राजस्थान रॉयल्सचा दिमाखदार विजय !


न्यूज मसाला वृत्तसेवा,
7387333801

राजस्थान रॉयल्सचा दिमाखदार विजय

           मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर टाटा आपीएल २०२२ चा पाचवा सामना   एकतर्फी झाला. हैदराबादने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. राजस्थान कडून खेळाची सुरूवात करायला जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल उतरले. दोघांनीही आवश्यक सरासरी राखत डाव फुलवला. ७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूंवर यशस्वी जयस्वाल रोमारीओ शेफर्डच्या गोलंदाजीवर ऐडन मार्करामकडे झेल देऊन परतला. त्याने २ चौकार आणि १ षटकारांच्या सहाय्याने १६ चेंडूंत २० धावा काढल्या. धावफलक ५८/१ दर्शवत होता. त्याच्या जागी कर्णधार संजू सॅमसन आला. ह्यांची जोडी चांगली धावसंख्या उभारेल असं वाटत असतानाच जोस बटलर उमरान मलिकच्या जाळ्यात फसला. त्याचा झेल निकोलस पुरनने टिपला. त्याने ३ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने २८ चेंडूंत ३५ धावा काढल्या. राजस्थानकडून देवदत्त पडीक्कल फलंदाजीसाठी उतरला. सॅमसन आणि पडीक्कल डावाला आकार देण्यास सुरूवात केली. ७० पेक्षा अधिक धावांची या जोडीने भर घातली. १५व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूंवर पडीक्कल बाद झाला. उमरान मलिकने त्याचा त्रिफाळा उध्वस्त केला.  त्याने ४ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने २९ चेंडूंत ४१ धावा काढल्या. जोडी फुटल्याचा परिणाम लगेच दिसून आला. १७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूंवर सॅमसन बाद झाला. भुवनेश्वर कुमारने अब्दुल समद करवी त्याला झेलबाद केले. त्याने ३ चौकार आणि ५ षटकारांच्या सहाय्याने २७ चेंडूंत ५५ धावा काढल्या. शिमरॉन हेटमेयर आणि रियान पराग यांनी केवळ ३ षटकांत ४० पेक्षा जास्त कुटल्या. हेटमेयरचा २०व्या षटकाच्या दुसर्‍याच चेंडूंवर नटराजनने त्रिफाळा उध्वस्त केला. त्याने २ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने १३ चेंडूंत ३२ धावा काढल्या. डावाच्या शेवटच्या चेंडूंवर नटराजने परागला निकोलस पुरनकडे झेल देण्यास भाग पाडले आणि राजस्थान २० षटकांत २१०/६ अशा भक्कम अवस्थेत पोहचला. 
सनरायझर्स हैदराबाद कडून डावाची सुरूवात करण्यासाठी कर्णधार केन विल्यमसन आणि अभिषेक शर्मा उतरले. पण धावांचा डोंगर पाहून दोघेही तणावाखाली होते. सामन्याच्या दुसर्‍या षटकाच्या चौथ्या चेंडूंवर हैदराबादचा कर्णधार विल्यमसन बाद झाला. प्रसिद्ध कृष्णाने त्याला पडीक्कलकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याच्या जागी आलेल्या राहुल त्रिपाठीला कृष्णाने डावाच्या चौथ्या षटकात शून्यावर बाद केले. संजू सॅमसनने त्याचा झेल टिपला. निकोलसन पुरनला ट्रेन्ट बोल्टने पायचित टिपले. अभिषेक शर्मा आणि ऐडन मार्कराम हे डावाला आकार देतील असं वाटत असतानाच शर्मा बाद झाला. यझुवेंद्र चहलने त्याला शिमरॉन हेटमेयरकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याच्या जागी फलंदाजीसाठी उतरलेल्या अब्दुल समदला यझुवेंद्र चहलने परागकरवी झेलबाद केले. ११व्या षटकात निम्मा संघ त्यांच्या तंबूमध्ये परतला होता. हैदराबादची ३७/५ अशी दयनीय अवस्था झाली होती. मार्कराम एक बाजू चिवटपणे लढवत होता, पण त्याच्या सहकार्‍यांची साथ त्याला मिळत नव्हती. शेफर्डही १६व्या षटकात बाद झाला. चहलने त्याच्या त्रिफाळा उध्वस्त केला. त्याने दोन षटकाराच्या सहाय्याने १८ चेंडूंत २४ धावा काढल्या. दिवा विझताना ज्योत मोठी होत जाते त्याप्रमाणे सामना राजस्थानच्या बाजूला झुकलेला असताना वॉशिंग्टन सुंदरने आक्रमक भूमिका घेतली. त्याच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. त्याची तडाखेबंद खेळी नजरेचे पारणे फेडत होती. लाजवाब फलंदाजीचा नमूना त्याने सादर केला. पाच चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने १४ चेंडूंत ४० धावा कुटल्या. पण त्याचे प्रयत्न तोकडे पडले. १९व्या षटकात बोल्टने त्याला हेटमेयरकडे झेल देण्यास भाग पाडले. हैदराबादसाठी एकाकी लढा देणार्‍या मार्करामने पाच चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने ४१ चेंडूंत बिनबाद ५७ धावा काढल्या. २०व्या षटकाच्या अखेरीस हैदराबाद केवळ १४९/७ धावा जमवू शकले आणि राजस्थान रॉयल्सने हा सामना ६१ धावांनी जिंकला. संजू सॅमसनला सामन्याचा खेळाहू हा बहुमान देण्यात आला. त्याने केवळ २७ चेंडूंत ५५ धावा काढल्या होत्या. खास बाब म्हणजे राजस्थानकडून त्याने खेळलेला हा १००वा सामना होता. अजिक्‍य रहाणेनंतर  राजस्थानकडून १०० सामने खेळणारा तो दुसरा खेळाडू आहे.
उद्याचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।