शब्दगंध च्या पाथर्डी शाखेतर्फे साहित्यिकांचा सन्मान सोहळा संपन्न !


शब्दगंध च्या पाथर्डी शाखेतर्फे  साहित्यिकांचा सन्मान सोहळा संपन्न !

      पाथर्डी (प्रतिनिधी)::- मराठी साहित्य हे आपल्या माय बोलीतील साहित्य असते, ते अनुभवाने समृद्ध बनलेलं असतं आणि त्याला प्रवाहित करण्यासाठी साहित्यिकांची गरज असते, मराठी आपली माय बोली तसेच  राजभाषा असल्यामुळे तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा असे प्रतिपादन बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी.ढाकणे यांनी केले.
   शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या पाथर्डी शाखेच्या वतीने श्री तिलोक जैन माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित साहित्यिकांच्या सन्मान सोहळ्यात अध्यक्ष पदावरून ते बोलत होते, मराठी साहित्यात भर घालणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला.
          याप्रसंगी शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी, मकरंद घोडके, पर्यवेक्षक विजयकुमार घोडके हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. यावेळी दिलीप सरसे यांचा 'दिंडी 'आणि 'कट्टा ' या कादंबरी बद्दल, श्रीमती विद्या भडके यांचा 'उठे तुफान काळजात' या काव्यसंग्रहाबाबत, प्रा.डॉ.सुभाष शेकडे यांचा 'भलरी' तसेच 'हाणला कोयता झालो मास्तर' या साहित्य कृतीबद्दल, डॉ.कैलास दौंड यांचा 'कापूसकाळ' आणि 'आगंतुकाची स्वगते' या साहित्य कृतीबद्दल सन्मान करण्यात आला. शंतनू राजळे, प्रा.रमेश मोरगावकर, डॉ.अशोक वैद्य, ज्योती आधाट-तुपे  यांचा  विशेष सन्मान करण्यात आला .                       'मराठी भाषेचा वापर अगदी प्राचीन काळापासून होत आला आहे. ती आपली मायबोली आहे. तिला समृद्ध करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न व्हायला हवेत' असे मत डॉ. कैलास दौंड यांनी मांडले.       
     "शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य ही एक चळवळ आहे, वाटा वेगवेगळ्या असल्या तरी आत्मियता टिकवून ठेवण्याचे सामर्थ्य या चळवळीत आहे, साहित्य हे आनंद शोधण्याचे माध्यम असल्याने साहित्याची निर्मिती होणे आवश्यक" असल्याचे मत शब्दगंध साहित्यिक परिषद चे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी आपल्या मनोगतून व्यक्त केले. व सन्मानार्थींचे अभिनंदन केले.                 
         'पाथर्डी ही संतांची भूमी आहे त्याचबरोबर ती साहित्यिकांची नगरी आहे, येथील साहित्य रुपी मातीला सुपीक आणि सुगंधित करण्याचे काम साहित्यिक करतात. तसेच माणसाला माणसाशी जोडण्याची ताकत साहित्यात असते." असे मत पाथर्डी शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिल पानखडे यांनी प्रास्ताविकात मांडले. याप्रसंगी 'मराठी माझी मायबोली ' या विषयावर कु. प्रज्ञा डमाळे हिने उत्कृष्ट निबंध लेखन केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यास भाऊसाहेब गोरे, निलेश गोरे, अजिंक्य कांकरिया, प्रा.संतराम साबळे, राजेंद्र उदारे, बंडूशेठ दानापूरे, राजेंद्र सावंत, हाजी हुमायून आतार, महेंद्र राजगुरू, विक्रम घुले, विजय शिंदे, संदीप भागवत, सनी मर्दाने, हरिभाऊ डमाळे, दीप उदागे, गौरव बांगर, सचिन जाधव, सौ.मीना खेत्रे - पानखडे आदी  मान्यवर उपस्थित होते. 
      सदरच्या कार्यक्रमात अध्यक्षीय  सुचनेस बंडू गाडेकर यांनी अनुमोदन दिले. उपस्थितांचे चंद्रकांत उदागे यांनी आभार मानले, महादेव कौसे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाहिर भारत गाडेकर, प्रा. डॉ. अशोक कानडे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।