैकी एक आहे, ज्यामध्ये एका भव्य मोठ्या खडकावर फक्त एकच धावपट्टी आहे. जी ११.७% ग्रेडियंटसह ५२७ मीटर (१७२९ फूट) × ३० मीटर (९८ फूट) आहे. विमानतळाची उंची ९,३३४ फूट (२,८४५ मीटर) आहे. असे हो नाही करता - करता आम्ही सर्व लुकला एअरपोर्टला येऊन पोहचलो. इथून मग आमचा मोंजो- नामचे बाजार - डेबोचे- डींगबोचे - लोबूचे - गोरकक्षेप - आणि तिथून एव्हरेस्ट बेस कॅम्प असा प्रवास अखेर सुरु झाला.

एव्हरेस्ट बेस कॅम्प च्या दिशेने आगेकूच
            अशा प्रकारे एव्हरेस्ट च्या दिशेने आमच्या १३० किमी. च्या प्रवासाला सुरुवात झाली. लुक्लाची उंची २८६० मी. आहे आणि मोंजोची उंची २८४५ मी. आहे. दिवसाच्या अखेरीस आम्ही नकारात्मक उंचीवर होतो!  मोंजो कडे जातांना आम्हाला जे लोक परत येत होते त्यांचे लाल चेहरे आणि फोड आलेले, फाटलेले ओठ आणि कमी - अधिक प्रमाणात सनक्रीम चेहऱ्याला लावलेले लोकं दिसत होती. आम्ही त्यांना अतिशय निरखून बघत होतो, आणि पुढील प्रवास कसा असेल याचा अंदाज आम्हाला येत होता.
          सर्वांसाठी हा प्रवास, जागा, ज्या वाटेवरून आम्ही निघालो ती वाट नवीन होती, आम्ही सर्व आजूबाजूला जितक्या गोष्टी डोळ्यात साठवून घेता येतील तितक्या साठवत चाललो होतो.  ह्या प्रवासापासून एक गाडी किंवा सायकल सुद्धा दिसत नाही. तेथे दिसतात ती फक्त गाढवे, घोडे, याक आणि वनगाय ज्या अगदी शिस्तबद्ध पद्धतीने एका लाईन मध्ये चालत असतात जे आम्‍हाला टेकडीवर राहण्‍याचा आणि मार्गामध्ये न येण्याचा इशारा देत होते. त्याच बरोबर अतिशय सुंदर अशी टी- हाऊस घरे दिसत होती (जिथे प्रवासी मुक्कामास /आरामास थांबतात अशी जागा).आम्हा सर्वांच्या सामानाचा भार "पोर्टर" वाहून नेत असता काही वेळात त्यांची ओरड देखील परिचित होते कारण आम्ही त्यांच्या मार्गापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो कारण ते १०० किलोपर्यंत भार डोक्यावर घेऊन टेकड्यां-वर ओढतात. आम्ही फक्त दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करतो आणि एक पाय दुसऱ्या पाया समोर ठेवतो आणि चालत राहत होतो. तरी आमची श्वास घेण्याची गती अनेक वेळा कमी - अधिक होत होती. उंच पर्वतच्या ओबडधोबड असलेल्या वाटेवरून चालतांना एक- एक पाऊल सुद्धा जपून ठेवावे लागते. आजूबाजूला विलोभनीय मोहित करणारे दृश्ये बघतांना सुद्धा एका जागेवर स्तब्ध उभे राहून मगच बघावे लागत होते, नाहीतर तोल जाण्याची भीती असते.
          जस जसा प्रवास पुढे सरकत होता आम्ही नियमितपणे अनेक बौद्ध स्मारके पास करू लागलो. प्रार्थना चाके आणि स्तूप आम्हाला मिळत होते, लोकं त्याची चाके घड्याळाच्या दिशेने वळवत होते, आपल्यापैकी जे कुणी  दुखावले आहे आणि ज्यांना नशिबाची गरज आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी असे केले जाते अशी प्रथा आहे.

नेपाळ सस्पेंशन ब्रिज
         मोंजोच्या वाटेवर आम्हाला आमचा पहिला झुलता पूल लागला, काहींच्या तुलनेत अगदी शांत, आम्ही असे अनेक पूल पुढे डोंगरात गाठणार होतोच, पण त्या पहिल्या ब्रिजची मजाच वेगळी वाटली आम्हाला तो पार करतांनाचा पहिला अनुभव मजेदार होता. आमच्यातले बरेच त्या वरून पळत सुटले, सस्पेंशन ब्रिज असल्याने पळणाऱ्या लोकांन मुळे त्यावरून जाणाऱ्या सर्वांना त्याचे धक्के बसले,  एक गोष्ट मात्र कटाक्षाने पाळावी लागणार होती. ब्रिज पार करण्यासाठी एकाग्रतेची गरज होती, जसे कि तो सुरु होण्या आधी हातातील मोबाईल बॅगेत टाकून द्यावा किंवा तो नीट सांभाळून पकडावा. ब्रीज पार करतांना दुसऱ्याबाजूने याक, घोडा सामान घेऊन तर नाही येत आहे ना हे तपासून घ्यावे, चालतांना हातातून किंवा बॅगेतून चुकून काही पडणार नाही, हातातील काठी ब्रीजवर असणाऱ्या लहान लहान फटी आणि लहान मोठ्या जागांमध्ये अडकणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा अपघात होऊ शकतो. कारण ब्रीजची रचना अशी असते कि, एका टोकापासून पायाखालची धातूची जाळी, बाजूने गुंडाळलेल्या पोलादी तारा अशी पुलाची  वास्तुकला समजायला थोडा वेळ लागतो. पूल पास करणे तसे अवघड होते. एका टोकावरून जाताना सहज वाटणारा हा पूल दुसऱ्या टोकावर जाई पर्यंत खूप दमछाक करत होता.
          झुलत्या पुलाच्या दोन्ही बाजूला लाल, हिरवा, पिवळा, पांढरा, निळा अशा पाच रंगाची कापडी पताका दोरी झुल्याला लावून  प्रार्थना पताका लावलेला दिसून येतो. ते पाच नैसर्गिक तत्व अग्नी, पृथ्वी, वायू, जल, आकाश याचे प्रतीक म्हणून तेथे येणारे जाणारे किंवा स्थानिक लोकं तिथे लावतात हे दिसून आले.
          चढावर आम्ही ब्रेक घेत, प्रोटीन बार किंवा चॉकलेट्स खात होतो. अधून मधून थोडे पाणी पित होतो. दिवस ढवळू लागतो आणि सूर्य मावळतो तेव्हा अधिक झुलता पूल आणि प्रार्थना ध्वज वाढत्या हवेत फडफडतात. तेथे केवळ भव्य पर्वत शिखरे नाहीत तर वसंत ऋतूची दृश्यमान चिन्हे देखील दिसत होती, जसजसे आपण वर जाऊ तसतसे बहर वाढत जातो. दिवसाकाठी साधारण ८ तास चालून संध्याकाळी टी - हाऊसला अंधार पडण्याच्या आत पोहचणे हा क्रम साधारण ६ दिवस चालू होता.
टी - हाऊस
          कॅम्पसाइट लॉज आणि जेवणाचे खोलीप्रत्येक कॅम्पसाईटवर एक लॉज किंवा डायनिंग रूम आहे जेथे आम्ही थांबत होतो. जेथे याक शेणाच्या स्टोव्हद्वारे नैसर्गिक हिटर प्रवाशांसाठी व तिथे विसाव्यास थांबणाऱ्यासाठी पेटता ठेवला असतो. एक १० X  १० ची खोली ५-इंच फोम गद्दा असलेले बेड आणि प्रत्येकावर एक मऊ उशी आहेत. त्यावर साधारण एक ४" जाडीची दुलई होती जी आश्चर्यकारकपणे आरामदायक, हलकी आणि  बऱ्यापैकी उबदार होते.  बेडच्या शेवटी सामान ठेवण्यासाठी जागा देखील होती. अशी व्यवस्था प्रत्येक टी - हाऊस रूम मध्ये असते.
          लुकला वरून निघतांना अंगावर असणार कपड्याच्या आच्छादन जसं जसं पुढे सरकत होतो तस तसं ते जड वाटत होते कारण अंगावर घामाच्या धारा लागल्या होत्या. साहजिकच चढावर शरीर आपोआप गरम होत होते. पण थोडे का विसाव्याला थांबलो कि लगेच थंडी वाजायला लागे. मग पुन्हा जॅकेट अंगावर चढवणे आणि पुन्हा: उतरवणे असा प्रकार साधारण नामाचे बाजार येई पर्यंत चालू होता. नंतर मात्र असे काही झाले नाही कारण जस जसे आम्ही उंची गाठत होतो तस तसा आम्हाला गारवा गारठवत होता. नामचे बाजारला आमचा खरा दोन दिवसाचा मुक्काम असायला हवा होता. पण एक दिवस उशीरा ट्रेक सुरु झाल्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच तेंगबोचेला जायला निघालो. गाव सोडतांना खूप मोठा चढ चढून जावा लागला , पण साधारण २ किलोमीटर अंतर पार केल्यावर हिमालयाच्या दृश्यांसह तुलनेने सोप्या आणि गुळगुळीत पायवाटेचा आनंद घेत आम्ही पुढे निघालो. हिमालयन ताहर आणि हिमालयीन मोनाल्स यांसारखे स्थानिक वन्यजीव बघायला मिळाले. तेंगबोचे, चहाची दुकाने आणि सैन्याच्या चौक्या असलेली हि छोटी वस्ती. खुंबू प्रदेशातील सर्वात मोठा बौद्ध मठ म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध टेंगबोचे मठ पाहण्याचा योग या प्रवासात आला.
         जसं जस वर चढत होतो तसा तसा गारठा आणि त्याबरोबर महागाई दर पण वाढत होता. प्रत्येक गोष्टी साठी ५०० च्या पुढे पैसे मोजावे लागत होते. जवळ असलेले पैसे अपुरे पडत होते. डिंगबोचे (खुमबा पास) गावामध्ये प्रवेश करताच एक कुमारी बँकेचे ATM दिसले, विचारणा केली असता अजून सुरु नाही आहे, उद्यापाससून सुरु होईल असे सांगण्यात आले. हे ऐकून अजूनच आनंद झळकरण त्या गावात आमचा दोन दिवस मुक्काम असणार होता. दुसऱ्या दिवशी साधारण ३ वाजता आम्ही त्या ATM मशीन जवळ जाऊन पोहचलो. काम चालूच होते साधारण १ तास वाट बघितल्या नंतर त्यांनी आम्हाला परवानगी दिली. नंतर त्यांनी आम्हाला सांगितले हे ATM  जगातील दुसऱ्या सर्वोच्च म्हणजेच समुद्र सपाटी पासून ४४१० मीटर उंचीवरील गावात बसवण्यात आलेले ATM मशीन आहे आणि मी त्याची पहिली ग्राहक आहे आणि त्यांनी माझ्या हस्ते त्याठिकाणी ATM  मशीन चे उदघाट्न केले मी पहिली, त्यानंतर एक युरोपियन व नंतर तिसऱ्या क्रमांका वर एक जर्मन असे आम्हा तिघांचा फोटो पण घेण्यात आला.   
           ज्या दिवसांसाठी हा सर्व अवघड प्रवास आम्ही करत होतो. तो दिवस अखेर उगवला ९ एप्रिल रोजी आम्ही सकाळी ६. ३० ला लोबूचे वरून आम्ही गोरक्षेप च्या दिशेने निघालो. अंतर होते फक्त ३ किमी. परंतु - १० डिग्री सेल्सियस मध्ये आम्हाला जोरदार वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा मारा सहन करत मार्गक्रम करावा लागत होतो. गोरक्षेपला थांबलेल्या हॉटेल मध्ये सामान ठेऊन लागणाऱ्या गोष्टी सोबत घेऊन आम्ही पुन्हा ३ तासच्या  पुन्हा त्याच ५०% ऑक्सिजन असणाऱ्या वातावरणाचा सामना करत पुढे निघालो. आणि अनेक त्रासातून मार्ग काढत त्या खडकाळ रस्त्याने आम्ही EBC च्या त्या खडका पर्यंत जाऊन पोहचलो. आणि आम्हा सर्वांच्या डोळ्यातून आनंद अश्रू दिसू लागले (वाहू लागले असे बोलणे येथे चुकीचे ठरेल कारण अश्रुंचे देखील तेथे घन स्वरूप होते होते, कारण त्याचा लगेच बर्फ होत होता)
         परतीच्या प्रवासाला आम्हाला फक्त ३ दिवस लागले. एका दिवसाला २१ किमी. असा प्रवास आम्ही केला आणि १२ एप्रिलला तारखेलला धावत पळत लुकला एअरपोर्टला येऊन पोहचलो. दुसऱ्या दिवशी फ्लाईटने काठमांडूला जाऊन पोहचलो आणि १३ एप्रिलला  नेपाळचे २०८० न्यू ईअर साजरे करून आम्ही मायदेशी परतलो. अशी हि माझी एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक केवळ दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर मी पूर्ण केली. मनापासून इच्छा असेल तर जगात अवघड असे काही नाही.
         अशी हि अविस्मरणीय सफर घडवून येण्यास मेट, भुजबळ नॉलेज सिटी संस्थेच्या संचालिका डॉ. शेफाली भुजबळ मॅडम, माझ्या ऑफिस मधील सहकारी, तसेच मित्र परिवार, संपूर्ण कुटुंबीय यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

            जयश्री काकड,
              नासिक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !