माझी माय मराठी १) विजय सुर्यवंशी, जळगाव


माझी माय मराठी

              माझ्या मराठीची बोलू कौतुके
              परी अमृतातेही पैजा जिंके
              ऐसी अक्षरे रसिका मेळविन
                                         - संत ज्ञानेश्वर

          अमृताहुनी गोड असलेली आपली मराठी मायबोली ही आपल्या महाराष्ट्राची प्रमाण भाषा आहे. महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचा प्रदेश असून संत ज्ञानेश्वरांपासून अलीकडच्या नवोदित साहित्यिकांपर्यंत सर्वांनी पावलोपावली मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी आपले अमूल्य योगदान दिले आहे. मराठी ही आपली मातृभाषा मायबोली बरोबरच आई देखील आहे. आईची माया जशी वत्सल,प्रेमाळू, दयाळू, मायाळू, असते. तशीच ती माय मराठीची देखील आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्याबाहेर देखील मराठी भाषा बोलणारे, मराठी भाषेवर प्रेम करणारे अनेक भाषिक देखील राहतात. 
          बाळ जेव्हा लहानपणी जन्माला येत तेव्हा प्रथम शब्द त्याच्या तोंडातून ' माॅ ' हा निघतो. ' माॅ ' म्हणजेच आई होय. कुटूंबातील सदस्यांचे वेगवेगळ्या प्रकारे कानावर पडणारे शब्द तो बाळ ऐकत असतो. आणि तेच शब्द ते बाळ आपल्या तोंडून उच्चारत असतो. अशाप्रकारे आपली मराठी मायबोली अधिकाधिक विस्तारीत होत जाते.
         " महाराष्ट्रातील अकरा कोटी लोकांची मायबोली असलेली मराठी भाषा ही भारतातील चौथ्या क्रमांकाची तर जगातील दहाव्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे." प्रमाण भाषेबरोबरच बोली भाषेचा ही मोठा गोतावळा तिला लाभलेला आहे. मराठी भाषेएवढाच मराठी साहित्याचा ही मोठा इतिहास आहे. मराठी साहित्याचा इतिहास घडविण्यात महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या साधु - संत, शाहीर, बखरकार,  निबंधकार,  विचारवंत, कवी, नाटककार, प्रवासवर्णनकार, भाषाशास्त्रज्ञ, या सर्वांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. एखादी भाषा खुप लोकांकडून बोलली जाते म्हणून ती श्रेष्ठ ठरते असे नाही. आधुनिक काळात जगाचा संपर्क वेगाने आणि झपाट्याने वाढत आहे. जागतिकीकरणाचा परिणाम प्रादेशिक भाषांवर होत आहे. म्हणून प्रादेशिक भाषा हळूहळू नष्ट होत आहे. उदा : आपल्या देशाचा विचार केला असता, जागतिक पातळीवर देशाची राष्ट्रभाषा बोलली जाते. तसेच जागतिक भाषा म्हणून मान्यता असलेली इंग्रजी भाषा ही बोलली जाते. त्यामुळे आपली मराठी भाषा हळूहळू लोप पावत चालली आहे. " वैज्ञानिकांच्या मते तर, या शतकाच्या अखेरीस जगातील सहा हजार भाषांपैकी ५० ते ९० टक्के भाषा लोप पावतील." युनेस्कोनेही आपापल्या भाषा सांभाळा असे आवाहन केले आहे.

              संस्कृत वाणी देवे केली 
              तरी पाकृत काय चोरापासून आली
              असो तू या अभिमान भुलो
              वृथा बोली काय मज
                                     - संत एकनाथ

           मराठी भाषेतील वाडमयाला प्रदीर्घ व ऐतिहासिक अशी गौरवशाली परंपरा आहे. असे संत 'एकनाथ महाराजांनी' सांगितलेले आहे. ' मराठी भाषा टिकवायची असेल तर आधी तिला आपण ज्ञानभाषा बनवली पाहिजे.' ज्ञानभाषा म्हणजे मराठी भाषेतील प्रत्येक शब्द आपण रोजच्या जीवनात वापरणे आवश्यक आहे. " ज्ञानभाषा म्हणजे ज्ञानार्जनाची , ज्ञानसंवर्धनाची व ज्ञान देण्याची भाषा होय." आपल्या भाषेचा विकास आपण स्वतः हा करणे गरजेचे आहे. भाषेचा विकास विविध क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण वापरातून होत असतो. म्हणून आपल्याला सर्वच क्षेत्रात मराठी भाषा कशी वापरता येईल, याचा विचार करणे गरजेचे आहे. " शेवटी मराठी भाषेच सवर्धन करणे ही मराठी माणसाची भाषिक जबाबदारी आहे."

              माझ्या मराठी मातीचा
              लावा ललाटसा टिळा
              हिच्या संगे जागतील
              माय देशातील शिळा
                                   कवी - कुसूमाग्रज

            "मराठी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी - 'विष्णू वामन शिरवाडकर'  (कुसूमाग्रज) यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा दिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा केला जातो."
            "दरवर्षी २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ' मायबोली मराठी सप्ताह ' म्हणून साजरा केला जातो." या सप्ताहात अनेक मराठी संस्था, शाळा, महाविद्यालयात विविध स्पर्धा, विविध उपक्रम केले जातात.
              खर तर भाषा हे बोलण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा दुवा म्हणून भाषेकडे पाहिले जाते. अलीकडे सुशिक्षित पालक आपापल्या मुलांना शिक्षणासाठी इंग्रजी शाळेत पाठवतात. हीच पालकांची मोठी चुक असून येथूनच खऱ्या अर्थाने मुल मराठी भाषेपासून दुरावली जातात. इंग्रजी शाळेत हिंदी आणि इंग्रजी याच भाषांना प्राधान्य दिले जाते. मराठी भाषेबद्दल आपुलकी, प्रेम असणाऱ्या सर्व पालकांनी आपल्याला मुलांना मराठी शाळेतच शिक्षणासाठी पाठवावे. हीच आजची गरज आहे.

          लाभले भाग्य आम्हांस बोलतो मराठी
            जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
            आमुच्या मनामनात दंगते मराठी
            आमुच्या रगारगात रंगते मराठी
                                  - कविवर्य सुरेश भट

           काळाप्रमाणे मराठी भाषेमध्ये देखील बदल होत जातात हे खर आहे. परंतू आज ही सुक्ष्म बदलांना सोबत घेऊन माय मराठीचा प्रवास अखंडपणे सुरू आहे. कवी सुरेश भट म्हणतात की, या मराठी मायबोलीचा प्रदेश असलेल्या महाराष्ट्रात मी जन्माला आलो हे माझ भाग्य समजतो. जन्माला येऊन या माय बोलीच्या शब्दांनी मी संवाद साधू शकतो यापेक्षा अजून मोठ काय हवय मला. या मराठी मायबोलीच्या छत्रछायेखाली जन्म घेऊन मी खरच धन्य झालो!
          माझ्या मराठी मायबोलीला खुप मोठी जुनी परंपरा आहे. अगदी नवव्या दहाव्या शतकापासून मराठी भाषेत कोरलेले शिलालेख आजही उपलब्ध आहेत. "तेराव्या शतकात लिहलेली ' ज्ञानेश्वरी ' हा मराठी भाषेतील प्राचीन ग्रंथ आहे." तेव्हापासून ते आजपर्यंत मराठी भाषा अनेक अंगानी समृद्ध होत गेली आहे. मराठी भाषेबद्दल शेवटी एवढचं म्हणतो ..........

           माय मराठी माझी माऊली
           अमृतधारा झरती बोली
           मनात फुलती वसंत गाणी

                लेखक : विजय शंकर सुर्यवंशी
                                               जळगाव

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

समग्र वारली चित्रसृष्टी प्रकल्पालासर्वतोपरी सहकार्य -ना. डॉ. गावित