जायभावे कुटुंबाची लक्ष्मी तथा लक्ष्मीआई काळाच्या पडद्याआड !! लक्ष्मीआई , जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक जी. पी. खैरनार यांच्या लेखणीतून उतरलेली एक भावपूर्ण श्रद्धांजली !!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

जायभावे कुटुंबाची "लक्ष्मी" तथा "लक्ष्मीआई" पडद्या आड !
         नाशिक::- शहरातील मोरवाडी येथील रहिवासी असलेले स्व. सुखदेव भावराव जायभावे यांच्या पत्नी गं. भा. लक्ष्मीबाई सुखदेव जायभावे यांचे मंगळवार दिनांक २०ऑगष्ट, २०१९ रोजी रात्री १०.४५ वाजता दुःखद निधन झाले. नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा कर्मवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था , नाशिकचे सहचिटनीस अॅड. श्री. तानाजी जायभावे तसेच नाशिक महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदाम नागरे यांच्या गं. भा. लक्ष्मीबाई सुखदेव जायभावे या मातोश्री होत !
लक्ष्मीआई यांना सात मुले व एक मुलगी असा परिवार होता. लक्ष्मीआई यांचे माहेर नाशिक जवळील पिंपळगाव बाहुला येथील गामने कुटुंबातील. पिंपळगाव येथील गामने कुटुंब तसे सांप्रदायिक पंथाचे. त्यामुळे आई लक्ष्मीआई यांच्या संपूर्ण आयुष्यात सांप्रदायिक पंथाच्या निस्सीम भक्तीच्या अभ्यासाचा प्रभाव त्यांच्या कौटुंबिक जीवनात अनुभवास मिळाला आहे. आई लक्ष्मीआई यांचा पेहराव हा एखाद्या ऐटबाज स्त्रीचा होता. सडपातळ शरीरयष्टी, गोरा रंग, लांब नाक, अजाण बाहु व बोली शब्दात आदरयुक्त दरारा याप्रमाणे लक्ष्मीआई यांचे वर्णन करता येईल. लक्ष्मीआई यांचे मृत्यूसमयी वय साधारण ८४ वर्ष होते.
लक्ष्मीआई यांचे माहेर तथा गामने कुटुंब हे कष्टकरी प्रतिष्टीत शेतकरी घराणे तर सासर नाशिक शहरालगत असलेले मोरवाडी गावातील जायभावे कुटुंब हेही शेतकरी, कुटुंब वत्सल असे प्रतिभावंत शेतकरी कुटुंब ! लक्ष्मीआई यांची उंच सडपातळ शरीरयष्टी, बोलण्यातील आदरयुक्त प्रेम, जिव्हाळा व आपल्या आठ अपत्यांचा सांभाळ करुन सचोटीने तथा प्रामाणिक कष्टाने प्रत्येकास दिलेली जीवन जगण्याची शिकवण यामुळे जायभावे कुटुंब हे नाशिक शहरातील प्रतिष्ठित घराणे म्हणुन नावारुपास आलेले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सद्य स्थितीत ग्रामीण व शहरी भागात एकत्रित मोठे कुटुंब सहसा प्रेम भावनेने एकत्र राहणे व आढळणे दुरापास्त झालेले आहे. परंतु आजही लोकसंख्येने झपाट्याने वाढणाऱ्या नाशिक शहरात विभक्त कुटुंब व शहरी राहणीमानात तरुण पिढी वावरत असतांना लक्ष्मीआई यांचे मुले अनुक्रमे संतु जायभावे, बाळु जायभावे, पुंडलिक जायभावे,  रामदास जायभावे, अॅड. तानाजी जायभावे, ज्ञानेश्वर जायभावे व समाधान जायभावे असे सात भाऊ, सात भावांच्या सात पत्नी, यासह त्यांचे मुले नातवंडे असे चाळीस ते पन्नास व्यक्तीचे कुटुंब आई लक्ष्मीआई यांचे छत्र छायेखाली शहरी जीवनाचा किंचितही गंध लागु न देता एकत्र कुटुंब पद्धतीत गुण्या गोविंदाने नांदत आहे. या कुटुंबाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व जायभावे कुटुंब हे निर्व्यसनी व शुद्ध शाकाहारी आहे. आई लक्ष्मीआई यांच्या संस्कारामुळे सात भाऊ व एक बहीण यांचे एकमेकांवर असलेले प्रेम, आस्था, जिव्हाळा व कुटुंबातील प्रत्येक घटकाबरोबर असलेली आत्मीयता ही आई लक्ष्मीआई यांची प्रेम भावना प्रत्येक जायभावे कुटुंबात पुरेपूर आहे याचा प्रत्यय येतो.
लक्ष्मीआई यांच्या सातही मुलांना प्रत्येकास आदराची दादा, नाना, आप्पा, भाऊ, माऊली व आण्णा ही आदराची टोपण नावे आजी लक्ष्मीआई यांनी ठेवलेली होती, नव्हे लक्ष्मीआई जन्मदाती असुनही आपल्या सातही मुलांना मुळ नावाने उच्चार न करता आदरयुक्त टोपण नावाने हाक मारत असत.
लक्ष्मीआई यांना सात मुलं यासोबत एक मुलगी श्रीमती इंदुबाई सुदाम नागरे या आहेत. आपल्या सातही भावांची लाडकी बहीण म्हणजे इंदुबाई !
लक्ष्मीआई यांच्या शिकवणीनुसार आदरणीय अॅड. तानाजी (आप्पा) जायभावे हे नाशिक महानगरपालिकेत पंधरा वर्षे नगरसेवक म्हणुन निवडुन येऊन नाशिक शहरातील जनतेची आदर्श लोकप्रतिनिधी म्हणुन सेवा केली. समाजाप्रती जायभावे कुटुंबाचे असलेले योगदान म्हणुन क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था, नाशिक या वंजारी समाजाच्या संस्थेत पारदर्शक व समाजहिताचे कामकाज केल्याचे प्रतीक म्हणुन दोन पंचवार्षिक निवडणुकीत तानाजी आप्पा जायभावे बहुमताने विजयी झाले आहेत.
जायभावे कुटुंब तसे मोरवाडी येथील मुळ रहिवासी परंतु हे कुटुंब सद्य स्थितीत जनकनगरी, खुंटवडनगर येथे वास्तव्यास आहे.
आज लक्ष्मीआई यांच्या जाण्याने जायभावे कुटुंब, त्यांचे आप्तेष्ट यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, परंतु याही पलीकडचे दुःख आजी लक्ष्मीआई यांचेवर प्रेम करणाऱ्या मोरवाडी ग्रामस्थांसह, जनकनगरी, सावतानागर व खुंटवडनगर वाशीयांना झाला आहे.
आई लक्ष्मीआई यांच्या शिकवणीची शिदोरी त्यांच्या सातही मुले, मुलगी, नातवंड यांना तर मिळालीच, परंतु आजी लक्ष्मीआई ज्या ज्या ठिकाणी वास्तव्यास गेली तेथील रहिवासी समाज घटकांना मिळाली , हे अभिमानाने नमूद करावे लागेल.
आई लक्ष्मी आई यांचे पती स्व. सुखदेव जायभावे यांचे नावातच "सुख- देव" होते तर आई लक्ष्मी आहे यांचे नावातच "लक्ष्मी" होती. त्यामुळे जायभावे कुटुंबात आजपर्यंत सुख व लक्ष्मी एकत्र नांदून एकत्र सुखी संसार जायभावे कुटुंब अनुभवत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे.
आई लक्ष्मीआई यांच्या अकाली जाण्याचे दुःख सुखदेव बाबा व लक्ष्मीबाई यांच्या कुटुंबातील लहान चिरंजीव समाधान जायभावे व त्यांच्या बहीण व भावांना झाले असणार व याची सल भविष्यात सर्व जायभावे कुटुंबास जास्त जाणवेल यात शंका नाही.
आजी लक्ष्मीआई यांना आई तुळजाभवानी सदगती देवो, ही प्रार्थना !
लेखन:- जी.पी.खैरनार, नाशिक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

स्त्री आत्मनिर्भर बनल्यास समाजाचा विकास होईल-पद्मश्री नीलिमा मिश्रा ! गटशिक्षण अधिकारी हेमंत बच्छाव व शिक्षण विस्तार अधिकारी शीतल कोठावदे यांना रोटरी वोकेशनल सर्विस अवार्ड प्रदान !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।