प्रलंबित मागण्या पूर्ण करा, अन्यथा रस्त्यावर उतरू- नरेंद्र पाटील !!




माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा, अन्यथा रस्त्यावर उतरू, मा. आमदार नरेंद्र पाटलांच्या नेतृत्वात शेकडो माथाडी कामगार आझाद मैदानात!

            मुंबई दि. १५ :- माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाच्या कामगार, गृह, पणन व सहकार आणि अन्य खात्याअंतर्गत असलेल्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन च्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन आयोजित केले होते. माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या धरणे व उपोषण आंदोलनात युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, अध्यक्ष एकनाथ सखाराम जाधव, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड, जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख उपाध्यक्ष सूर्यकांत पाटील इतर पदाधिकारी आणि बृहन्मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, पुणे, लातूर, सातारा, कोल्हापूर व अन्य जिल्ह्यातील व्यवसायात काम करणारे हजारो प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. महाराष्ट्र शासनाचे विविध खात्यांतर्गत प्रलंबित असलेल्या प्रश्नांची माहिती देताना माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी सांगितले की वर्षानुवर्षे या प्रश्नांची निवेदने सरकारकडे सादर केली, बैठका झाल्या, परंतु प्रलंबित प्रश्नांची सरकारने सोडवणून केलेली नाही, त्यामुळे आझाद मैदान येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

            विविध माथाडी मंडळातील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणे, माथाडी मंडळात पुर्णवेळ चेअरमन, सेक्रेटरी यांच्या नेमणुका करणे, विविध माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करणे व पुनर्रचित माथाडी मंडळावर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात मंडळ सदस्यांच्या नेमणुका करणे, बाजार समितीच्या अनुज्ञाप्तीधारक मापाडी, तोलणार कामगारांना बाजार समितीच्या सेवेत घेणे, कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे आवार व अन्य ठिकाणी मालाचे वजन ५० किलो ठेवण्याबद्दलची अंमलबजावणी होणे, शासनाने कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात येणा-या फळे, भाजीपाला व कांदा-बटाटा मालावरील नियमण काढण्याचा दि.०५ जुलै, २०१६ चा शासन अध्यादेश रद्द होणे, नाशिक जिल्ह्यातील माथाडी, मापारी-तोलणार कामगारांच्या लेव्हीच्या प्रश्नाची सोडवणुक होणे, माथाडी कायद्यात पोलीस संरक्षणाची तरतुद करणे व माथाडी कामगारांवर गुंडगिरी करणा-यांचा पोलीस यंत्रणेमार्फत बंदोबस्त करण्यासाठी समिती गठीत करणे, वर्क ऑडर्रच्या नांवाखाली माथाडी कामगारांची हक्काची कामे बळकावणा-या व कामगारांवर गुंडगिरी करणा-यांचा बंदोबस्त करणे, पिंपरी, पुणे येथिल मे. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीकडील व अन्य माथाडी कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक होणे, गुलटेकडी मार्केट, पुणे येथिल कामगारांच्या टोळी पध्दतीच्या निर्णयाची अंमलबजावणी होणे, कळंबोली स्टील यार्ड व विविध रेल्वे यार्डातील कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक होणे, कोल्हापूर रेल्वे यार्डातील कामगारांचे प्रश्न, ग्रेन डेपो- शिवडी येथील कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक होणे आदी प्रश्नांची सोडवणुक होण्याकरीता महाराष्ट्र शासनाचे संबंधित खात्याचे मंत्री, कामगार आयुक्त कार्यालय व संबंधितांकडे निवेदने सादर केली आहेत, परंतु या न्याय्य प्रश्नांची सोडवणुक करण्याकडे संबंधितांनी लक्ष दिलेले नाही, त्यामुळे तमाम माथाडी कामगारांमध्ये कमालीचा असंतोष पसरला असून, कामगारांना आझाद मैदान, मुंबई येथे धरणे आंदोलन व आमरण उपोषण करणे भाग पडत असल्याचे माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी म्हटले आहे.

        माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची सरकारने आता सोडवणून करावी अशी आग्रही मागणी माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा देखील दिला.

       माथाडी कामगारांच्या या धरणे आंदोलनास आमदार आशिष शेलार, शिवाजीराव पाटील-निलंगेकर, आमदार निरंजन डावखरे, अभिमन्यू पवार, मदन येरावत आदींनी भेट व पाठींबा दिला.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।