गणेशाची विविध रुपे आणि प्रतिमा ! वारली चित्रशैलीचे विद्रुपीकरण नको-प्रसिद्ध वारली चित्रकार संजय देवधर. न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801. वारली चित्रकलेचा लेख सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!



गणेशाची विविध रुपे आणि प्रतिमा !
    गणपती म्हणजे बुद्धीची देवता. गणेशाचे रूप अत्यंत सृजनात्मक आहे. कलाकारांना अनेक रुपात गणराया दिसतो. साध्यासोप्या आकारातून गणेशप्रतिमा आकाराला येते. गजवदन, लंबोदर, एकदंत, शूर्पकर्ण अशा त्याच्या विविध नावातूनच त्याच्या रूपाचे वर्णन दिसते. मूर्तिकार व चित्रकारांनी वेगवेगळ्या आकारात गणेशप्रतिमा साकारल्याचे आढळते.आदिवासी वारली कलाकार भौमितिक मुलाकार वापरुन त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैलीत गणेशाची प्रतिमा साकारतात.               आदिवासी वारली जमातीत मूळातच मूर्तिपूजा नव्हती. नंतरच्या काळात 
आदिशक्तीची, पंचतत्वांंची प्रतिकात्मक पूजा केली जाऊ लागली. वारली जमात कलेतच देवत्व शोधते आणि निसर्गालाच परमेश्वर मानते. त्यांचे देवदेवता दगडावर किंवा मोठ्या लाकडी फळीवर कोरलेले असतात. बऱ्याच ठिकाणी घरातील देव तांदळाच्या टोपलीतही ठेवले जातात. अलीकडे शहरी संस्कृतीशी येणाऱ्या संपर्कातून काही वारली पाड्यांवर गणेशोत्सव साजरा केला जातो. त्रिकोण,चौकोन, वर्तुळ या भौमितिक मुलाकारांचा वापर करुन गणपतीची प्रतिमा साकारण्यात येते. मूळात वारली चित्रकलेचा जन्मच परमेश्वराच्या उपासनेतून झाला आहे. ईश्वरी श्रद्धेचा तो कलात्मक मार्ग आहे. आज आपण यानिमित्ताने वारली 
जमातीतील  विविध दैवतांचीही ओळख करुन घेऊया ! गणेशचतुर्थीला गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संकटाचे सावट विघ्नहर्त्याच्या उत्सवावर आहे. बाप्पाच्या आगमनाने या संकटातून सर्वांची सुटका व्हावी हीच प्रार्थना प्रत्येकजण करीत असेल. कोरोनाच्या विळख्यातून आदिवासी मात्र बचावलेले दिसतात.त्यांची साधीसोपी, निसर्गपूरक जीवनशैली त्यासाठी कारणीभूत आहे. पर्यावरणाचे पूर्ण रक्षण, संवर्धन करून ते शांत, समृद्ध जीवन जगतात.
     आदिवासी जमाती म्हणजे मागास, अडाणी, अशिक्षित असे आपण तथाकथित पुढारलेले शहरी लोक समजतो. पण सर्वत्र कोरोनाचा फैलाव झालेला असताना दुर्गम पाड्यांवर राहणारे आदिवासी सुरक्षित जीवन जगत आहेत. कारण मूळातच ते निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छ हवेत राहतात. सोशल डिस्टन्सिंगचा उच्चारही न करताही ते आपोआपच पाळले जाते. वेगळं क्वारंटाईन होण्याची गरजच नाही कारण दाटीवाटीने न राहता शेतांजवळ अंतर राखून झोपड्या बांधलेल्या असतात.अत्यंत कमीतकमी गरजा असणारी त्यांची आदर्श जीवनशैली आहे. त्यामुळे झोपडीत मोजक्याच आवश्यक वस्तू असतात. जमीन व भिंती वारंवार सारवून घर लख्ख ठेवले जाते. मोजका आहार, सत्वयुक्त नागलीचा वापर, भरपूर अंगमेहनत व शारीरिक श्रम यांनी त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही चांगली असते. काटक, सडपातळ अंगयष्टी असणारी वारली जमात समाधानाने मुक्तपणे जगते. त्यांचा आनंद ते चित्रकला, नृत्य, संगीत यांच्या माध्यमातून व्यक्त करतात.वारली जमातीत वेगवेगळी दैवते पुजली जातात. वारलं म्हणजे जमिनीचा छोटासा तुकडा. त्यावर उदरनिर्वाह करणारे म्हणून या जमातीला वारली हे नाव मिळाल्याचे संशोधनातून उलगडले आहे. शेत पिकवणारा पाऊस हाच त्यांच्यामते सर्वश्रेष्ठ देव असतो. त्यांच्या बोलीभाषेत ते पावशा परमेसर असा  त्याचा आदराने उल्लेख करतात. त्यांची दैवते ही निसर्गाच्या वेगवेगळ्या अभिव्यक्तीची प्रतिके आहेत. माणसाला श्रद्धेसाठी,मूर्तीपूूजेसाठी समोर  प्रतिमा, प्रतिके लागतात. त्यांची निर्मिती माणसानेच त्याच्या कल्पकतेतून केली आहे.            धान्य उगवणारी धरतरी ( जमीन),शेतासाठी ऊर्जा देणारी गायतरी (गायत्री) आणि धान्य पिकवून जीव जगवणारी कणसरी या वारली जमातीच्या तीन प्रमुख, पवित्र देवता आहेत. याशिवाय स्त्रीला नारीदेवतेचा मान दिला जातो. या चौघींमध्ये खरी शक्ती असल्याची त्यांची श्रद्धा आहे. पंचमहाभूतांचे प्रतिक असणारा पंचशिऱ्या देव, प्रजोत्पत्तीची देवता पालघट देवी यांना वारली जमातीत आदराचे स्थान दिले जाते. सूर्य आणि चंद्र हे परमेश्वराचे दोन डोळे आहेत अशी वारल्यांची कल्पना आहे. ते दिवसा व रात्री प्रकाश देतात म्हणून ते पूजनीय आहेत. सूर्यदेव, चांद किंवा चंद्रदेव, ढगेसर, विजेसर, पावशा देव असा आदराने ते उल्लेख करतात. कोणत्याही महत्वाच्या कार्यारंभी श्रद्धापूर्वक देवतापूजन केले जाते. शेतात पेरणीपूर्वी नृत्य करून जमिनीची पूजा करतात. धान्य तयार झाल्यावर नृत्य व गाण्यातून देवतांचे आभार मानून आनंद साजरा केला जातो.बेल, उंबर, पिंपळ व इतर काही वृक्ष पवित्र मानले जातात.त्यांचे लाकूड सरपण म्हणून जाळत नाहीत. लग्नाच्या विधींपूर्वी उंबराची फांदी वाजतगाजत आणून झोपडीजवळ खोचतात. त्यानंतरच लग्नसोहळा सुरु होतो.वारल्यांंच्या खास देवतांमध्ये वाघ्या या गावदेवाचा उल्लेख केलाच पाहिजे. प्रत्येक पाड्याच्या सीमेवर सुमारे तीन फूट उंचीच्या लाकडी फळीवर किंवा दगडावर वाघ्या देवाची प्रतिमा कोरलेली असते. ही प्रतिमा पिवळ्या रंगाने रंगविली जाते किंवा तिला शेंदूर लावतात. अश्विन वद्य द्वादशीला वसुबारस असते त्यादिवशी वारली जमातीत वाघबारस साजरी करुन वाघ्यादेवाची पूजा केली जाते. नारनदेव, हिरवा, हिमाई याही प्रमुख देवता आहेत.
    हिरवा हा कुलदैवत तर हिमाई ही त्याच्या बरोबर पुजली जाणारी जाणारी देवता आहे. नारनदेव ही पर्जन्यदेवता असून एखाद्या सुपारी किंवा छोट्या दगडाला शेंदूर लावून त्यालाच नारनदेव समजतात. प्रत्येक घराण्यात नारनदेवाची एकच प्रतिमा असते व ती टोपलीत तांदूळ घालून त्यात ठेवली जाते. समृद्धी देणाऱ्या हिरवा देवाच्या सात पत्नी अर्थात सप्तमातृका आहेत अशी वारल्यांची श्रद्धा आहे. मोरपिसांच्या पिशवीत हिरवा देव ठेवतात. त्यासोबत मोरपिसांचा कुंचाही असतो.हिमाई देवतेची हिरवा देवाबरोबरच पूजा करण्याची प्रथा असते.वारली जमातीत भगत हाच त्यांचा फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड असतो. तोच देवांना आवाहन करून रितिरिवाजानुसार पूजाविधी करतो.हिरवा व नारनदेव एकाच घरात ठेवत नाहीत. दर पाच वर्षांनी हिरव्याची पूजा करून कुटुंबातील दुसऱ्या घरी नेतात. माघ महिन्यात नारनदेवाची विशेष पूजा केली जाते. बांबूच्या कोंबातून त्याचा जन्म झाल्याचे मानले जाते. त्यामुळे आदिवासींसाठी बांबू देखिल पवित्र आहे.डहाणू - गंजाडजवळ महालक्ष्मीगड आहे. वारली जमात या देवीला पूज्य मानते. दरवर्षी चैत्री पौर्णिमेला महालक्ष्मीची यात्रा भरते. यावेळी हजारो वारली दूरवरून चालत येतात व मनोभावे पूजा करतात. रात्रभर गाणी, नृत्ये सुरु असतात. अनेक वारली चित्रातून, देवदेवतांचे,
महालक्ष्मीगडाचे रेखाटन केलेले दिसते.
 वारली चित्रशैलीचे विकृतीकरण नको !
     आदिवासी वारली चित्रे सजावटीसाठी सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रेखाटली जातात. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई विद्यापीठाचे प्रवेशद्वार, ओझर विमानतळ याखेरीज अनेक हॉटेल्स, उद्याने येथे वारली चित्रे रंगविलेली पहायला मिळतात. मध्यंतरी डहाणू रेल्वे स्थानकावर रिलायन्स इन्फ्रा आणि रोशनी फाउंडेशन संस्थेने वारली चित्रे रेखाटली होती. मात्र त्या चित्रांमध्ये अनेक चुका होत्या. देवदेवतांंच्या प्रतिमांची विटंबना झाली असल्याचे सांगत आयुष युवा संघटनेने त्यासंदर्भात आक्षेप नोंदवला. अध्यक्ष सचिन सातवी व सहकाऱ्यांनी संबंधित संस्थेची भेट घेऊन वारली चित्रांमध्ये योग्य बदल व सुधारणा करण्यास सांगितले. तेथे अनेक चित्रे वर्दळीच्या ठिकाणी असल्याने ती खराब होत होती त्याबाबतीत विरोध करण्यात आला. नंतर चित्रांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले.
नेदरलँडच्या एका कंपनीनेही काही वर्षांपूर्वी उचलेगिरी केली होती. वारली चित्राचा वापर लोगो डिझाइनमध्ये केला होता. 
त्याविरुद्धही  आयुषने कारवाईची मोहीम राबविण्यात आली व त्यात यश मिळवले.बऱ्याच ठिकाणी वारली कला नीट समजून न घेताच चित्रे काढल्याचे निदर्शनास येते. त्यात नाविन्याच्या नावाखाली वाट्टेल तसे बदल केले जातात. त्यातून ११०० वर्षांची परंपरा असलेल्या वारली कलेतील पावित्र्य नष्ट होते. अशा प्रवृत्तीचा नक्कीच विरोध केला पाहिजे !
                                           संजय देवधर
                               Sanjay deodhar, nashik



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !