आधुनिक युगातील न्यूटन म्हणून ओळखले जाणारे महान जगप्रसिद्ध विश्वरचनाशास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग यांचा १४ मार्च चौथा स्मृतिदिनानिमित्त !!



ख्यातनाम विश्वरचनाशास्त्रज्ञ हॉकिंग  !

*******************************
            आधुनिक युगातील न्यूटन म्हणून ओळखले जाणारे महान जगप्रसिद्ध विश्वरचनाशास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग यांचा आज चौथा स्मृतिदिन. विश्वनिर्मिती , विश्वरचना, पुंजभौतिकी आणि कृष्णविवरावरील त्यांचे  संशोधन मैलाचा दगड मानले जाते. ऐन उमेदीत ’मोटार न्युरॉन डिसीज’ ही स्नायूची व्याधी जडलेल्या हॉकिंग यांनी मोठ्या जिद्दीने अपंगत्वावर विजय मिळवून ब्रम्हांडातल्या अनेक न उकलणाऱ्या गूढ रहस्यांचा शोध घेतला आणि असामान्य बुद्धीकौशल्याच्या जोरावर माणूस जग जिंकू शकतो हे साऱ्या जगाला दाखवून दिले. त्यांची जीवनकथा मोठी प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायी आहे.
*********************************

                ८ जानेवारी १९४२ म्हणजेच  गॅलिलिओच्या ३०० व्या पुण्यतिथी वर्षी आणि न्युटनच्या जन्मानंतर बरोबर तीनशे वर्षांनी इंग्लंडमध्ये जन्मलेल्या स्टीफन हॉकिंग यांची लहानपणानापासूनच शास्त्रज्ञ व्हायची इच्छा  होती. ८-९ वर्षाचे असतानाच ते घड्याळ आणि रेडिओ सारख्या वस्तू सहजपणे खोलत असत आणि त्या वस्तू कशा चालतात याचेही त्यांना ज्ञान होते. १९५९ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात विश्वउत्पत्ती शास्त्राचे संशोधन करण्यासाठी त्यांना  प्रवेश मिळाला आणि केम्ब्रिजला उच्च शिक्षण घेण्याचे त्यांचे स्वप्न साकारले.  मात्र या दरम्यान हॉकिंग यांना मोटर न्यूरॉन या स्नायूच्या व्याधीने ग्रासले. लाखोत एकाला होणाऱ्या या   आजाराने हॉकिंग केवळ दोन-चार वर्षे जगू शकतील, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तविला होता. त्यामुळे निराश झालेल्या हॉकिंग यांना केम्ब्रिजमधील पुढील संशोधनात स्वारस्य उरले नाही. संशोधनाकडे पूर्ण दुर्लक्ष करून ते मृत्यूची प्रतीक्षा करू लागले. तथापि, हॉकिंग यांना झालेला रोग डॉक्टरांच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी वेगाने शरीरात पसरला. दरम्यान जानेवारी १९६३ मध्ये एका पार्टीमध्ये त्यांची जीन बिल्डे या मुलीशी ओळख झाली. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात व विवाहात झाले. पत्नी जीन बिल्डे ने स्टीफन यांना निराशेच्या गर्तेतून बाहेरच काढले नाही तर नव्या आशा, नवी स्वप्ने दिल्यामुळे केवळ दोन वर्षांची मुदत मिळालेले स्टीफन हॉकिंग यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात उंच भरारी मारली आणि साऱ्या जगाचे डोळे दिपून गेले.
               विवाहानंतर चरितार्थासाठी नोकरीची गरज होती म्हणून अर्धवट सोडलेले शिक्षण त्यांनी   जोमाने सुरु केले. १९७० साली त्यांनी विश्वनिर्मितीबाबतचे संशोधन जगापुढे मांडले आणि जगातील अग्रगण्य संशोधक, शास्त्रज्ञ म्हणून हॉकिंगची ख्याती सर्वदूर पसरली.  खुर्चीला खिळून बसावे लागले असतानाही त्यांनी रॉजर पेनरोज यांच्यासोबत केलेल्या ब्लॅक होल संदर्भातील संशोधनापासून क्वांटम मेकॅनिक्समधील थिअरी मांडण्यापर्यंत  जागतिक विज्ञान क्षेत्रात महत्त्वाचे संशोधन केले. त्यांनी मांडलेल्या व्यापक सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार विश्वाची निर्मिती महास्फोटाने झाली असावी (Big bang theory) व विश्वाचा शेवट हा महाचेप  (Big crunch) ने कृष्णविवरात होईल असे भाकीत केले आहे. कृष्णविवरासंबंधी त्यांनी अनेक धक्कादायक सिद्धांत मांडले असून, त्यापैकी “कृष्णविवरे कणांच्या रूपाने उर्जा बाहेर टाकत असतात” ही त्यांची कल्पना शास्त्रज्ञांनी स्वीकारली नाही. तथापि, १९७४ साली हॉकिंग यांनी पहिल्यांदा शक्तिपुंज सिद्धांत आणि आणि सापेक्षतावादाच्या सिद्धांताची सांगड घालून कृष्णविवरांतून कण बाहेर पडतात हे सिद्ध करून शास्त्रीय जगतास चकित केले. अशी सांगड घालणे खुद्द आईनस्टाईनलाही जमले नव्हते आणि त्यानंतरच्या कोणत्याही शास्त्रज्ञाला हे शक्य झाले नाही. आधी जोरदार विरोध झालेल्या त्यांच्या या प्रबंधाला नंतर त्यांचे   मत पटल्यावर त्यांच्या नव्या निष्कर्षाप्रमाणे होणार्‍या किरणोत्सर्जनाला  ‘हॉकिंग उत्सर्जन’ असे नाव देण्यात आले. त्याच वर्षी हॉकिंग यांचा कृष्णविवर या विषयावरील प्रबंध इंग्लंडच्या ‘नेचर’ या सुप्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध झाला आणि त्यांची रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून निवड झाली. १९८० च्या दशकात हॉकिंग यांना ऑक्सफर्ड, प्रिन्स्टन, न्यूयॉर्क, लँकेस्टर आदी  विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला. विज्ञान विषयात संशोधनाचे  काम करीत असतांनाच हॉकिंग यांनी अपंग लोकांसाठी, त्यांच्या सोयींसाठी आणि त्यांच्यावरील अन्यायासाठी लढा दिला. यासाठी हॉकिंग यांना १९७९ साली   Royal Association for Disability and Rehabilitation या संस्थेकडून ‘मॅन ऑफ दि इयर’ हा मानाचा किताब देण्यात आला.
डॉ. स्टीफन हॉकिंग यांनी ‘काळाचा संक्षिप्त इतिहास’ (A brief history of time) या पुस्तकात भौतिक विज्ञान, खगोलशास्त्र, विश्वरचना आदी विषयातील अत्याधुनिक संशोधनाचा अत्यंत सोप्या भाषेत आढावा घेतला असून इंग्रजीतील सर्वाधिक खपलेल्या बायबल, शेक्सपिअर या पुस्तकांच्या जोडीने त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद झाली आहे. जगातील ३३ भाषामध्ये ते अनुवादित झाले असून एकट्या इंग्लंडमध्ये या पुस्तकाच्या ४० पेक्षा जास्त आवृत्ती प्रकाशित झाल्या आहेत. विश्वाच्या स्फोटाच्या वेळीच स्थळ आणि काळ यांची निर्मिती झाली असल्याचे सांगून विश्वनिर्मितीची कहाणी त्यांनी या पुस्तकात कथन केली आहे. या पुस्तकामध्ये  विश्वनिर्मिती, त्यानंतरच्या विश्वाच्या वाटचालीची आणि विश्वाच्या अंताची चर्चा केली असून पुस्तकातील विषय इतका गहन आहे की, ‘जगातील जास्तीत जास्त लोकांनी विकत घेतलेले; पण कमीत कमी लोकांनी वाचलेले आणि वाचलेल्यांपैकी कमीतकमी लोकांना समजलेले’ असे या पुस्तकाचे विनोदाने वर्णन केले जाते.
            इंग्लंडच्या केम्ब्रिज विद्यापीठातील गणित विभागाचे शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी काम केले असून एके काळी ज्या खुर्चीवर सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ  सर आयझाक न्यूटन बसले होते, ते मानाचे पद हॉकिंग यांनी भूषविले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या  जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाला चालता, बोलता येत नव्हते. त्यांच्या मेंदूने सर्व स्नायूवरील नियंत्रण हरवले होते. त्यांना श्वासोच्छ्वास सुद्धा यंत्राच्या सहाय्याने घ्यावा लागत होता. चाकाच्या खुर्चीत बसून संगणकाच्या सहाय्याने ते आपले विचार व्यक्त करीत. काही वर्षापूर्वी हॉकिंग यांनी ‘पृथ्वीचा सर्वनाश अटळ असून, लवकरच पृथ्वीवरील मानवाला दुसऱ्या एखाद्या ग्रहावर आश्रय घ्यावा लागेल’ असे प्रतिपादन केले होते. ब्रम्हांडातील अनेक गुढ रहस्यांची उकल करणाऱ्या या शास्त्रज्ञाला जेव्हा एका मुलाखतीत ‘विश्वातील सर्वात गुढ गोष्ट कोणती ?’ असा प्रश्न विचारला होता, तेव्हा ‘स्त्री’ ही जगातील सर्वात गूढ गोष्ट असल्याचं मत त्यांनी मांडलं होतं. आईनस्टाईन या सापेक्षतावादाच्या जनकाचे नाव जगभर सर्वमुखी आहे. तथापि, हॉकिंग यांना २१ व्या शतकातील आईनस्टाईन म्हंटले जाते. योगायोग असा की, १४ मार्च १८७९ ला आईनस्टाईन यांचा जन्म झाला आणि तीन वर्षापूर्वी म्हणजेच १४ मार्चलाच हॉकिंग यांनी जगाचा निरोप घेतला. अशा या ख्यातनाम विश्वरचना शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे जीवनचरित्र सर्वांनाच स्तिमित करणारे व प्रेरणादायी आहे. त्यांच्या  चौथ्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र आदरांजली !                                                                                                                                  
                                                                                                              
                   प्रा. विजय कोष्टी,
                  सहयोगी प्राध्यापक
            कवठे महांकाळ (जि.सांगली)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रथमतःच अध्यक्षपदी खासदार, सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती स्थापन, कार्याध्यक्षपदी के. के. अहिरे.

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

‘मविप्र’ च्या ठेवींचा आकडा सव्वाशे कोटींपर्यंत:- सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. मविप्र संस्थेची ११० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत, १ हजार ८७ कोटींचे अंदाजपत्रक, वर्षभरात तीन हजार विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, मविप्र सुरु करणार वृद्धाश्रम !ऑक्सफर्ड युनिवर्सिटीसोबत मविप्र करणार करार !