राजा रविवर्मा यांच्या चित्रकृती रसिकांनी बघाव्या -डॉ. शेफाली भुजबळ

राजा रविवर्मा यांच्या चित्रकृती
रसिकांनी बघाव्या -डॉ. शेफाली भुजबळ

 नाशिकरोडच्या पीएनजी कलादालनात चित्रप्रदर्शनाचे उदघाट्न !

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801

    नाशिक ( प्रतिनिधी ) - भारतीय कलांचा  समृद्ध ठेवा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे संचालक अजित गाडगीळ यांनी कलेचे धन कलादालनाच्या माध्यमातून नाशिककरांपर्यंत आणले आहे. राजा रविवर्मा यांच्या चित्रकृती रसिकांनी, कलाविद्यार्थ्यांनी आवर्जून बघाव्या व आस्वाद घ्यावा असे प्रतिपादन एमइटीच्या संचालिका शेफाली भुजबळ यांनी केले.

    नाशिकरोडच्या पु.ना.गाडगीळ अँड 
सन्सच्या वातानुकूलित कलादालनात श्रेष्ठ  भारतीय चित्रकार राजा रविवर्मा यांचा लिथो  ओलिओग्राफचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. काल त्याचे उदघाट्न डॉ. शेफाली भुजबळ आणि कलासमीक्षक संजय देवधर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ चित्रकार रमेश जाधव, सुभाष वाघ, अतुल भालेराव आणि 
पीएनजीचे अधिकारी राहुल शेवकरी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यवस्थापिका प्रविणा दुसाने यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, पीएनजीचे संचालक अजितकाका गाडगीळ यांच्या संकल्पनेतून पुण्यात झपूर्झा हे कलासंग्रहालय उभे राहिले आहे. त्यात चित्रकार राजा रविवर्मा यांचे स्वतंत्र दालन आहे. त्यातील दर्जेदार कलाकृती प्रथमच नाशिकमध्ये आणून त्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. संजय देवधर म्हणाले, चित्रकार राजा रविवर्मा हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे भारतीय 
चित्रकलेतील मोठे नाव आहे. केरळमधील  वास्तवदर्शी पद्धतीने काम करणाऱ्या या चित्रकाराने स्वतःची शैली निर्माण केली. हिंदू देव - देवतांना चित्रांमध्ये मूर्त मानवी रूप दिले असे त्यांनी सांगितले.

    देवधर पुढे म्हणाले, चित्रातल्या   व्यक्तीरेखांचा पेहराव ठरविण्यासाठी राजा रविवर्मा यांनी संपूर्ण देशभर दौरा करून विविध राज्यातील वेशभूषा, वस्त्रप्रावरणांचा अभ्यास केला. त्यातून महाराष्ट्रीयन स्त्रियांच्या नऊवारी लुगड्याला पसंती दिली. त्याच पद्धतीने लक्ष्मी, सरस्वती तसेच रामायण, महाभारतातील व पौराणिक प्रसंगातील स्त्री पात्रे रंगवली. ही चित्रे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी  लोणावळ्याजवळ मळवली येथे लिथोप्रेस सुरु केला. त्यासाठी जर्मनीतून तंत्रज्ञ व मशीनरी आणली. दर्जेदार छपाई केलेल्या चित्रप्रतिमा अल्पदरात घराघरात पोहोचल्या. जुन्या काळात अश्या चित्रांच्या फ्रेम्स घरांच्या भिंती सुशोभीत करीत. आजही ही चित्रे मन प्रसन्न करतात आणि तो काळ जिवंत करतात. त्यांचे ओलिओग्राफ्स रसिकांना मूळ चित्रांची अनुभूती देतात. किलीमनूर या त्यांच्या जन्मगावी संग्रहालय निर्माण करण्यात आले असून त्यात मळवली येथील मुद्रणसामग्री, लिथोस्टोन्स, मूळ चित्रकृती व मुद्रित चित्रप्रती यांचा समावेश आहे असे त्यांनी नमूद केले. यावेळी रमेश जाधव, सुभाष वाघ, अतुल भालेराव यांनी मनोगत व्यक्त केले. राहुल शेवकरी यांनी दि. १५ पर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी विनामूल्य खुले आहे त्याला नाशिकच्या रसिकांनी भेट द्यावी असे आवाहन केले. पुण्यातील झपुर्झा कलादालनातून राजा रविवर्मा यांची ओलिओग्राफ - चित्रे घेऊन आलेले ओंकार भिडे यांनी आभार मानले.   यावेळी अनेक कलारसिक उपस्थित होते.
***********************************
गाजलेल्या लक्ष्मी, सरस्वती चित्रांसह
६० पेक्षा जास्त चित्रे प्रदर्शित !
            चित्रकार राजा रविवर्मा यांनी रंगवलेल्या चित्रांच्या आकर्षक ओलिओग्राफ (छापील प्रतिकृती) सुबक फ्रेमसह प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. सुरुवातीला लक्ष्मी, सरस्वती ही गाजलेली चित्रे अग्रभागी दिसतात. याशिवाय रिद्धी - सिद्धीसह गणपती, पौराणिक, रामायणातील, महाभारतातील विविध प्रसंग, गंगावतरण, राधाकृष्ण अशी चित्रे बघायला मिळतात. काही चित्रांना टिकल्या, कापड, दागिने यांनी सजविण्यात आले आहे.
*************************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।