मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून कर्मचाऱ्यांची झाडाझडती, अधिकाऱ्यांचे आढावा बैठक संदर्भात प्रशिक्षण, पाणी शुद्धिकरण प्रकल्पाची पाहणी,

नाशिक  – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी आज कळवण तालुक्यातील विविध कामांचा आढावा घेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. विशेष म्हणजे डॉ गिते यांनी प्रत्येकाचा वैयक्तिक व दिवसभर उभा राहून आढावा घेतला. बदली होऊनही अद्यात दप्तर न देणाऱ्या दोन तात्कालिक ग्रामसेवकांवर फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी गट विकास अधिकाऱ्यांना दिले. विविध विकासकामांचे अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी कालावधी ठरवून देत त्यानंतर माझ्या दालनात सविस्तर आढावा घेणार असल्याचा इशाराही दिला. एकूणच डॉ गिते यांच्या कडक आढाव्यामुळे ग्रामीण भागातील अपूर्ण असलेल्या  विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.
कालवण तालुक्याची आढावा बैठक आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांच्या उपस्थितीत येथील हरी ओम लान्स मध्ये घेण्यात आली.  महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी आहार संहितेबाबत माहिती देताना ग्रामसेवकांनी ग्राम विकास आराखड्यातील १० टक्के रक्कम अंगणवाडीच्या खात्यात वर्ग करण्याचे निर्देशही दिले. सुरवातीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुशील वाघचौरे यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला. पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रतिभा संगमनेरे यांनी दुषित पाणी नमुने, टीसीएल तपासणी याबाबत आढावा घेतला.
यानंतर डॉ गिते यांनी ग्राम बाल विकास केंद्र अंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणाबाबत माहिती घेतली. यामध्ये सर्वेक्षणातील माहितीनुसार तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित बालकांबाबतची माहिती वस्तुस्थितीनुसार नसल्याचे सांगत पुन्हा सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. सर्वेक्षणातून खरे आकडे समोर येणे गरजेचे असून बालकाला कुपोषणातून बाहेर काढणे गरजेचे आहे. मी नेहमी खरे बोलणाऱ्याच्या व खरी माहिती देणाऱ्याच्या पाठीशी आहे. मात्र खोटी माहिती देऊन दिशाभूल करणाऱ्यांना कारवाईस सामोरे जावे लागणार असल्याचे गिते यांनी सांगितले. पाणी गुणवत्ता कार्यक्रमाबाबत डॉ गिते यांनी पाणी तपासणी करणे, टीसीएल तपासणी करणे ही आरोग्य कर्मचारी व ग्रामसेवक या दोघांची जबाबदारी असून दुषित पाण्याबाबत दोघांवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. कोसवन व सप्तश्रुंगगड येथील तत्कालीन ग्रामसेवकांनी अद्याप नवीन ग्रामसेवकास दप्तर उपलब्ध करून दिले नसल्याचे यावेळी उघडकीस आले यावरून तत्कालीन ग्रामसेवकांवर तत्काळ फौजदारी कार्यवाही करण्याच्या व ग्रामपंचायत विस्तार अधिकाऱ्याला नोटीस बजावण्याचे निर्देश डॉ गिते यांनी दिले. धार्डेदिगर ग्रामपंचायतिच्या ग्रामसेवकाबाबत अनेक तक्रारी असून या ग्रामपंचायतिची मी स्वत तपासणी करणार असल्याचे डॉ गिते यांनी सांगितले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी घरकुल योजनेचा आढावा घेतला. सिंचन विहिर, विहीर पुनर्भरण, पाणी पुरवठा योजना, ग्राप मधील जन सुविधेचे कामे, घरकुल इ योजनाची अपूर्ण बांधकामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश यावेळी डॉ गिते यांनी सर्व संबंधिताना दिले. आढावा बैठकीसाठी तालूक्याती अनेक ग्रामपंचायतीमधून लाभार्थी उपस्थित होते. डॉ गिते यांनी त्यांचा वैयक्तिक आढावा घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
आढावा बैठकीस जिल्हा व तालुका स्तरावरील खातेप्रमुख, तालुका व ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तांत्रिक सेवा सल्लागारांचाही घेतला आढावा
कळवण येथील आढावा बैठकित डॉ गिते यांनी अपूर्ण पाणी पुरवठा योजनेबाबत तांत्रिक सेवा सल्लागारांचा (TSP) आढावा घेऊन तत्काळ पाणी पुरवठा योजनेतील त्रुटी दूर करून योजना कार्यान्वित करण्याचे आदेश दिले. तसेच ग्राम समितीमार्फत पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत असल्यास याबाबतचे लेखे घेऊन योजना सुरु करण्याच्या सूचना ग्रामसेवकांना दिल्या.
जिल्ह्यात राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत विविध पाणीपुरवठा योजना घेण्यात आलेल्या आहेत मात्र विविध किरकोळ बाबींमुळे योजना पूर्ण होण्यास व हस्तांतरित करण्यास विलंब होत आहे. यामुळे डॉ गिते यांनी आता थेट तांत्रिक सेवा सल्लागारांचा (TSP) आढावा घेण्यास सुरवात केली आहे.

जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना आढावा बैठकीचे प्रशिक्षण

कळवण येथील आढावा बैठकीसाठी डॉ गिते यांनी चांदवड, नाशिक, देवळा, बागलाण, सिन्नर व त्रंबक येथील गट विकास अधिकारी, उप अभियंता, बाल विकास प्रकल्प अधिकारी अदिना मुद्दाम बोलावून घेतले होते. आढावा कसा घ्यावा याबाबत प्रात्यक्षिक देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावण्यात आल्याचे व यानुसारच आढावा घेण्याचे निर्देश डॉ गिते यांनी संबंधिताना दिले. बागलाण तालुक्यातील ग्रामसेवकांना देखील जलयुक्त शिवार योजनेच्या आढाव्यासाठी आमंत्रित  करण्यात आले होते डॉ. गिते तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी त्यांचा आढावा घेऊन सूचना दिल्या.

कसबेवणी पाणी शुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी

डॉ नरेश गिते यांनी मागील महिन्यात कसबेवणी येथील पाणी शुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी केली होती मात्र त्यावेळी मोटार बंद असल्याचे व विविध त्रांत्रिक अडचणी असल्याचे दिसून आले होते. तसेच अस्वछातही आढळून आली होती. मात्र आज डॉ गिते यांनी भेट दिली असता सदर प्रकल्पमधील अडचणी दूर करण्यात आले असल्याचे दिसून आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे ! कुलसंमेलनात उमटला सार्थ अभिमान !!