"घर बंदूक बिर्याणी" पसंतीस उतरेल !


"घर बंदूक बिर्याणी" पसंतीस उतरेल !
 ७ एप्रिलला प्रदर्शित होणार ‘घर बंदूक बिर्याणी' !
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801

         नाशिक ( प्रतिनिधी )::- झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी फॅंड्री, सैराट, नाळ यांसारखे सुपरहिट आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आणि आता ‘घर बंदुक बिर्याणी’ हा एक वेगळा विषय ते आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.  हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित या चित्रपटात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दि. ७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा 'घर बंदूक बिरयानी' एकाच वेळी मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होत आहे.


    पत्रकार परिषदेत निर्माते नागराज मंजुळे, अभिनेते आकाश ठोसर, अभिनेत्री सायली पाटील, दीप्ती देवी तसेच झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी उपस्थित होते. ट्रेलरमध्ये पोलीस आणि डाकूंची चकमक दिसत असून, यात एका तरूणाचाही सहभाग दिसत आहे.

हा पाठलाग कशासाठी आहे आणि यातून काय निष्पन्न होणार आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. दरम्यान याबरोबरच प्रेमकहाणीही खुलताना दिसेल. या चित्रपटातील गाणे श्रवणीय आणि सुंदररित्या चित्रित करण्यात आले आहे. आशिष कुलकर्णी आणि कविता राम यांचा आवाज लाभलेले 'गुन गुन' हे गाणे प्रत्येकाच्या ओठांवर रेंगाळणारे आहे. 'आहा हेरो' या गाण्याला प्रवीण कुवर, विवेक नाईक, संतोष बोटे, राहुल चिटणीस यांचा आवाज लाभला असून गणेश आचार्य यांचे या गाण्याला नृत्य दिग्दर्शन लाभले आहे. तर 'घर बंदूक बिरयानी' हे टायटल सॉन्ग बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक मोहित चौहान यांनी गायले आहे. चित्रपटातील गाण्यांना ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले असून वैभव देशमुख यांनी गाणी शब्दबद्ध केली आहेत. 
    निर्माते नागराज मंजुळे म्हणाले, ''चित्रपटाबद्दल फारसे काही सांगणार नाही. खरंतर हा चित्रपट करण्यास मी आधी नकार दिला होता. मात्र नकळतच माझ्या नकाराचे होकारात रूपांतर झाले. मी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका देखील केली आहे. चित्रपटाची कथा चांगली आहे, त्यानुसार गाण्यांचेही लेखन झाले आहे आणि त्याला साजेसे असे संगीत आहे. या चित्रपटात नेमके काय आहे, हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. ''झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी म्हणाले,‘’ बिर्याणीमध्ये सगळे जिन्नस असतात आणि त्याची प्रत्येकाची एक खासियत असते, जी बिर्याणीला अधिक चविष्ट बनवते. तशीच या चित्रपटात विविध प्रकारची गाणी आहेत, जी संगीतप्रेमींना नक्कीच आवडतील आणि मुळात नागराज मंजुळे यांच्या प्रत्येक चित्रपटातील गाणी ही खासच असतात. तशीच ‘घर बंदूक बिरयानी’ तीलही आहेत.’’ सायली व दीप्ती यांनी आपल्या भूमिकांविषयी सांगून सर्वांनी चित्रपट बघण्याचे आवाहन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।