आज आपले आभार मानण्याचा दिवस !! अकरा वर्षे प्रगतीची, विकासाची !



अकरा वर्षे प्रगतीची, विकासाची !
   सन २०१२ मध्ये न्यूज मसाला या साप्ताहिकाला प्रारंभ झाला. काही उद्दिष्टे व पथ्ये ठरवून, नेटाने पाळून वाटचाल करण्यात आली. गेल्यावर्षी दशकपूर्ती साजरी करून आता अकरा वर्षे पूर्ण करतांना राजकीय उलथापालथ, सामाजिक स्थित्यंतरांचा अनुभव आपण घेतला. जागतिक महामारी कोरोना सारख्या संकटाला तोंड देत आपली सर्वांची वाटचाल कधी सुखाचे क्षण तर कधी दु:खाचे चटके देत, आयुष्यातील जगण्याचे निकष बदलून गेली हे नमूद करताना मनाच्या संमिश्र भावनांचा सर्वसामान्यांसोबत परामर्श घेत आलो. एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस हा त्याच्या आयुष्यातील आनंदाचा ठेवा असतो.  सिंहावलोकन करण्याचा क्षण असतो. त्याचबरोबरीने जीवनात काय कमावले ? काय गमावले याचा ताळमेळ जमवण्याचाही प्रयत्न केला जातो. पुढील संकल्प देखील केले जातात. त्याचवेळी आयुष्यातील एक वर्ष संपल्याची हुरहूर देखील असते. यंदा ६ तारखेला आपला
वर्धापनदिन साजरा करतांना वाचकांशी हितगूज करतांना विशेष समाधान आहे ते सर्वांच्या आशीर्वादाचे, सहकार्याचे आणि आपुलकीच्या स्नेहसुगंध दरवळत रहाण्याचे !
   संस्था असो वा वृत्तपत्र ! वर्धापनदिनी  विकासाचा, प्रगतीचा धांडोळा घेतलाच पाहिजे. अकरा वर्षात असंख्य माणसे जोडून न्यूज मसाला श्रीमंत झाला तो लोकसंग्रहामुळे हे नमूद करतांना अभिमान वाटतो. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे कोणत्याही औपचारिक सोहळ्याला पूर्णपणे फाटा देण्यात आला. मात्र वाचक, हितचिंतक यांच्याशी अग्रलेखाद्वारे संवाद साधतांना आनंद, समाधान होत आहे. आम्ही दरवर्षी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवतो. शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना विनामूल्य भोजन दिले जाते. त्याबरोबरच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते, आरोग्य दूतांना टी-शर्ट वाटप, याशिवाय वाचनालयांंना पुस्तके, ग्रंथ देणगी स्वरूपात दिले जातात. दिवाळीत आदिवासी पाड्यांवर फराळ वाटप, तसेच कपड्यांचे वितरण करून त्यांच्याशी नाते जोडले जाते. कोरोनाच्या काळात मास्क, सॅनिटायझर, तसेच गरजूंना आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले ते सामाजिक बांधिलकीच्या भावनेने. पत्रकारिता हे समाज प्रबोधनाचे प्रमुख व महत्वाचे माध्यम आहे. लोकशाही समाज व्यवस्थेतील चार स्तंभापैकी पत्रकारिता हा महत्वाचा स्तंभ आहे. सध्याच्या परिस्थितीत परस्परांबरोबरच समाजमाध्यमांशी स्पर्धा वाढली आहे. त्यात टिकून राहाणे हे आव्हानच झाले आहे. आम्ही शासकीय अधिकारी, वार्षिक वर्गणीदार, हितचिंतक यांच्या बळावर येथवर टप्पा गाठला आहे.
   विकास व सामाजिक पत्रकारिता हेच आमच्या प्रत्येक अंकाचे व दीपावली विशेषांकाचे वैशिष्ट्य ठरले आहे. सामाजिक, सांस्कृतिक विषयांना प्राधान्य दिले जात असल्याने वाचक कायमच पाठबळ देतात. सध्या महाराष्ट्रात शेकडो नियमित मराठी साप्ताहिके प्रकाशित होतात. बहुतेक साप्ताहिकांंचे कालांतराने दैनिकात रूपांतर होते. पण बदलत्या परिस्थितीत मराठीतल्या बऱ्याचशा साप्ताहिकांंचा परिघ आक्रसलेला दिसतो. अश्यावेळी टिकून राहणे महत्वाचे ठरते. दरम्यान बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत वाचकांना न्यूज मसाला साप्ताहिक ऑनलाईन (www.newsmasala.in) वरही उपलब्ध करून देण्यात आले आहे. या वेब पोर्टलचा देखिल पाचवा वर्धापनदिन साजरा करतांना विशेष आनंद होतो. यापुढेही सर्वांचे असेच किंबहुना वाढते सहकार्य लाभेल हा विश्वास आहे. आपण दिलेल्या शुभेच्छांचा सतत आदर व स्विकार करतांना आनंद होतो ! चांगली सकारात्मक दृष्टिकोन देणारी मराठी वृत्तपत्रे, साप्ताहिके सध्याच्या संकटावर मात करीत आहेत. हा संक्रमणकाळ आव्हानात्मक आहेच, त्याचबरोबर अस्तित्वाची, चिकाटीची परीक्षा पहाणाराही आहे. अश्यावेळी आम्हाला हवी आहे ती सर्वांची सक्रिय साथ ! आपण जाहिरात रूपाने व सहकार्याचा हात पुढे देऊन ती पूर्ण करीत आहात, ती भविष्यातही कराल ही खात्री आहे. आमच्या कार्याला सार्थ ठरवाल हा विश्वास देखील तुम्हीच वेळोवेळी दिला आहे.
जय हिंद,
                            आपलाच,
                    नरेंद्र तुकाराम पाटील,
                             संपादक
                        7387333801

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !