माझी माय मराठी ! २) स्मिता दळवी, खारघर, नवी मुंबई


"मराठी भाषा दिवस"

माय मराठी... साद मराठी

"मराठी भाषेचा गंध जाई जुई मोग-याचा,
लावू कपाळी टिळा माय मराठी मातीचा"

मराठी साहित्याचा मानदंड असणारे, त्या अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघूनिबंधकार व आस्वादक समीक्षक म्हणजे विष्णु वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर, अर्थात आपल्या सर्वांचेच लाडके कवी "कुसुमाग्रज" यांचा २७ फेब्रुवारी म्हणजे आज जन्मदिवस, अर्थात "मराठी राजभाषा दिवस" तथा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा केला जातो.  प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवर प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्यं आहेत.
            आज मराठी राजभाषा दिवस आपण साजरा करत असताना एकच जाणवतं की जन्मल्यापासून लहान मुलं आपल्या आईजवळ तसंच स्नेहजनांच्या जवळ असतं तेव्हा ती आई किंवा आजूबाजूचे स्नेहजन ज्या भाषेत मुलांसोबत बोलतात, संवाद साधतात स्वाभाविकच मुलांची तीच मायबोली म्हणजे मातृभाषा होऊन जाते. महाराष्ट्रातील मराठी भाषा प्रत्येक प्रांतात निराळी आहे.  मराठी भाषा जशी संस्कृत भाषेतून आली आहे तशाच भारतातील बहुतेक सर्व भाषा संस्कृत भाषेतूनच निर्माण झाल्या आहेत.  मराठी भाषा सर्व महाराष्ट्रात जरी एक असली तरी दर बारा कोसांवर बदलत जाते. लेखी भाषा तीच असली तरी बोली भाषेत फरक आढळतो. कोकणातील कोकणी-मालवणी, घाटावरील म्हणजे देशावरची वेगळी घाटी भाषा, मध्यप्रांतातील वेगळीच व-हाडी भाषा तसंच गोव्यातील कोंकणी वेगळी. त्यामुळेच बोलताना प्रत्येक भाषेतील हेल वेगळे होतात.
              बरेचदा मातृभाषेतून बोलताना अनायासे काही इंग्रजी शब्दांचा आधार घेत आपण वापर करतो कारण काही प्रमाणात संवाद साधताना ते शब्द सोप्पे जात असावेत म्हणून असेल कदाचित.  त्यानंतर फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम इत्यादी सोशल अ‍ॅपवरसुद्धा अनेक वेळेस आपण इंग्रजी शब्दांचा आधार घेत संवाद साधतो कारण बहुतेक जणांना इंग्रजीतून टायपिंग करणं खुप सोपं जातं.  तसंच बरेचदा आपण परदेशात कामानिमित्त जातो, कधी शिक्षणासाठी काही काळ तिथं राहतो किंवा तिथेच स्थायिक होऊन जातो.  तेव्हा ज्या ठिकाणी आपण जास्त काळ घालवणार तिथल्या अनेक गोष्टींचा, भाषेचा, संस्कृतीचा आपल्यावर प्रभाव पडतो, मग साहजिकच बोलताना हळूहळू आपल्या मातृभाषेचा वापर कमी केला जातो.
            असं असलं तरीही आपण असा ठाम निश्चय केला पाहिजे की जगाच्या पाठीवर कुठेही राहिलो तरी माझ्या माणसांशी संवाद साधताना मी माझ्या मातृभाषेतूनच बोलणार.  असं केलं तरच आपली संस्कृती टिकून राहील व ती आपणच टिकवली पाहिजे.  बाहेरील जगातील लखलखाट आपल्याला कितीही आवडला तरीही, आपल्याला आपल्या स्नेहजनांसोबत आपल्या घरातच सुखावह वाटतं, नाही का?  तसंच एका भाषेसाठी आपण आपल्या मातृभाषेला, आपल्या मराठी बोली भाषेला विसरणं कितपत योग्य आहे?  आपली संस्कृती, भाषा टिकवून ठेवणं ही आपलीच जबाबदारी आहे, नाही का?  उगाच नाही म्हणत "मराठी राजभाषा आमची महाराष्ट्राची शान! भजनं कीर्तनं ऐकताना हरपते भान!!"

                                 स्मिता दळवी
                            खारघर, नवी मुंबई

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।