संपादकीय- काॅग्रेस संपवायला कोण निघाले आहे ? ** सावरगाव खुर्द ते देवरगाव रस्त्याचे वाजले बारा ! ** महावितरणच्या गलथान कारभारामुळे व्यावसायिक अंधारात ! ** इतर बातम्यासह सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

काॅग्रेस संपवायला कोण निघाले आहे !

काॅंग्रेसमुक्त भारत करण्याची भाषा भाजपकडून २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केली गेली, १२५ वर्षांपेक्षा अधिक परंपरा असलेल्या काॅंग्रेसला संपविणे भाजपाला ही अवघड वाटत असेल म्हणून दुधाची तहान ताकावर भागवावी या उक्तीप्रमाणे भाजपाने प्रचार केला, भारताला काॅंग्रेसमुक्त करण्याची जबाबदारी मतदारांवर सोपविण्यात आली पण संपविण्याची भाषा ना मतदारांना करू दिली ना स्वत: भाजपाने उचलली, यांतच खरी गोम आहे ती समजणाऱ्यांनी समजून घ्यावी व समजू न शकणाऱ्यांनी "डोक्याची दही" करू नये हा मानसिकतेच्या खेळाचे फासे फेकून भाजपा नामानिराळा झाला, याचा भाजपाला अपेक्षित असलेला फायदा तर झाला, मग संपविण्याची भाषा कोणी करावी ?
           राष्ट्रीय काँग्रेस संपत चालली असून पूर्णपणे संपलेली नाही, केंद्रात विरोधी पक्ष नेतेपदी बसण्याइतके संख्याबळ मिळवू न शकणे हा "संपली" असा गृहीत धरणे चुकीचे वाटते. सक्षम नेतृत्व मिळाले तर पुन्हा उभारी घेणे काॅग्रेसला शक्य आहे पण गांधी घराणे एकाधिकारशाही व रिमोट कंट्रोल ठेवण्याचे काम जोपर्यंत थांबवत नाही तोपर्यंत काठावर पास नव्हे तर फक्त परीक्षा फॉर्म भरून परीक्षेला बसणे इतकेच अस्तित्व सध्या दिसते. याला जबाबदार कोण? खरंच राष्ट्रीय काँग्रेस संपेल ? या प्रश्नाचे उत्तर काॅग्रेसजनांव्यतिरिक्त इतर कोणी ठामपणे देऊ शकतो ?
       राहुल गांधी काॅंग्रेसचे अध्यक्ष लवकरच होणार व व्हावे यामागे सोनिया गांधी व प्रियंका वाड्रा यांनी इच्छा व्यक्त करावी यामागेही भाजपाचा हात आहे असे म्हटले तर ?
          "सायकाॅलाॅजीकल" गेम खेळण्यात राजकारणी पटाईत असतात पण त्या खेळातील चक्रव्युहातही राजकारणीच वेळोवेळी फसतात हे अनेक उदाहरणांवरून दिसून येते, तेथे काॅग्रेसी नेते तरी अपवाद ठरु नये ? आणि हा फासा जो पडला त्यात काॅंग्रेस आणखीनच अडकत चालली आहे असे नाही वाटत ?
           कालपर्यंत राहुल गांधी "पप्पू" या नावाने सोशल मिडियातून ट्रोल झाले, यात भाजपाचा ही हात असेल की नाही ?
         सध्या सकाळी सकाळी ट्विटर-ट्विटर गेम सुरू होतो, तेथे राहुल गांधी एकटेच खेळाच्या मैदानात उतरतात, सोनिया गांधी व प्रियंका वाड्रा कौतुक करतात पण भाजपा काही या खेळात सहभागी होत नाही, का होत नाही ? "मोदीजी जवाब दो, डरो मत", तरीही पंतप्रधान मोदी उत्तर देत नाहीत, गृहमंत्री अमित शहा ही बोलत नाहीत ना भाजपाचा गल्ली कार्यकर्ता यावर मत नोंदवताना दिसत नाही आणि काॅग्रेसचे नेते, कार्यकर्ते केंद्रसरकारला धारेवर धरत नाहीत, यावरुन राहुल गांधी यांना सोशल मिडीयात "पप्पू" का म्हटले जाते ? याचे उत्तर भाजपा द्यायला बांधील असू शकत नाही मात्र काॅग्रेसजनांनी तरी म्हणणाऱ्यांना विचारावे की नाही ?
           पंतप्रधान मोदींना निवडणुकी दरम्यान "चौकीदार ही चोर" म्हटले गेले, मात्र सोशल मिडीयांतून अपेक्षेप्रमाणे मोदींना ट्रोलचा सामना करावा लागला नाही, कारण हे वाक्य राहुल गांधी यांच्या तोंडून काॅंग्रेसच्या सल्लागारांनी वदवून घेतले हाच फरक असेल ना ? 
        प्रश्र्न अनेक निर्माण होतील, विचारले जात आहेत, चीनने भारताचा ४५००० वर्ग किलोमीटर भाग बळकावला आहे ? मोदींनी राहुल गांधी यांच्या या ट्विटला तरी उत्तर द्यावे की नाही ?  दिलेच तर काही आभाळ कोसळेल ? याचे उत्तर खचितच "हो" असेल ! पण आभाळ कोणावर कोसळेल ?
           मुकं राहून अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, मायावती, उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रीय काँग्रेस व कम्युनिस्ट व्यतिरिक्त सर्व विरोधी पक्ष मोदींच्या पाठीशी उभे राहिलेत. देश संकटात असताना विरोधकांनी पंतप्रधानांना साथ देऊन अनेक दिवस झाले, मग भारतीय राजकारणातले भीष्माचार्य संबोधले जाणारे शरद पवार शांत बसले असतील असे वाटते का ? शांत बसो अगर ना बसो, त्यांनी उत्तर दिले तर ते नक्की काय परिणाम करेल हे फक्त शरद पवारच सांगू शकतात हा इतिहास आहे,  ते "बोलतील तर करुन दाखवतील व करून दाखविले तर बोलणार नाहीत !" हे एक भारतीय राजकारणातलं कोडं आहे, हे कोडं सोडविण्याचा प्रयत्न कुणी केला, त्यांचं राजकीय अस्तित्व कधी काळी भारतीय राजकारणात होतं की नाही ? हा प्रश्न निर्माण होतो, या फंदात सहसा कुणी पडत नाही मात्र पवारांनी दिलेला सल्ला मानला त्यांचे राजकीय भविष्य उज्ज्वल ठरते ! यावेळी पवारांना थोडं "गठबंधन चौकट" सोडून शेवटी न राहवून सल्ला द्यावाच लागला ! तोही राहुल गांधीना ? सोनिया गांधींना ? प्रियंका वाड्राला ? राष्ट्रीय काँग्रेसला ? जरा इतिहास तपासा, ४५ वर्ष (१९६२ नंतरची) जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसची सत्ता होती तेव्हा चीन, एलएसी बाबत काय निर्णय घेतले ?  जो भाग चीनने बळकावला होता त्याबाबत काय केले ?  जे घडवणे सत्ता असताना काॅंग्रेसने कार्यवाही करायला हवी होती, ती केली काय ? आता हा पवारांचा काॅग्रेसला मोठा सल्ला आहे का छोटा प्रश्र्न ?
              राहूल गांधी जे ट्विट मोदींबाबत करतात व गांधी परीवार त्या ट्विटची "री" ओढते, याचे प्रथम उत्तर शोधावे ! आज या घडीला देश कोणत्या संकटातून मार्गक्रमण करीत आहे हे सर्वज्ञात असताना पंतप्रधानांना साथ द्यायला हवी तेथे चीनला सोयीचे होईल असे ट्विट करणे योग्य नाही, देशविरोधी, देशविघातक राजकारण करायची ही वेळ नाही ? पंतप्रधानांना साथ द्यावी, भारतीय सैन्याचं मनोधैर्य वाढवावे ! हा भीष्माचार्यांचा सल्ला मानला तर ? काॅंग्रेसचे "सल्लागार"  ऐकतील ही एक शंकाच आहे, त्यांनी ऐकले म्हणजेच राहूल गांधीनी ऐकले, गांधी परीवाराने ऐकले असं समजायला हरकत नाही, मात्र मोदीद्वेष आणि पंतप्रधान पदाचा द्वेष यांच्यातला फरक समजत नाही, समजून घेत नाहीत तोपर्यंत राष्ट्रीय काँग्रेस आणखी खालावेल आणि याला जबाबदार फक्त राहूल गांधी असतील असेच वाटते ना ? जे उद्याचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष असू शकतात ! आता विचार केला तर राष्ट्रीय काँग्रेस संपवायला खरोखर कोण निघाले ? कारणीभूत कोण असेल ?
नरेंद्र मोदी ? भाजप ? शरद पवार ? राहूल गांधी ? की गांधी परीवार ?



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।