बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ! आषाढी स्पेशल- कवयित्री प्रतिभा खैरनार यांची "भक्तीची वारी !
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल !
भक्तीची वारी
नाम विठ्ठलाचे मुखी
वारी चालली पंढरी !
ओढ जीवाला लागली
वाट पहातो श्रीहरी !!
टाळ मृदुंगाचा नाद
पाय धरतात ताल !
विठू नामाचा गजर
वेगे माऊली गं चाल !!
बुक्का ललाटी लावला
कंठी तुळशीची माळ !
आलो तुझिया दारात
तूच विठ्ठला सांभाळ !!
सोडलेय घरदार
तुझा लागलाय लळा !
पांडुरंगा फुलवला
कैसा भक्तीचा हा मळा !!
तुझ्या लेकरांना लागे
आता दर्शनाची आस !
असा वेडावला जीव
तुझा सभोवार भास !!
घेतो डोळी साठवून
रूप साजरे गोजरे !
घेई करूनी श्रीरंगा
आज भक्तीचे सोहळे
-प्रतिभा खैरनार
खुप सुंदर रचना प्रतिभाजी.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाखूप छान
उत्तर द्याहटवा